काऊबेरी : (इं.मौंटन क्रेनबेरी, पॅर्ट्रिजबेरी, फॉक्सबेरी लॅ. व्हॅक्सिनम व्हायटिस-इडिया कुल-एरिकेसी). सु.१५—२२ सेंमी. लांब व जमिनीवर पसरणाऱ्या ह्या सदापर्णी गुळगुळीत ओषधीय [→ ओषधि] वनस्पतीचा प्रसार शीत कटिबंधातील प्रदेश ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यू इंग्लंड, मिनेसोटाचा किनारा व पर्वत प्रदेश तसेच ब्रिटन, उ. यूरोप इ. प्रदेशांत आहे. पाने चिवट, अंडाकृती किंवा मुकुलाकृती, विशालकोनी, वरून गर्द हिरवी व चकचकीत आणि खालून काळसर केसाळ फुले घंटाकृती, पांढरी किंवा गुलाबी, शेंड्याखालच्या भागात आखूड मंजरीवर येतात मृदुफळ गर्द लाल व आंबट. फळे शिजवलेली नसल्यास काहीशी कडवट लागतात. उत्तर अमेरिकेत त्यांचे लोणचे, जेली व इतर टिकाऊ खाद्य पदार्थ करतात. सामान्य ⇨क्रेनबेरीऐवजीही हिचा उपयोग करतात. गॅस्पे किनारा व सेंट लॉरेन्स आखाताच्या उत्तर किनाऱ्यावरचे कोळी लोक स्वतःकरिता व विक्रीकरिता काऊबेरी फळे मोठ्या प्रमाणावर मिळवतात. उ.कॅनडात सर्वत्र शिकारी, भटके आणि मूळचे इंडियन लोक अनेकदा या फळांवर उपजीविका करतात. स्कॅंडिनेव्हियन देशांत या फळांना विशेष महत्त्व आहे. बागेत शोभेकरिता ही झाडे रांगेने लावतात. कारण त्यांची गर्द हिरवी पाने व चमकदार रंगीत फळे यांचे मिश्रण आकर्षक दिसते.
पहा : एरिकेलीझ.
जमदाडे, ज. वि.