सकलस्लाव्हवाद : सर्व स्लाव्हवंशीय लोकांचे सांस्कृतिक – राजकीय ऐक्य साधण्यासाठी निर्माण झालेली एक चळवळ. स्लाव्ह हा इंडो -यूरोपियन भाषाकुटुंबातील एक मोठा वांशिक व भाषिक लोकांचा समूह असून त्यांची लोकसंख्या यूरोपखंडात मुख्यत्वे रशिया, बेलोरशिया, युक्रेन, पोलंड, चेकोस्लोव्हाकिया वगैरे देशांत आढळते. ही चळवळ एकोणिसाव्या शतकात गतिमान झाली असली, तरी तिचा उगम सतराव्या शतकात झालेला आढळतो. त्यावेळी कोएशिअन धर्मगुरू यूरॅय किझॅनित याने सर्व स्लाव्ह लोकांचे भौगोलिक, भाषिक, वांशिक वा धार्मिक तत्त्वांवर एकीकरण व्हावे, असा प्रयत्न केला होता. पुढे तिचा अनेक विद्वानांनी पुरस्कार केला तथापि तिचे बुद्धीजन्य, सांस्कृतिक, वैकासिक रूप एकोणिसाव्या शतकात दृग्गोचर होते. ऑस्ट्रियन आणि ऑटोमन साम्राज्यातील समाटांच्या एकाधिकारशाही प्रवृत्तीतून स्लाव्ह जनतेत एकत्र येण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि त्यांची अशी धारणा झाली की, स्लाव्ह लोकांची संघटना झाल्याशिवाय त्यांचे स्वातंत्र्य आणि जिणे सुसह्य होणार नाही. त्याला नुकत्याच उदयाला आलेल्या राष्ट्रवाद आणि स्वच्छंदतावाद या तत्त्वप्रणालींनी उत्तेजन दिले. जर्मन स्वच्छंदतावादाचा अध्वर्यू ⇨ योहान गोट्फीट फोन हेर्डर (१७४४-१८०३) याच्या विचारांनी प्रभावित होऊन स्लाव्ह इतिहासकार, भाषाभ्यासक, मानवशास्त्रज्ञ यांनी आपल्या लेखणीवाटे स्लाव्ह लोकांमध्ये राष्ट्रीय जाणीव जागृत करण्याचे प्रयत्न आरंभिले. एवढेच नव्हे, तर काहींनी अधोगतीच्या मार्गावर असलेल्या लॅटिन-जर्मन संस्कृतींच्या जागी सांघिक स्लाव्ह संस्कृती पाहण्याचे स्वप्नही रंगविले होते. या विव्दानांपैकी स्लाव्ह कवी यान कोलार (१७९३-१८५२) हा जर्मन स्वच्छंदतावाद आणि फेंच राज्यक्रांतीतील राष्ट्रवाद यांनी प्रभावित झाला होता. त्याने हिरिरीने सकल स्लाव्ह सांस्कृतिक ऐक्याचा पुरस्कार केला. या प्रयत्नांमुळे आतापर्यंतच्या यूरोपातील या साहित्यिक आणि मुख्यत्वे तात्त्विक चळवळीला राजकीय चालना मिळाली आणि प्राग येथे सकल – स्लाव्हवादींची पहिली परिषद भरली (जून १८४८). तीत विविध देशांतील स्लाव्ह समूहांनी व्यक्त केलेल्या प्रजातंत्रवादी सुधारणा आणि राष्ट्रवादावर आधारित राजकीय ऐक्य, यांवर चर्चा होऊन सकल – स्लाव्हवादास विधायक स्वरूप प्राप्त झाले. ती रशियाविरोधी आणि ऑस्ट्रियन साम्राज्यांतर्गत स्लाव्ह लोकांपुरती मर्यादित होती.

रशियाचा क्रिमियन युद्धात (१८५४-५६) दारूण पराभव झाला. परिणामत: रशियात पश्र्चिमी प्रवृत्तीविरूद्ध तीव्र असंतोष निर्माण होऊन सकल – स्लाव्हवादाची निकड निर्माण झाली. रशियन आत्मसत्यवाद व रशियन संस्कृती (स्लाव्होफाइल) यांचे वर्चस्व प्रस्थापिणे, हा रशियन सकल -स्लाव्हवादाचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे रशियातील बुद्धीवंतांनी पाश्चात्त्य संस्कृती आणि ऑस्ट्रियन-ऑटोमन साम्राज्य यांविरूद्ध या चळवळीचा पुरस्कार केला. त्यांपैकी एफ्. एम्. डॉस्टोव्हस्की या पत्रकाराने आणि मिखाईल पोगोडिन या इतिहासकाराने अशी अपेक्षा व्यक्त केली की रशियाने पुढाकार घेऊनस्लाव्ह लोकांना ऑस्ट्रियन व ऑटोमन साम्राज्यांच्या जोखडातून मुक्त करावे आणि स्लाव्हिक – फेडरेशन (संघ) स्थापन करावे. त्या कल्पनेचा निकोलाय डॅनिलेव्हस्की याने जोरदार पुरस्कार केला तथापि रशियन राज्यकर्त्यांनी हे अधिकृत धोरण ठरविले नाही आणि ते कृतीतही आणले नाही. दुसरा अलेक्झांडर झारच्या कारकीर्दीत त्याचा परराष्ट्र मंत्री अलेक्सांद्र गॉर्बाचॉव्ह याने सकल -स्लाव्हवादाच्या महत्त्वाकांक्षांना विरोध केला. रशियन सकल – स्लाव्हवादी पोलिश, कॅथलिक, ज्यू आणि समाजवादयांचा तिरस्कार करीत. रूसो-तुर्की युद्धाच्या वेळी (१८७७-७८) रशियाच्या मध्य आशिया आणि बाल्कन राष्ट्रांतील वर्चस्वासाठी या तत्त्वाचा नैतिक समर्थनार्थ वापर करण्यात आला.

स्लाव्ह लोकांमधील अंतर्गत कलहांमुळे हे ऐक्य फारकाळ टिकले नाही. पहिल्या महायुद्धाच्या काळात (१९१४-१८) युकेनिया आणि बेलोरशिया वगळता अन्य स्लाव्ह देश स्वतंत्र झाल्यावर ही चळवळ जवळजवळ संपुष्टात आली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने सोव्हिएट रशियावर आकमण केल्यानंतर सोव्हिएट रशियाच्या शासनाने सकल – स्लाव्हवादाचा पुनरूद्धार करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्व यूरोप आणि अन्य देशांतील स्लाव्ह लोकांना नाझींना रशियातून बाहेर घालविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ही पुनरूज्जीवित सकल – स्लाव्हवाद चळवळ पुढे १९४८ मध्ये पूर्णत: नामशेष झाली कारण रशियाने साम्यवादी विचारसरणी दृढतर करून पूर्व यूरोपमध्ये राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.

संदर्भ : 1. Fadner, F. Seventy Years of PanSlavism, Georgetown, 1962.

2. Petrovich, M. B. The Emergence of Russian PanSlavism, 1856–1870, New York, 1956.

शिंदे, आ. ब.