गडगडाटी वादळ : मेघगर्जना होऊन एक वा अनेक वेळा वीज चमकणे या आविष्कारास गडगडाटी वादल असे म्हणतात. गडगडाटी वादळ असे म्हणतात. गडगडाटी वादळाबरोबर कधीकधी एकदम सोसाट्याचा थंड वारा वाहतो, सामान्यतः पर्जन्याच्या जाेरदार सरी पडतात. पर्जन्याच्या सरींबरोबर क्वचितप्रसंगी गारांचीही वृष्टी होते. परंतु केव्हा केव्हा हा आविष्कार पर्जन्यरहितही असतो. सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, तडिताघात, पर्जन्य किंवा गारांची वृष्टी, भूपृष्ठावरील हवेच्या तापमानात झपाट्याने पडणारा उतार यांमुळे गडगडाटी वादळ हा एक लक्षणीय आविष्कार आहे.

गडगडाटी वादळात प्रचंड शक्ती मुक्त केली जाते. दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या अणुबाँबच्या शक्तीपेक्षा (२०,००० टन टीएनटी स्फोटकाच्या शक्तीपेक्षा) दहापट शक्ती चांगल्या विकसित गडगडाटी वादळात मुक्त केली जात असावी.

गडगडाटी वादळास कारणीभूत होणाऱ्या मेघास गर्जन्मेघ वा ऐरणी मेघ असे म्हणतात. हा एक उत्तुंग वाढणाऱ्या मेघाचा प्रकार आहे. त्याचा विकास ऊर्ध्व (उभ्या) दिशेने वाढणाऱ्या राशिमेघापासून होतो. गर्जन्मेघाचा तळ आर्द्र हवेत भूपृष्ठापासून ३३० ते ९०० मी. असतो, साधारण कोरड्या हवेत २,००० ते ४,००० मी. असतो. ह्या ढगाचा माथा वैषुव  (५ उ. ते ५ द.मधील)-उपवैषुव (५ उ. किंवा ५ द. पासून उर्वरित उष्ण कटिबंधीय) प्रदेशात २० किमी. उंचीपर्यंत, समशीतोष्ण कटिबंधात सु. १२ किमी. उंचीपर्यंत व ध्रुवीय प्रदेशात त्यापेक्षा कमी उंचीपर्यंत असतो. गडगडाटी वादळाचा क्षैतिज (क्षितिज समांतर) विस्तार आणि व्यापलेले क्षेत्र साधारपणे अनुक्रमे ५ ते ८ चौ.किमी. व २५ ते ६४ चौ.किमी. इतके असते. गर्जन्मेघाखालच्या भागात ०º से. तापमानापेक्षा अधिक तापमान असलेले जलबिंदू असतात. मधल्या भागात ० ते –२० से. तापमानाचे म्हणजे अतिशीतित अवस्थेतील जलबिंदू (० से. तापमानापेक्षा कमी तापमान असतानाही द्रवावस्थेत असलेल्या पाण्याचे बिंदू) असतात. माथ्याजवळील भागात –२० से. तापमानापेक्षा कमी तापमान असलेले हिमकण किंवा हिमस्फटिक इतस्ततः वावरत असतात. गर्जन्मेघाचा माथा एखाद्या ऐरणीसारखा पसरलेला दिसतो. तो अतिशीत हिमकणांचा बनलेला असल्यामुळे रेशमाच्या तंतूंच्या झुबक्यासारखा दिसतो. गर्जन्मेघामध्ये कित्येक हजार घ.मी.पाणी हवेच्या ऊर्ध्व प्रवाहांमुळे तोलून धरलेले असते. हवेचे हे ऊर्ध्व प्रवाह सेकंदास ६ मी. पासून १५ मी. इतक्या वेगाचे असतात. कधीकधी त्यांचा वेग दर सेकंदाला ३५ मी. पर्यंत वाढतो. ऊर्ध्व प्रवाहाच्या गतीचे सरासरी मूल्य प्रतिसेकंदास ८ मी. इतके असते. गडगडाटी वादळात पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही. काही ठिकाणी अतोनात पाऊस पडतो, तर काही भाग कोरडेच राहतात.

