औषध : औषधाची पूर्ण व्याप्ती असलेली व्याख्या करणे कठीण आहे. ‘न अनौषधिभूतं जगति किश्चित् विधते द्रव्यम्’ म्हणजे औषध म्हणून ज्याचा उपयोग होऊ शकणार नाही असे कोणतेही द्रव्य सृष्टीत नाही, असे प्राचीन भारतीय वैद्यकाचे वचन आहे. ज्या पदार्थाला काही गुण व काही क्रियाकारित्व आहे त्याला द्रव्य समजतात यामुळे कोणतेही द्रव्य औषध म्हणून वापरता येते.
आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने पशुपक्षी व मानव यांना होणाऱ्या कुठल्याही रोगांच्या प्रतिबंधासाठी, शमनासाठी किंवा चिकित्सेसाठी, पोटात देऊन, बाहेरून लावून किंवा अन्यप्रकाराने म्हणजे सुईने अधस्त्वक (त्वचेखाली), त्वक (त्वचा), नीला, स्नायू, पर्युदर (उदरातील इंद्रियांवर पसरलेला पातळ पडद्यासारखा थर), परिफुप्फुस (फुप्फुसाभोवतालचे नाजूक व द्रव्ययुक्त आवरण), मस्तिष्क-मेरू-द्रव (मेंदू आणि मेरूरज्जू यांच्याभोवती असलेला द्रव पदार्थ), मस्तिष्क-विवर इ. ठिकाणी टोचून जी द्रव्ये वापरतात व ज्यांचा सामान्यपणे अन्न (आहार) म्हणजेच ऊर्जा उत्पादनासाठी म्हणून उपयोग केला जात नाही, त्यांना औषधी द्रव्ये म्हणता येते. यास मद्यासारखे काही पदार्थ अपवादात्मक असतात, कारण त्यांचा औषध म्हणून तसेच ऊर्जोत्पादनासाठी उपयोग होतो.
पूड, गोळी, चूषिका (चोखण्याची गोळी), वडी, चाटण, द्रवमिश्रण या प्रकारांनी पोटात घेण्याची लेप, लेपन, पोटीस, बिंदुगालन (औषधयुक्त ओले कापड रोग्याभोवती गुंडाळणे), मज्जन (शरीर अथवा एखादा अवयव औषधयुक्त द्रवात बुडविणे) या प्रकारांनी बाहेरून लावण्याची व निरनिराळ्या संहतीच्या (विरघळलेल्य पदार्थाच्या प्रमाणाच्या) विद्रावांनी टोचण्याची औषधे वापरली जातात.
ज्याची मात्रा शक्य तेवढी लहान, जे घेण्यास सुसह्य, ज्यात निरुपयोगी भाग शक्य तितका कमी, ज्यापासून कुठलाही अपाय होण्याचा संभव कमीत कमी किंवा अजिबात नाही, या सर्व गुणांनी युक्त असूनही जे अल्पमोली व बहुगुणी असते त्याला उत्तम औषध समजतात. असे सर्वोत्कृष्ट औषध सिध्द करणे व्यवहारात शक्य होत नसल्याने जे गुणकारित्वात श्रेष्ठ तेच औषध मात्रा, आकर्षकपणा, थोडेसे दुष्परिणाम होण्याचा संभव, मूल्य इत्यादींचा तारतम्याने विचार करून व्यवहारात श्रेष्ठ समजले जाते.
औषधे ही वनस्पतिज, प्राणिज, खनिज तसेच प्रयोगशालेत कृत्रिमरीत्या तयार केलेली असू शकतात.
औषधांचे कार्य पुढील प्रकारांनी होते : (१) स्थानिक : सुंठ लावल्यानंतर आग होणे किंवा मेंथॉल लावल्यानंतर गार वाटणे, (२) शोषून घेतले जाण्यापूर्वी परिणाम करणारी लवण-रेचके, (३) शोषून घेतल्यावर कुठल्या तरी ऊतकांवर (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांवर) किंवा तंत्रांवर (संस्थांवर) कार्य करणारी ग्रंथिस्राव वाढविण्यासाठी देण्यात येणारी औषधे व मूत्रले (मूत्राचे प्रमाण वाढविणारी औषधे), (४) तंत्रिका तंत्राद्वारा (मज्जा संस्थेद्वारा) कार्य करणारी, (५) खोकल्यासाठी देण्यात येणाऱ्या काही द्रव्यांप्रमाणे उत्सर्जन होत असताना कार्य करणारी.
