औषध प्रतिरोध: औषधांचा हानिकारक परिणाम होऊ नये म्हणून शरीरात जी प्रतिक्रिया होते, तिला ‘औषध प्रतिरोध’ असे म्हणतात. अशा तऱ्हेचा प्रतिरोध आनुवंशिक असू शकतो तसेच एखाद्या व्यक्तीत कायम वा तात्पुरता दिसून येतो. हा प्रतिरोध एखाद्या विशिष्ट रासायनिक पदार्थासंबंधी किंवा तत्सदृश दुसऱ्या पदार्थांसंबंधी असू शकतो. इतर रासायनिक पदार्थांच्या क्रियेमध्ये औषध एकसारखे देत गेल्यास व त्याची मात्रा हळूहळू वाढवीत गेल्यास त्या औषधासंबंधी प्रतिरोध उत्पन्न होऊ शकतो. अफू, बचनाग, सोमल (आर्सेनिक) वगैरे औषधे सतत वाढत्या प्रमाणात घेत राहिल्यास मारक मात्रेच्या शतपट औषध घेतल्यासही त्याचा परिणाम होत नाही असा अनुभव आहे.
अलीकडे वापरात आलेल्या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांपैकी स्ट्रेप्टोमायसीन या औषधासंबंधीचा प्रतिरोध, क्षयरोगाच्या जंतूमध्ये उत्पन्न झाल्यामुळे या औषधाचा परिणाम नाहीसा होतो असे दिसून आले आहे. असाच प्रकार इतर काही प्रतिजैव औषधांच्या बाबतीतही दिसतो. या क्रियेबद्दल असा खुलासा करण्यात येतो की, क्षयाच्या जंतूंपैकी काही जंतूंवर अनिष्ट परिणाम होत नाही तेवढे जंतू जगून प्रचुरजनन (अधिक उत्पत्ती) करू शकतात, बाकीचे मरून जातात. अशा तऱ्हेने स्ट्रेप्टोमायसिनाचा परिणाम ज्यांच्यावर होत नाही त्यांची प्रजा आनुवंशिकतेमुळे प्रतिरोधी असते व त्यामुळेच स्ट्रेप्टोमायसिनाचा परिणाम काही रोग्यांमध्ये होत नाही.
डीडीटीविरुद्ध काही डासांमध्ये असाच प्रतिरोध उत्पन्न होत असावा. त्यामुळे हिवताप प्रतिबंधक उपायांत डीडीटीचा उपयोग पुढील काळात कितपत होईल याबद्दल संशय उत्पन्न झाला आहे.
हा प्रतिरोध कसा उत्पन्न होत असावा याबद्दल विविध तर्क केले जातात. प्राणिशरीरातील ऊतकापर्यंत (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहापर्यंत) ती औषधे पोहोचतच नसावी. औषधांचा नाश करण्याची ऊतकांची शक्ती जास्त प्रमाणात वाढत असावी किंवा दुसऱ्या काही पदार्थांचा ऊतकांशी आधीच संयोग झाल्यामुळे संबंधी औषधाला ऊतकात जागाच शिल्लक नसावी असे विविध प्रकार संभवतात.
औषध प्रतिरोधाच्या अगदी विरुद्ध अशी एक क्रिया कित्येक जंतूंमध्ये दिसते तिला ‘औषधावलंबित्व’ असे म्हणतात. सल्फोनामाइडासारखी औषधे माध्यमात घातल्याशिवाय काही जंतूंचे संवर्धनच (वाढ) होत नाही अशी उदाहरणे दिसतात. असे म्हणतात की, जंतूंच्या चयापचयामुळे (शरीरात होणाऱ्या रासायनिक-भौतिक घडामोडींमुळे) उत्पन्न होणारी हानिकारक द्रव्ये सल्फोनामाइडामुळे परिणामकारक होऊ शकत नसावी.
पहा : प्रतिजैव पदार्थ रासायनी चिकित्सा.
कापडी, रा. सी.