राशिमेघाचा गर्जन्मेघात विकास होत असताना मेघात धन व ऋण विद्युत् भार अलग होतात आणि मेघाच्या निरनिराळ्या भागांवर विजातीय विद्युत् भार जमा होऊ लागतो. मेघातील जलबिंदूंवर विद्युत् भार निर्माण होण्यासाठी मेघाच्या माथ्याचे तापमान –२० से. पेक्षा कमी असावे लागते. परंतु वैषुव-उपवैषुव प्रदेशात गर्जन्मेघाच्या माथ्याचे तापमान यापेक्षा अधिक असतानाही त्या मेघांमध्ये विजा चमकल्याच्या विश्वसनीय नोंदी आढळल्या आहेत.

गडगडाटी वादळे निर्माण होण्यास आवश्यक परिस्थिती : गर्जन्मेघ आणि तज्‍जन्य गडगडाटी वादळ निर्माण होण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता असते (१) हवा ‘अस्थिर’ म्हणजे ऊर्ध्व प्रवाह निर्माण होण्यास अनुकूल असावी लागते. ऊर्ध्व दिशेचा तापमान ऱ्हास १० से./ किमी. पेक्षा अधिक असावा लागतो. (२) भूपृष्ठाजवळील हवेत बरेचसे जलबाष्प असावे लागते व (३) हवेचे ऊर्ध्व प्रवाह निर्माण होण्यास काही चालना मिळावी लागते. अशी चालना उन्हाळ्यात दुपारी जमिनीलगतची हवा खूपतापली म्हणजे मिळते डोंगर, टेकड्या इत्यादींवरून वारे वर परावर्तित झाल्यामुळे मिळते किंवा सीमापृष्ठामुळे उष्णार्द्र हवेचे यामिक (यांत्रिक रीत्या) उत्थापन झाल्यामुळे मिळते. सीमापृष्ठ म्हणजे उष्णार्द्र हवा व शीतशुष्क हवा विभक्त करणारे पृष्ठ. शीत सीमापृष्ठावर जडतर वेगवान शीत हवा उष्णार्द्र हलक्या हवेच्या खाली शिरून तिला यांत्रिक रीत्या वर उचलते व गर्जन्मेघ निर्माण करण्यास कारणीभूत होते. उष्ण सीमापृष्ठावर वेगवान हलकी उष्णार्द्र हवा जडतर शीत वायुराशीवरून सरकत वर चढत जाते व अस्थिर हवेत गर्जन्मेघ निर्माण करते.

   

उष्ण आणि आर्द्र हवेच्या अभिसारी (वातचक्राच्या केंद्रीय प्रदेशाकडे जाणाऱ्या) प्रवाहांमुळे गर्जन्मेघ निर्माण होतात. अभिसरणामुळे उष्णार्द्र हवा वर उचलली जाते. विवक्षित पातळीपलीकडे हवा उचलली गेल्यास संघनन (द्रवीभवन) आणि संनयन (उष्ण हवा वर जाऊन तिची जागा थंड हवेने घेणे) या क्रियांमुळे गर्जन्मेघ निर्माण होतात व अनुकूल परिस्थितीत गडगडाटी वादळांचा प्रादुर्भाव होतो. उष्णार्द्र वायुप्रवाहांच्या मार्गात पर्वतरांगांचा अडथळा आल्यास हवा पर्वतांची चढण पार करून खूप वर जाते. तेथे संघनन व संनयन क्रियांमुळे गर्जन्मेघ तयार होऊन शेवटी गडगडाटी वादळ निर्माण होते.

गर्जन्मेघाचा विकास : गर्जन्मेघाचा विकास तीन अवस्थांतून होतो (१) राशिमेघ अवस्था अथवा विकासोन्मुख अवस्था, (२) परिणतावस्था व (३) ऱ्हासावस्था. या तिन्ही अवस्था आ.१ मध्ये अनुक्रमे दाखविल्या आहेत. साधारणपणे गर्जन्मेघांची आयुर्मर्यादा १ ते २ तासांची असते. वर उल्लेखिलेल्या पहिल्या दोन विकासावस्थांना १५ ते २० मिनिटे लागतात. तोपर्यंत ढगाची उंची ९ ते १८ किमी. पर्यंत गेलेली असते. क्षैतिज विस्तारही काही किमी. पर्यंत झालेला असतो. शेवटच्या अवस्थेची कालमर्यादा अनिश्चित असते. काही गडगडाटी वादळे लवकरच शमतात, काही वादळे मात्र अनेक तासापर्यंत अधूनमधून पाऊस पाडीत रेंगाळत राहिलेली दिसतात. हा कालावधी ज्या वायुराशींत गर्जन्मेघ निर्माण होतात त्यांच्या गुणधर्मांवर अवलंबून असतो.