आपटे, ना. रा.
प्रचलित औषधिद्रव्यांचे त्यांच्या परिणामानुसार सामान्यत: पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते :
औषधिद्रव्याचा प्रकार |
क्रियात्मक वैशिष्ट्ये |
अंगग्रहरोधक (स्नायु-शिथिलक) |
स्वायत्त तंत्रिका तंत्राच्या नियंत्रणाखालील अनैच्छिक स्नायूंचा अंगग्रह रोखणारी औषधे. |
अंतःस्त्राव (हॉर्मोन) |
अंतःस्त्रावी ग्रंथींचे स्त्राव. रक्तप्रवाहाद्वारे दूरच्या शरीरस्थ ऊतकांवर नियंत्रण करणारे पदार्थ. |
अतिरक्तदाब अपचयक |
वाढलेला रक्तदाब कमी करणारी औषधे. |
अनुकंपरोधक |
एपिनेफ्रिन किंवा तत्सम पदार्थांची क्रिया रोखणारी औषधे. |
ॲसिटिलकोलीन विरोधके |
कोलीनोत्तेजक तंत्रिकांना चेतना मिळताच त्यांच्या टोकांजवळ (शेवटाजवळ) ॲसिटिलकोलीन उत्पन्न होते. त्याचा शरीरावर होणारा परिणाम रोखणारी औषधे. |
आकडीरोधक |
अपस्मार या रोगात येणाऱ्या आकड्या कमी करणारी किंवा थांबवणारी औषधे. |
कफोत्सारक |
फुप्फुसे व श्वसनमार्ग यांमधील द्रव अगर अर्धद्रव पदार्थाचे उत्क्षेपण करणारी औषधे. |
क्लथनरोधक |
रक्ताचा क्लथन (गोठण्यास लागणारा) वेळ वाढवणारी औषधे. ह्रदय स्नायू विकार तसेच ह्रद धमनी रक्त क्लथन यांमध्ये वापरली जातात. |
गर्भाशय संकोचक |
गर्भितावस्थेतील गर्भाशयावर प्रसूतिसमयी परिणाम करणारी (संकोचन वाढवणारी) औषधे. |
जीवनसत्वे |
नैसर्गिक अन्न, वनस्पती व प्राणी ऊतकांत कार्बनी घटक असलेले विशिष्ट पदार्थ जीवनावश्यक असतात. अल्पप्रमाणातही परिणामकारी असतात. शरीरावश्यक ऊर्जा जरी ते प्रत्यक्ष उत्पन्न करीत नाहीत, तरी अप्रत्यक्षरीत्या ऊर्जोत्पादनात व चयापचयात (सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक बदलात) भाग घेतात. |
जैव पदार्थ |
जटिल रचना असणारी रोगोत्पादक सूक्ष्मजीव किंवा विषाणू (व्हायरस) विरुद्ध प्रतिरक्षा उत्पन्न करणारी औषधे. यांत रक्तरस (सर्व रक्ताची गुठळी झाल्यावर राहिलेला पिवळसर व न गोठणारा पेशीविरहित द्रव), लस, प्रतिविषे, प्रतिजने (शरीरात प्रतिपिंडे उत्पन्न करणारे सूक्ष्मजंतू, विष इ. पदार्थ)यांचा समावेश होतो. मानवी रक्त आणि त्यापासून मिळणारे रक्तरस किंवा लालपेशी संचय यांचाही समावेश होतो. |
ज्वरशामक |
ताप घालवणारी किंवा कमी करणारी औषधे. |
ढासरोधक |
खोकला कमी करणारी किंवा थांबवणारी औषधे. |
निद्राकारक |
झोप आणणारी औषधे. |
नैदानिकोपयोगी |
शरीर-रचनात्मक दोष शोधून काढण्याकरिता व त्यामुळे रोगांचे निदान करण्याकरिता वापरली जाणारी औषधे. |
प्रतिजैव पदार्थ |
सूक्ष्मजीवांपासून नैसर्गिक अगर कृत्रिमरीत्या बनविलेली, संक्रमणजन्य रोगांत दिली जाणारी औषधे. |
