कॅलेंडर, ह्यू लाँगबोर्न : (१८ एप्रिल १८६३ – २१ जानेवारी १९३०). ब्रिटिश भौतिकी विज्ञ. उष्णता व ऊष्मागतिकी (उष्णतेच्या यांत्रिक व इतर प्रकारच्या असणाऱ्या संबंधांचे गणितीय विवरण करणारे शास्त्र) यांसंबंधीच्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म हॅथेरॉप (ग्लॉस्टशर) येथे झाला. मार्लबरो आणि केंब्रिज येते शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मॅकगिल विद्यापीठ, माँट्रिऑल (१८९३ – ९८), लंडन विद्यापीठ (१८९८ – १९०२) व १९०२ पासून इंपीरियल कॉलेज ऑफ सायन्स येथे भौतिकीच्या प्राध्यापकपदावर काम केले.
अचूकपणे तपमान मोजण्यासाठी त्यांनी प्लॅटिनमाचा विद्युत् रोध तपमापक व कॅलेंडर ग्रिफिथ या नावाने प्रसिद्ध असलेला विद्युत् सेतू तयार केला. बार्न्झ यांच्या समवेत तयार केलेल्या कॅलेंडर-बार्न्झ विद्युत् अखंड प्रवाह उष्णता मोजण्याची एक नाविन्यपूर्ण व अधिक सोईस्कर पद्धत शोधून काढली. वाफेसंबंधी संशोधन करून त्यांनी एक महत्वाचे सूत्र मांडले व १९१५ मध्ये पहिली वाफ-कोष्टके (वाफेच्या निरनिराळ्या गुणधर्मांसंबंधी माहिती देणारी कोष्टके) प्रसिद्ध केली. त्यांनी एक वायू तपमापक व प्रारित (तरंगरूपाने उत्सर्जित झालेली) उष्णता मोजण्यासाठी एक प्रारण तुला तयार केली होती. अंतर्ज्वलन (ज्या एंजिनात इंधनाचे ज्वलन त्यातील सिलिंडरामध्येच होते असे) एंजिन, तापक्रम (तपमानाच्या अंशांची श्रेणी), बाष्पदाब इ. उष्णतेसंबंधीच्या विषयांवर त्यांनी अनेक निबंध प्रसिद्ध केले.
रॉयल सोसायटीच्या फेलोपदावर १८९४ मध्ये त्यांची निवड झाली व १९०६ साली सोसायटीच्या रम्फर्ड पदकाचा त्यांना बहुमान मिळाला. ते लंडन येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.