(१) राशिमेघ अवस्था अथवा विकासोन्मुख अवस्था : गर्जन्मेघाची सुरुवात सामान्य राशिमेघापासून होते. अनेक राशिमेघांपासून एखादाच राशिमेघ गर्जन्मेघात विकास पावतो. विकासोन्मुख अवस्थेत मेघातील हवा बाह्य हवेपेक्षा उष्ण असते. त्यामुळे ढगामध्ये हवेचे ऊर्ध्व प्रवाह सुरू होतात. ढगामध्ये अधिक उंचीवरील हवेचे ऊर्ध्व प्रवाह अधिक जोरदार असतात. ढगाची उंची जसजशी वाढत जाईल तसतसे त्याच्या माथ्याचे तापमान ० से. पेक्षा कमीकमी होत जाते. तापमान -२० से.च्या खाली जाऊ लागले की, ढगामध्ये विद्युत् भार उत्पन्न होण्यास सुरुवात होते. मध्यंतरीच्या काळात ढगामध्ये मेघकणिका (मेघवस्तूचे बारीक कण), पर्जन्यबिंदू व हिमकण किंवा हिमस्फटिक यांच्या स्वरूपात प्रचंड प्रमाणात पाणी साचू लागते. कालांतराने ही जलराशी एवढी प्रचंड होते की, तीमधील मोठे जलबिंदू तोलून धरण्यास हवेचे वेगवान ऊर्ध्व प्रवाह असमर्थ ठरतात व परिणामी मोठे थेंब ढगातून खाली कोसळू लागतात. कोसळणाऱ्या थेंबांमुळे त्यांच्या भोवतालची हवाही घर्षणामुळे खाली ओढली जाते. ढगात थंड हवेचे अधःप्रवाह सुरू होतात व गर्जन्मेघाच्या विकासातील ‘परिणतावस्था’ सुरू होते. अधःप्रवाह साधारणपणे प्रतिसेंकदाला १५ मी. इतपत वेगाचे असतात.

आ. १. गडगडाटी वादळाशी निगडित असलेल्या गर्जन्मेघाच्या तीन अवस्था : (अ) विकासोन्मुख अवस्था, (आ) परिणतावस्था, (इ) ऱ्हासावस्था 


(२) परिणतावस्था : या अवस्थेत ढगाच्या काही भागात हवेचे ऊर्ध्व प्रवाह व काही भागात हवेचे अधःप्रवाह एकाच वेळी अस्तित्वात आलेले असतात. ढगातील उंच भागांवरील थंड व आर्द्र हवा पर्जन्यपातामुळे अधःप्रवाहाच्या रूपाने खाली ढकलली जाऊन ती जमिनीवर पसरू लागते. थंड हवेचा हा अधःप्रवाह वेगवान क्षैतिज वाऱ्यांच्या स्वरूपात जमिनीवर अकस्मात येऊन पोहोचतो. त्याच्या आगमनानंतर स्थानिक तापमान एकदम खाली उतरते, आर्द्रता वाढते, वाऱ्याच्या दिशेत एकाएकी बदल होऊन वेगात क्षणिक वाढ होते. हवेचा दाब वाढतो. नंतर पर्जन्याच्या सरी कोसळू लागतात. परिणतावस्थेत कालांतराने हवेचे अधःप्रवाह बळावतात व ऊर्ध्व प्रवाह क्षीण होतात. सरतेशेवटी ऊर्ध्व प्रवाह नाहीसे होतात व संपूर्ण ढगात अधःप्रवाहांचाच जोर होऊन गर्जन्मेघ ऱ्हासाच्या तिसऱ्या अवस्थेत जातो.

