शेरिंग्टन, सर चार्ल्स स्कॉट : (२७ नोव्हेंबर १८५७- ४ मार्च १९५२). ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिक. तंत्रिका तंत्राची रचना व कार्य यांसंबंधी विशेष संशोधन. विविध विकारांचे निदान आणि त्यावरील शल्यचिकित्सा यांच्या दृष्टीने ते अत्यंत उपयुक्त ठरले आहे. या कार्याबद्दलच त्यांना ⇨ एडगर डग्लस ॲड्रियन यांच्यासमवेत १९३२ सालचे शरीरक्रियाविज्ञान वा वैदयक या विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले.या संशोधनामुळे शरीरक्रिया विज्ञानही ज्ञानशाखा स्वतंत्र अभ्यासक्षेत्र म्हणून उदयास आली.
शेरिंग्टन यांचा जन्म इझ्लिंग्टन (लंडन) येथे झाला. त्यांनी १८८३ मध्ये केंब्रिज विदयापीठातून निसर्गविज्ञान या विषयात बी.ए. व नंतर वैदयकीय शिक्षण घेऊन एम्.बी. (१८८५) आणि एल्.आर्.सी.पी. (१८८६) या पदव्या संपादन केल्या. त्यांनी बर्लिन येथील रॉबर्ट कॉख आणि रूडोल्फ फिरखो यांच्या प्रयोगशाळांत शरीरक्रियाविज्ञान आणि सूक्ष्मजंतुशास्त्र या विषयांचे अध्ययन केले व नंतर सेंट थॉमस हॉस्पिटल (लंडन), लिव्हरपूल विदयापीठ आणि ऑक्सफर्ड विदयापीठ या ठिकाणी अध्यापन व संशोधन केले (१८९१-१९३५).
तंत्रिका तंत्राच्या कार्य पद्धतीचे विश्लेषण करताना शेरिंग्टन यांनी मानवात व वानरात ⇨ प्रतिक्षेपी क्रियां चा अभ्यास करून अशा क्रियांचे नियंत्रण व सुसूत्रीकरण मेंदूकडून कसे होते हे विशद केले. त्यांचे समकालीन सांत्यागो रामॉन इ काहाल यांनी तंत्रिका कोशिका हे तंत्रिका तंत्राचे संरचनात्मक एकक (सर्वांत लहान कार्यकारी घटक न्यूरॉन)असते हे दाखविले होते. त्याचप्रमाणे या तंत्रिका तंत्राचे कार्यात्मक एकक म्हणजे प्रतिक्षेपी क्रिया असे शेरिंग्टन यांनी दाखविले. तिच्यासाठी आवश्यक प्रतिक्षेपी चाप म्हणजे कमीत कमी दोन कोशिका (एक संदेश आणणारी व दुसरी पाठविणारी) आणि त्यांना जोडणारे संधिस्थान यांचे मिळून झालेले एकक होय. मेरूरज्जूत घडून येणाऱ्या प्रतिक्षेपी क्रियांचा अभ्यास करून त्यांनी अशा अनेक प्रतिक्षेपी घटकांचे एकत्रीकरण होऊन हालचालींसाठी आवश्यक असे तंत्रिकाआवेग कसे निर्माण होतात याचे सिद्धांत मांडले. त्यातून अनेक प्रतिक्षेपी कमानींच्या ‘ अंतिम समान मार्गाची ’ संकल्पना साकारली.
शेरिंग्टन यांनी प्रत्येक स्वतंत्र तंत्रिका कोशिकेच्या गुणधर्मांचाही अभ्यास केला. प्रतिक्षेपी क्रियांवर मेंदूकडून ठेवले जाणारे नियंत्रण त्यांनी प्रमस्तिष्कहीन(प्रमस्तिष्कछेदित) अवस्थेतील स्नायूंच्या दृढतेच्या अभ्यासावरून निदर्शनास आणले. प्रमस्तिष्कातील स्तूपाकार कोशिकांपासून निघणारे व मेरूरज्जूमध्ये पोहोचणारे तंत्रिकामार्ग पूर्णपणे अभ्यासून त्यांचा मागोवा घेण्यात त्यांना यश आले. याखेरीज स्नायूंच्या ऊतकांत असलेले अंतर्गत संवेदनागाहके निदर्शनास आणून त्यांचे स्नायूंच्या ताणस्थितीच्या (मसल टोन) निर्मितीमधील तसेच शरीराची ⇨ अंगस्थिती टिकवून धरण्याच्या कार्यामधील महत्त्व त्यांच्या प्रयोगांनी स्पष्ट झाले. स्नायूकडे मज्जारज्जूकडून जाणारी तंत्रिका ही केवळ प्रेरक तंतूची बनलेली नसून जवळजवळ १/३ तंतू हे स्नायूकडून संवेदना आणणारे असतात असे त्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले. एखादया सांध्याची हालचाल होते तेव्हा काही स्नायूंचे आकुंचन तर विरूद्ध बाजूच्या स्नायूंचे शिथिलीभवन होत असते. हे कार्य सुरळीत होण्यासाठी स्नायूंकडे योग्य ते संदेश देण्यासाठी परस्परपूरक तंत्रिकावितरण असते हे त्यांनी दाखविले. त्यांच्या संपूर्ण संशोधनकार्यातून तंत्रिका तंत्राच्या सुसूत्र कार्यपद्धतीचे चित्र निर्माण होऊ शकले. अनेक प्रकारच्या प्रतिक्षेपी क्रियांचे नियंत्रण, समन्वय आणि संकलन तंत्रिका तंत्राच्या विविध भागांकडून होत असते याची जाणीव त्यामुळे होऊ लागली व अधिक विस्तृत अभ्यासाला चालना मिळाली.
पहिल्या महायुद्धाच्या काळात शेरिंग्टन यांनी जखमी व्यक्तींवर धनुर्वाताचे प्रतिविष असलेल्या लशीची चाचणी घेतली. घटसर्पाच्या प्रतिविषाचा उपचारासाठी यशस्वी वापर करण्याचे श्रेयही त्यांच्याकडे जाते. दारूगोळ्याच्या कारखान्यात अज्ञातपणे कामगार म्हणून स्वतः दिवसभर खपून आलेल्या थकव्याच्या अवस्थेतील शरीरक्रियावैज्ञानिक बदलांचा अभ्यासही त्यांनी जाणीवपूर्वक केला.
शेरिंग्टन यांचे द इंटिगेटिव्ह ॲक्शन ऑफ द नर्व्हस सिस्टिम (सिलिमन व्याख्यानमालेवर आधारित, १९०६), मॅमेलियन फिजिऑलॉजी (विदयार्थी व सहकाऱ्यांच्या मदतीने, १९१९), द रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटी ऑफ द स्पायनल कॉर्ड (१९३२), बेन अँड इट्स मेकॅनिझम्स (रीड व्याख्यानमालेवर आधारित, १९३३), बुक ऑफ व्हर्स (काव्यसंग्रह, १९२५), मॅन अँड हिज नेचर (१९४०), एन्डेव्हर्स ऑफ झां फेर्नेल (१९४६) हे गंथ विशेष प्रसिद्ध आहेत.
ते ईस्टबॉर्न (ससेक्स) येथे मृत्यू पावले.
श्रोत्री, दि. शं.