कॅल्कोपायराइट : (कॉपर पायराइट).  खनिज.  स्फटिक चतुष्कोणीय फानरुपी सामान्यतः चतुष्फलकांसारखे दिसतात (पहा : आकृती).  (111) फानीफलक मोठे, निस्तेज किंवा ऑक्सिडीभूत व (111) फानीफलक लहान व तेजस्वी असतात  [→  स्फटिकविज्ञान] .  (111) यमलनपृष्ठाचे यमल (जुळे स्फटिक) स्पिनेलाच्या यमलासारखे दिसतात.  कधीकधी त्यांच्यात पुनरावृत्त पंचकडी आढळते.  (101) यमलनपृष्ठाचे यमल बहुधा पुनरावृत्त व (110) यमलनपृष्ठाचे यमल अन्योन्यवेशी (एकमेकांत घुसलेले) असतात.  सामान्यतः संपुंजित व अनाकार राशींच्या व कधीकधी गुच्छाकार किंवा वृक्ककार (मूत्रपिंडाच्या आकाराच्या) स्वरूपात आढळते. पाटन : (201)  [→ पाटन] . मंजन खडबडीत.  ठिसूळ.   कठिनता ३⋅५-४. वि. गु. ४⋅३. अपारदर्शक. चमक धातूसारखे.  रंग पितळेसारखा मलिनपृष्ठे काशासारखी किंवा रंगदीप्त दिसतात (त्यावर निरनिराळे रंग दिसतात). कस हिवट काळा. रा. सं. CuFeS2  पुष्कळदा याचे पायराइटाशी मिश्रण झालेले आढळते. क्वचित यात अल्पसे सोने, चांदी, थॅलियम किंवा सिलिनियम असते. सोन्यासारखे किंवा पायराइटासारखे दिसते म्हणून याला कधीकधी ‘फूल्स गोल्ड’ (मूर्खाचे सोने) असेही म्हणतात. परंतु कॅल्कोपायराइट ठिसूळ असून त्याचा कस सोन्यापेक्षा भिन्न व कठिनता पायराइटापेक्षा कमी असते. हे मुख्यतः धातवीय खनिज शिरांमध्ये आढळते.  हे पेग्मटाइटांच्या भित्ती, संस्पर्शीरूपांतरित निक्षेप (साठे) इत्यादींतही आढळते.  हे सल्फाइडे, क्वाॅर्ट्‌झ, कॅल्साइट, सिडेराइट, तांब्याची अन्य खनिजे इत्यादींच्या जोडीने आढळते. कॅल्कोपायराइट सामान्यतः प्राथमिक स्वरूपाचे असते.निरनिराळ्या बदलांमुळे ह्याच्यापासून तांब्याची बरीच द्वितीयक खनिजे निर्माण होतात. कॉर्नवॉल (इंग्लंड), फालन (स्वीडन), रीऊ टींटू (स्पेन), (बोहीमिया), सॅक्सनी, द. आफ्रिका, ऱ्होडेशिया, चिली इ. ठिकाणी याचे महत्त्वाचे साठे आहेत. पितळ या अर्थाचा ग्रीक शब्द व पायराइट्‌स या शब्दांवरून हे नाव पडले.

कॅल्कोपायराइटाचा स्फटिक.

ठाकूर, अ. ना.