(३) ऱ्हासावस्था : या अवस्थेत ढगातील जलराशी कमी झाल्यामुळे पावसाच्या सरींचा जोर कमी होतो व अखेर गर्जन्मेघ भंग पावून त्याच्या माथ्याजवळचे अवशेष अनेक तंतुमेघांच्या स्वरूपात व तळाचे अवशेष छिन्न मेघखंडांच्या स्वरूपात तरंगू लागतात. थंड अधःप्रवाह पृष्ठभागावर वेगवान क्षैतिज वाऱ्यांच्या रूपाने कसा पसरतो ते आ.२ मध्ये दाखविले आहे.

आ. २. गर्जन्मेघातील अधःप्रवाहामुळे निर्माण झालेल्या वेगवान क्षैतिज पृष्ठभागीय थंड वाऱ्यांचे स्वरूप.

गर्जन्मेघाच्या विकासाच्या तीनही अवस्थांचे वर दिलेले वर्णन केवळ एकच संनयनी कोश (ऊर्ध्व दिशेने जाणाऱ्या वायुप्रवाहाचे क्षेत्र) असलेल्या गर्जन्मेघाच्या बाबतीतच लागू होते. प्रत्यक्षात अनेक संनयनी कोशांचा समूह गडगडाटी वादळात सामाविलेला असतो. आ. ३ मध्ये (पृष्ठ ८००) ५ कोशांचा समूह असलेल्या गडगडाटी वादळाचे नमुनेदार स्वरूप दाखविले आहे. कोश १ मध्ये जुन्या गर्जन्मेघाची ऱ्हासावस्था दाखविली आहे. त्यात नुसते अधःप्रवाह दिसतात. कोश ५ मध्ये केवळ ऊर्ध्व प्रवाहच दृगोचर होत आहेत. त्या ठिकाणी गर्जन्मेघ नुकताच विकास पावत आहे. इतर ३ कोशांमध्ये परिणतावस्थेतील गर्जन्मेघात एकाच वेळी ऊर्ध्व प्रवाह आणि अधःप्रवाह शेजारी शेजारी असलेले दिसत आहेत. साधारणपणे अधःप्रवाहांच्या अग्रभागी किंवा पुढच्या बाजूसच नवीन संनयनी कोशांची मालिका निर्माण होते.  आ. ३. दिनांक १४ ऑगस्ट १९४७ रोजी विल्मिंगटन (ओहायओ) येथे झालेल्या ५ कोशांचा समूह असलेल्या गडगडाटी वादळाचे स्वरूप.

ही प्रवृत्ती आ.२ व ३ वरून स्पष्टपणे दिसू शकते. पूर्ण विकसित गर्जन्मेघातील अधःप्रवाहातून निर्माण झालेला थंड क्षैतिज वायुप्रवाह पुढे असलेल्या ऊष्णार्द्र हवेच्या खाली घुसून तिला ऊर्ध्व दिशेने जाण्यासाठी चालना देऊ शकतो आणि वाऱ्याच्या दिशेने अनेक गर्जन्मेघ निर्माण करू शकतो. त्यामुळे गर्जन्मेघांचे जुने कोश लय पावतात आणि नवे कोश उदयास येतात. परिणामी प्रत्येक गर्जन्मेघाची आयुर्मर्यादा जरी १-२ तासांची असली, तरी नवेनवे गर्जन्मेघ उत्पन्न होत असल्यामुळे गडगडाटी वादळाचा कालावधी लांबतो. गडगडाटी वादळामुळे पडणाऱ्या पावसाचे वितरण अत्यंत विषम प्रमाणात होते ते यामुळेच.

गडगडाटी वादळांचे प्रकार : गडगडाटी वादळांचे एकूण तीन प्रकार आहेत. (१) वायुराशीमधील गडगडाटी वादळे, (२) अनेक-सरी गडगडाटी वादळे, (३) सीमापृष्ठीय गडगडाटी वादळे.

(१) वायुराशीमधील गडगडाटी वादळे : तापमान व आर्द्रतेच्या दृष्टीने एकविध असणाऱ्या वायुराशीत भूपृष्ठाच्या विषम तापण्यामुळे विखुरलेले गर्जन्मेघ व तज्‍जन्य गडगडाटी वादळे उन्हाळ्यात बव्हंशी दुपारी निर्माण होतात. अशा गडगडाटी वादळांना वायुराशीमधील गडगडाटी वादळे असे म्हणतात. भूपृष्ठ तापल्यामुळेच हवेत ऊर्ध्व प्रवाह निर्माण होण्यास चालना मिळून गडगडाटी वादळे अस्तित्वात येतात.


