कांग्रा : कांग्डा. हिमाचल प्रदेश राज्याच्या कांग्रा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थान. लोकसंख्या ५,९९९ (१९७१). पठाणकोट डलहौसी अरुंदमापी लोहमार्गावर, पठाणकोटच्या पूर्वेस ९४ किमी. कांग्रा स्थानक असून ते धरमशालाच्या नैर्ऋत्येस ९० किमी. आहे. याचे प्राचीन नाव नगरकोट. येथे काटोच या राजपूत राजांचे राज्य होते. भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी वज्रेश्वरी देवीचे धनसंपन्न मंदिर तसेच किल्ला मुहंमद गझनीने १००९ मध्ये आणि फिरोझशाह तुघलकाने १३५० मध्ये लुटला होता. १९०५ मध्ये शहर भूकंपाने नष्टप्राय झाले होते. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत, विशेषतः राजा संसारचंदाच्या कारकीर्दीत, येथील चित्रशैली ख्याती पावली. पृष्ठभागी हिमालय, बाणगंगेचे समृद्ध खोरे आणि अरण्याने नटलेली सृष्टिशोभा पाहण्यासाठी आजही कांग्रा येथे प्रवाशांची वर्दळ असते.

शाह, र. रू.