प्रतिहिस्टामीन |
अधिह्रषता (ॲलर्जी) विरोधी औषधे. शरीरात खुले हिस्टामीन उत्पन्न होऊ देत नाहीत. |
मूत्रल |
मूत्रोत्पादन वाढवणारी व त्यामुळे शरीरद्रव्याचा व्यय वाढवणारी औषधे. |
रासायनी चिकित्सक |
संक्रमणजन्य रोगांत दिली जाणारी औषधे. रोगी शरीरावर दुष्परिणाम न करता जंतुनाशके म्हणून वापरली जातात. जंतुनाशक, कृमिनाशक, क्षयरोधक, कुष्ठरोगरोधक, मलेरिया प्रतिबंधक, आमांशरोधक, सल्फा औषधे यांचाही यात समावेश होतो. |
रेचक-विरेचक |
मलोत्सर्जन वाढवणारी औषधे. |
विरोधक |
एकमेकांचे परिणाम निष्प्रभावी करणारी. |
वेदनाशामक |
बेशुद्धी न आणता वेदना शमवणारी. |
शांतक |
मनःक्षोभ व चिंता कमी करणारी किंवा घालवणारी औषधे. |
शामक |
निद्राकारकापेक्षा कमी प्रभावी, झोप न आणता तंत्रिका तंत्रावर शामक परिणाम करून मानसिक ताण, भय व तंत्रिकोन्माद कमी करणारी औषधे. |
संवेदनाहारक |
स्थानीय किंवा सार्वदेहिक संवेदना हरण करणारी औषधे.स्थानीय परिणमाकरिता बाहेरून लावल्यास किंवा अंतःक्षेपण (इंजेक्शन) केल्यास तो भाग बधिर होतो. सार्वदेहिक परिणामाकरिता अंतःश्वसनाद्वारे किंवा अंतःक्षेपणाने वापरता येतात. |
सजीवक |
श्वसनक्रिया व जागृतावस्था चेतवणारी औषधे. |
स्वायत्त तंत्रिका |
अनैच्छिक तंत्रिका तंत्रामधील गुच्छिकांचे |
तंत्र रोधक |
स्तंभन (मज्जातंतु कोशिकांच्या समूहांचे कार्य थांबविणे) करणारी औषधे. बहुधा स्नायू शैथिल्य आणण्याकरिता वापरतात. |
ह्रदय परिणामक |
ह्रदय व रक्तवाहिन्यांवर परिणाम करणारी औषधे. |
आयुर्वेदीय वर्णन :औषध नाही असे एकही द्रव्य जगात नाही. ते शरीराला शक्य तितके जमेलसे करून युक्तीने द्यावे म्हणजे ते शरीरास शल्य न होता, रस, वीर्य, विपाक प्रभावाने किंवा स्वत: द्रव्यत: विकारनाश करते. शरीर त्याला पचवूनही त्याच्याकडून कार्य करून घेते. औषध स्वत:च्या रसादींपैकी जो गुण बलवान असेल त्याने कार्य करते. पण आहार रसादी कार्यासह स्वत: कार्य करते. औषधे शरीराचा घटक होतीलच असा नियम नाही. पण अन्न शरीराचा घटक होते. आहार शरीराला औषधापेक्षा जवळचा म्हणून औषध आहारासारखे जवळचे म्हणजे अनुकूल करून व आहाराबरोबर द्यावे. औषध जितके दूरचे तितका गुणाबरोबर त्याच्या अवगुणाचा परिणामही शरीराला भोगावा लागतो, अन्य रोगोत्पत्ती होते. ज्या औषधाने प्रस्तुत रोग वा दोष नष्ट होऊन अन्य रोग होतो ते औषध चांगले नाही. प्रस्तुत रोग नष्ट होऊन अन्य रोग करणार नाही ते औषध श्रेष्ठ होय.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
“