(२) अनेकसरी गडगडाटी वादळे : काही देशांत नीच पातळीवर वाहणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेने गडगडाटी वादळांच्या अनेक समांतर ओळी निर्माण होतात. उत्तर अमेरिकेत या प्रकारची गडगडाटी वादळे वायुराशीतील गडगडाटी वादळांपेक्षा अधिक वेळा दृष्टोत्पत्तीस येतात. या प्रकारच्या वादळांची तीव्रताही अधिक असते. अशी वादळे दिवसाच्या कोणत्याही वेळेस निर्माण होत असली. तरी विशेषतः दुपारच्या वेळी तापमान उच्च असताना ती अधिक संख्येने निर्माण होतात.

(३) सीमापृष्ठीय गडगडाटी वादळे : उपध्रुवीय प्रदेशात व समशीतोष्ण कटिबंधात शीत वायुराशी व उष्ण वायुराशी यांच्यामध्ये जी दोन प्रकारची सीमापृष्ठे निर्माण होतात, त्यांना शीत सीमापृष्ठ आणि उष्ण सीमापृष्ठ म्हणतात. शीत सीमापृष्ठाच्या ठिकाणी आक्रमक थंड हवा उष्ण हवेखाली घुसून तिला वरवर उचलीत असते. त्यामुळे शीत सीमापृष्ठावर गर्जन्मेघ निर्माण होऊन अनेक गडगडाटी वादळे जन्मास येतात. उष्ण सीमापृष्ठावर उष्णार्द्र हवा स्वयंचलित रीतीने थंड वायुराशीवर चढत असल्यामुळे अल्प प्रमाणात गर्जन्मेघ आणि तज्‍जन्य गडगडाटी वादळे निर्माण होतात. सीमापृष्ठीय गडगडाटी वादळे सीमापृष्ठाबरोबर सरकत जात असल्यामुळे ती दिवसाच्या कोणत्याही वेळी एखाद्या स्थानी पोहोचतात. वैषुव-उपवैषुव प्रदेशात वरील प्रकारची भिन्नभिन्न वायुराशींची सीमापृष्ठे साधारपणे स्पष्ट स्वरूपात अस्तित्वात नसल्यामुळे तेथे या प्रकारची वादळे संभवत नाहीत. तेथे मुख्यत्वेकरून वायुराशीमधील गडगडाटी वादळेच आढळतात. आंतरउष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्रात गडगडाटी वादळे जास्त संख्येने निर्माण होतात. काही ठिकाणी अवदाबक्षेत्रांच्या (वातावरणीय दाब कमी असलेल्या क्षेत्रांच्या) किंवा अभिसारी चक्रवातांच्या [→चक्रवात] आगमनापूर्वी गडगडाटी वादळे संभवतात.

गडगडाटी वादळातील विद्युत् भार व तडिताघात :गर्जन्मेघाच्या माथ्याचे तापमान –२८ से. राहील इतक्या उंचीपर्यंत गर्जन्मेघ वाढल्याशिवाय तडिताघात सहसा होत नाहीत. गर्जन्मेघात धन व ऋण विद्युत् पृथक् पृथक् झालेली असते. सामान्यतः –२० से. तापमान असलेल्या ढगाच्या वरच्या भागातील हिम व बर्फाच्या कणांवर धन विद्युत् भाराचे केंद्र व हिमरेषेच्या (०से. तापमान असलेल्या पातळीच्या) जवळपासच्या ० ते –१० से. तापमानाच्या भागांतील पर्जन्याच्या थेंबांवर ऋण विद्युत् भाराचे केंद्र निर्माण होते. गर्जन्मेघात विद्युत् भाराची हीच मुख्य केंद्रे असतात आणि पहिला तडित-क्षेप ह्या दोन केंद्रांमधून होतो. तडिताघातासाठी विद्युत् भाराची प्रातिनिधिक मूल्ये २० ते ३० कुलंबपर्यंत असतात. सर्वांत अधिक तडिताघात अती वेगवान ऊर्ध्व प्रवाहांच्या आणि जोरदार वृष्टीच्या क्षेत्रात आढळतात. क्वचित प्रंसगी ढगाच्या तळाजवळच्या अल्पशा भागात धन विद्युत् भार असल्याचेही आढळून आले आहे. काही संशोधकांच्या मताप्रमाणे गर्जन्मेघात निर्माण होणारा विद्युत् भार पुढील विविध कारणांमुळे होत असावा (१) जलबिंदूंकडून व हिमकणांकडून वातावरणातील निवडक विद्युत् भारित कणांचा ग्रास होणे, (२) हवेच्या घर्षणामुळे मोठे थेंब फुटणे, (३) शीत जलबिंदू, अतिशीतित जलबिंदू आणि हिमकण अशा ढगातील पाण्याच्या निरनिराळ्या अवस्थांतील पृष्ठ व आकारमान यांच्या परस्पर संबंधांमुळे विद्युत् भाराची निर्मिती होणे.

