कॅलॅमाइटेलीझ : पुराजीव महाकल्पात (सु. ६०–२४.५ कोटी वर्षांपूर्वी) अस्तित्वात असलेल्या पण आता फक्त जीवाश्मरूपात (अवशेषरूपात) आढळणार्‍या वाहिनीवंत (पाणी वा अन्नाची ने–आण करणारी शरीरघटक असणार्‍या) अबीजी वनस्पतींचा [ → टेरिडोफायटा] एक विलुप्त गण. मुख्यतः उत्तर गोलार्धातील डेव्होनियन (सु. ४२–३६⋅५ कोटी वर्षांपूर्वी) व कार्‌बॉनिफेरस (सु.३५ – ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत त्या वनस्पतींच्या पानांचे, खोडांचे व शंकूचे (काहीशा लांबट अक्षावरील बीजुक म्हणजे लाक्षणिक प्रजोत्पादक भाग किंवा परागधारक खवल्यांचे वा छदांचे म्हणजे फुले किंवा फुलोरे ज्याच्या बगलेत येतात अशा पानांचे) जीवाश्म सापडतात. त्या ओषधीय [→ ओषधि] किंवा लहानमोठ्या वृक्षाप्रमाणे असून दलदलीत वाढत होत्या. वृक्षांची उंची सु. २०–३० मी. व व्यास एक मी. पर्यंत असून त्यावर बहुधा फांद्यांची व सदैव लहान आणि साध्या, सुट्या किंवा तळाशी जुळलेल्या पानांची मंडले होती. प्रत्येक मंडलात सु. ६–४० पाने असून प्रत्येक पान १० सेंमी. पर्यंत लाबं व अरुंद होते. जमिनीत वाढणार्‍या जाडजूड व शाखायुक्त मूलक्षोडापासून [→ खोड] जमिनीवर हवेत वाढणारे खोड व अनेक आंगतुक मुळे होती. विद्यमान ⇨एक्‍विसीटम वंशाशी ह्या वनस्पतींचे बाह्यस्वरूप व अंतर्रचना या बाबतींत साम्य आहे. मात्र आकाराने कित्येक जाती फार मोठ्या असून त्यांमध्ये द्वितीयक वृद्धी (लांबी वाढावयाची थांबून व आद्य पेशी समूहाचे विभेदन झाल्यावर खोड किंवा मुळाचा व्यास वाढणे) आढळते. कॅलॅमाइटस हा प्रमुख वंश असून खोड त्या नावाने, पाने ॲन्युलॅरिया  आणि शंकू कॅलॅमोस्टॅचीस पॅलिओस्टॅकिया कॅलॅमोकार्‌पॉन या वंशनामांनी ओळखली जातात. शंकूमध्ये एका अक्षावर अनेक वंध्य (वांझ) छदे व बीजुककोशदंड (बीजुके धारण करणार्‍या पिशवीसारख्या भागाचा देठ) यांची मंडले एकाआड एक असतात क्वचित छदे नसतात. काही जातींत समान व काहींत असमान बीजुके पण कॅलॅमोकार्‌पॉनमध्ये असम बीजुकत्व (एकापेक्षा जास्त प्रकारची बीजुके तयार होणे) व बीजानुकरण आढळते. विद्यमान एक्‍विसीटमसारख्या वनस्पती आणि कॅलॅमाइटेलीझ समान पूर्वजापासून अवतरल्या असाव्या असे हल्ली मानतात. भूवैज्ञानिक पुराव्यावरून मात्र कॅलॅमाइटेलीझ हेच पूर्वज असावेत असे दिसते.

कॅलॅमाइटेलीझ : (१) शंकू, फांद्या व पानांसह संधियुक्त खोड, (२) खोडातील भेंडावरचा ससीता (खाचयुक्त) पृष्ठभाग, (३) व (४) शंकूच्या उभ्या छेदाचा काही पुनःस्थापित भाग, (३ -कॅलॅमोस्टॅचीस व ४ - पॅलिओस्टॅकिया).

पहा : एक्‍विसीटेलीझ पुरावनस्पतिविज्ञान.

  

वर्‍हाडपांडे, द. गो.