 

वरील सर्वच कल्पनांना प्रायोगिक पुरावा व आधार मिळालेला आहे. परंतु गर्जन्मेघावर प्रत्यक्ष आढळणाऱ्या विद्युत् भारात वरील प्रत्येक कारणाचा किती वाटा असेल याबद्दल अजून निश्चित कल्पना आलेली नाही.

आकाश निरभ्र असताना पृथ्वीवर नक्त (निव्वळ) ऋण विद्युत् भार असतो व हवेमध्ये नक्त धन विद्युत् भार असतो. यामुळे प्रत्येक मी. उंचीस १०० व्होल्ट एवढी विद्युत् वर्चसीय प्रवणता (एक मी. अंतर असलेल्या दोन बिंदुस्थानांवरील विद्युत् वर्चसामधील म्हणजे विद्युत् स्थितींमधील फरक) समुद्रसपाटीजवळील हवेत आढळते. उंचीप्रमाणे ती कमीतकमी होत जाते. गडगडाटी वादळाच्या वेळी ही विद्युत् वर्चसीय प्रवणता प्रत्येक मी. उंचीस १०,००० ते ३०,००० व्होल्ट इतकी तीव्र बनते. विजा चमकतात त्या वेळी बहुधा ढगाच्या दोन भागांमध्येच तडिताघात होऊन विद्युत् भाराचे विसर्जन होते (साठून राहिलेला विद्युत् भार नाहीसा होतो). ढगातून जमिनीवर तडिताघात त्या मानाने अल्प संख्येने होतात. तडिताघाताच्या वेळी विद्युत् वर्चसीय प्रवणता प्रत्येक सेंमी.ला १०,००० ते ३०,००० व्होल्ट होते व तिच्यामुळे हवेचा विद्युत् रोध मोडला जाऊन फक्त ऋण विद्युत् ढगातून जमिनीकडे वाहून नेली जाते. तडितेच्या प्रत्येक चमकेबरोबर ५ ते २०० कुलंबच्या विद्युत् भाराचे स्थानांतर होते. अशा विद्युत् भाराचे सरासरी मूल्य २५ कुलंबइतके भरते. विजेचे प्रत्येक चमकणे म्हणजे वास्तविक अलग अलग तडिताघातच असतात. अशा दोन आघातांमधला काळ सु. १/५० सेंकद असतो [→ तडित् ].

गडगडाटी वादळ स्थानिक आहे की दूरचे आहे हे ठरविण्यासाठी प्रकाशवेग व ध्वनिवेग यांमधील भिन्नतेचा उपयोग केला जातो. ढगात वीज चमकली म्हणजे ती आपणास जवळजवळ तत्क्षणीच दिसते. कारण प्रकाशवेग प्रतिसेकंदास ३ लक्ष किमी. एवढा आहे परंतु ध्वनिवेग प्रतिसेकंदास सु. ३३० मी. एवढा अल्प असल्यामुळे गडगडाट मागाहून ऐकू येतो. विजेचा लखलखाट दिसणे आणि मेघगर्जना ऐकू येणे यांमध्ये १० सेंकदांपेक्षा कमी काळ लोटत असला की, ते गडगडाटी वादळ स्थानिक आहे असे मानले जाते. गर्जन्मेघ ३०–४० किमी. अंतरावर असल्यास ढगांचे केवळ माथेच दिसतात. तेथील विजेचा लखलखाट दिसू शकतो, मेघगर्जना मात्र ऐकू येत नाही. सर्वसाधारण वातावरणीय परिस्थितीत १५ ते २० किमी. च्या अंतरानंतर मेघगर्जना ऐकू येत नाही. हवेत तापापवर्तन निर्माण झाल्यास म्हणजे हवेत उंचीप्रमाणे तापमान कमी न होता ते वाढत असल्यास मेघगर्जना ४० किमी. पर्यंत ऐकू येते.


भारतातील गडगडाटी वादळे : दक्षिण भारतात नैर्ऋत्य मॉन्सून वारे सुरू होण्यापूर्वी उन्हाळ्यात व नैर्ऋत्य मॉन्सून वारे माघार घेत असताना वायुराशीतील गडगडाटी वादळे होतात. उन्हाळ्यामध्ये बंगाल व निकटवर्ती प्रदेशांत होणारी गडगडाटी वादळे विशेष तीव्र असतात. ती वायव्येकडे निर्माण होऊन गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मुखाकडे सरकत येतात. या गडगडाटी वादळांमुळे बरीच हानी होते. साधारणपणे वैशाख महिना हा त्यांचा काळ असल्यामुळे त्यांना बंगाली भाषेत ‘कालबैशाखी’ म्हणजे ‘वैशाखातील विनाशकारी वादळे’ असे नामाभिधान मिळाले आहे. या वादळांशी निगडीत असलेल्या ⇨चंडवाताचा वेग ताशी १५० किमी. पर्यंत जाऊ शकतो. भारतात सर्वाधिक गडगडाटी वादळे आसाम व निकटवर्ती भागांत होतात. तेथे होणाऱ्या वार्षिक पर्जंन्याचा २/३ भाग गडगडाटी वादळाशी निगडीत झालेला असतो.

आ. ४. गडगडाटी वादळांचे जागतिक वितरण : सममूल्यांक रेषांचे आकडे गडगडाटी वादळांच्या दिवसांची टक्केवारी दर्शवितात

गडगडाटी वादळांची भौगोलिक वाटणी : सी. ई. पी. ब्रूक्स या जलवायुविज्ञांच्या अंदाजाप्रमाणे जगातील सर्वांत अधिक गडगडाटी वादळे उष्ण कटिबंधातील जावा बेटावर घडतात. तेथे प्रतिवर्षी सु. २२५ दिवशी गडगडाटी वादळे होतात असा अंदाज आहे. दरवर्षी गडगडाटी वादळांचे सरासरी दिवस मध्य आफ्रिकेत १५०, दक्षिण मेक्सिकोत १४२, पनामामध्ये १३५ व मध्य ब्राझीलमध्ये १०६ यांप्रमाणे आहेत. मध्य यूरोपात व आशिया खंडात सरासरीने वर्षातून २० पेक्षा कमी दिवशी गडगडाटी वादळे उद्‌भवतात. फ्लॉरिडाच्या द्वीपकल्पात व मेक्सिकोच्या आखाताच्या किनारी प्रदेशांवर प्रतिवर्षी ७० ते ८० दिवशी गडगडाटी वादळे निर्माण होतात. त्यांपैकी काही वादळांची ⇨घूर्णवाती वादळांत परिणती होते.

पृथ्वीवर प्रतिदिवशी सु. ५०,००० गडगडाटी वादळे घडत असावीत व प्रतिसेकंदास सु. १०० तडीताघात होत असावेत. कोणत्याही एका वेळेस सबंध जगात सु. १,८०० गडगडाटी वादळे आपला प्रभाव दाखवीत असतात.

ध्रुव प्रदेशांत गडगडाटी वादळे अगदी क्वचितच होतात. नीच अक्षांशांवरही काही क्षेत्रे अशी आहेत की, तेथे गडगडाटी वादळे क्वचितच होतात. सहारा वाळवंट, काराकुम वाळवंट व अरबस्तानातील वाळवंटे, दक्षिण आफ्रिकेचा पश्चिम किनारा या ठिकाणी हवा अत्यंत कोरडी असल्यामुळे व उच्च थरातील हवेचे अधोगमन होत असल्यामुळे तेथे गडगडाटी वादळे होत नाहीत. दक्षिण गोलार्धात ५० अक्षवृत्ताच्या दक्षिणेस सामान्यतः गडगडाटी वादळांचा प्रामुख्याने अभाव आढळला, तरी क्वचित प्रसंगी त्याच्यापलीकडील अंटार्क्टिका या दक्षिण ध्रुवीय खंडात तुरळक गडगडाटी वादळे घडल्याचे उल्लेख आहेत.

उत्तर गोलार्धात नोव्हाया झीमल्या व स्पिट्सबर्गेन या ७८ अक्षवृत्तावरील ठिकाणीही गडगडाटी वादळे होतात. वैषुव प्रदेशात गडगडाटी वादळे वारंवार होतात. वर्षभरात जावा बेटातील बॉइटेनझॉर्ख येथे १६७ दिवस, जाकार्तात १३८ दिवस, पश्चिम आफ्रिकेत ८ अक्षवृत्तावर असलेल्या बिस्मार्कबर्ग या ठिकाणी १६८ दिवस, मेक्सिकोत १३७ दिवस यांप्रमाणे गडगडाटी वादळे घडतात. त्या मानाने समशीतोष्ण कटिबंधात गडगडाटी वादळांची वार्षिक संख्या कमी असते.

स्थूलमानाने पाहता विषुवृत्तावर वर्षात १०० ते १५० दिवस, उपवैषुव प्रदेशांत ७५ ते १०० दिवस, समशीतोष्ण कटिबंधांत ३० ते ५० दिवस व ध्रुवीय प्रदेशांत अगदी थोडे दिवस असे गडगडाटी वादळांचे संख्याप्रमाण देता येईल.

आ. ४ मध्ये गडगडाटी वादळांचे जागतिक वितरण दिले आहे. वैषुव प्रदेशात उष्णार्द्र हवेमुळे सर्वाधिक प्रमाणात गडगडाटी वादळे उद्‌भवतात, तर दोन्ही गोलार्धांत ६०अक्षवृत्तानंतर ध्रुवांकडील शीत प्रदेशात त्यांची संख्या अतिशय कमी होते असे दिसून येईल. मध्य आफ्रिका हा गडगडाटी वादळांच्या दृष्टीने पृथ्वीवरील केंद्रप्रदेश दिसतो. सागरी प्रदेशांपेक्षा भूखंडीत प्रदेशांवरच गडगडाटी वादळे अधिक संख्येने उद्‍‌भवतात. विषुववृत्तीय पट्ट्यात सागरी प्रदेशांवर निर्माण होणाऱ्या गडगडाटी वादळाच्या तिप्पट वादळे जमिनीवर निर्माण होतात. सूर्य प्रखर तेजाने तळपत असताना जमिनीवरील वातावरणात अतिसुलभतेने अस्थिरता निर्माण होते, हे त्याचे कारण होय. उपोष्ण कटिबंधात येणाऱ्या भूखंडांच्या पश्चिम किनाऱ्यांवर गडगडटी वादळांची वारंवारता कमीच असते हेही लक्षणीय आहे.

गडगडाटी वादळांची पूर्वसूचना : गडगडाटी वादळ होण्यापूर्वी हवा आर्द्र होते व तापमान वाढते. तसेच वादळाच्या काही तास अगोदर मध्यम राशिमेघ अस्वाभाविकपणे मनोऱ्यासारखे वाढतात. हवेचा दाब कमी होतो, दृश्यताही कमी होते व विजा चमकण्यामुळे रेडिओ ग्रहणीमध्ये व्यत्यत येतो. गर्जन्मेघात ऊर्ध्व व अधःप्रवाहांमुळे मोठ्या प्रमाणावर संक्षोम (खळबळ) निर्माण होतो. विमान वाहतुकीला ही घटना धोक्याची असते. गडगडाटी वादळांपासून पाऊस पडण्यापूर्वी सोसाट्याचे वारे सुरू होतात किंवा विजांचा जोराचा कडकडाट होतो.

पहा : चक्रवात जलवायुविज्ञान तडित् वादळ वातावरणीय विद्युत्.

संदर्भ : 1. Battan, L. J. The Thunderstorm, New York, 1964.

     2. Byers, H. R. General Meteorology, New York, 1959.

     3. Byers, H. R. Ed., Thunderstorm Electricity,  Chicago, 1953.

     4. Petterssen, S. Introduction to Meteorology, New York, 1958.

गोखले, मो. ना.