संस्मरणिका : (मेम्वार्स). एक आत्मकथनपर साहित्यप्रकार. ‘ आठवणी ’ या पर्यायी संज्ञेने तो जास्त रूढ आहे. लेखकाने स्वानुभव व निरीक्षणे यांच्या आधारे लिहिलेला स्वकाळाचा इतिहास वा वृत्तांत म्हणजे संस्मरणिका होय. ⇨ आत्मचरित्र व संस्मरणिका या दोन लेखनप्रकारांत इतके निकटचे साम्य आहे की, कित्येकदा त्यांचा समानार्थी निर्देश केला जातो. मात्र या दोन्ही प्रकारांत आत्मकथन वा आत्मनिवेदन हे समान सूत्र असले, तरी त्यात काही सूक्ष्म व लक्षणीय स्वरूपाचे भेद आहेत. आत्मचरित्रामध्ये स्वजीवनाचे सलग कथन एकूण मानवी जीवनाच्या व्यापक संदर्भात स्वजीवनाचे वेगळेपण, मूल्यगर्भ दृष्टीने घेतलेल्या आत्मशोधाची प्रेरणा, हे प्रमुख घटक असतात, तसे ते संस्मरणिकेत असतीलच असे नव्हे. कित्येकदा संस्मरणे वा आठवणी ह्या व्यक्तिजीवनाच्या विशिष्ट कालखंडाशी निगडित व तेवढयापुरत्याच मर्यादित असू शकतात. संस्मरणिकाकारांच्या लिहिण्याचा भर कित्येकदा स्वजीवनाच्या चित्रणापेक्षा, त्याच्या आयुष्यात आलेल्या वा त्याने पाहिलेल्या इतर व्यक्ती, सभोवतीच्या घटना-घडामोडी व इतरेजनांचे अनुभव, यांवरच जास्त प्रमाणात असतो. आत्मचरित्रात लेखक स्वतःच निवेदनाच्या केंद्रस्थानी असतो व या अर्थाने आत्मचरित्र हे एककेंद्री असते, तर संस्मरणिका ही बहुकेंद्री संभवते. संस्मरणिकेचा लेखक हा त्याच्या भोवताली घडणाऱ्या घटना-घडामोडींमध्ये प्रत्यक्ष सहभागी वा साक्षीदार असतो, सूक्ष्म निरीक्षक असतो व त्या घटिताचे यथातथ्य चित्रण करणे, त्यावर भाष्य करून त्याचा अन्वयार्थ लावणे, ही संस्मरणिका-लेखनामागची त्याची उद्दिष्टे असू शकतात. संस्मरणिकेतून लेखक ज्या समाजात वावरतो, त्या समाजाचे चित्रण जास्त प्रकर्षाने पुढे येते. त्या मानाने लेखकाच्या आत्मकथनास दुय्यम स्थान असते. आठवणींच्या वा संस्मरणांच्या कथनामागे निश्र्चित, पूर्वनियोजित उद्दिष्ट अथवा जाणीवपूर्वक योजलेले रचनासूत्र असतेच असे नव्हे मात्र कधीकधी आपाततः लिहिण्याच्या ओघात सहजपणे या गोष्टी जुळून येतात व अशा आठवणी विलक्षण कलात्मक उंची गाठतात. ह्याचे मराठीतील सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे (४ भाग, १९३४-३६).

संस्मरणिका आणि स्मृतिचित्रे (रेमिनिसन्सेस) या प्रकारांत खूपच साधर्म्य असले, तरी संस्मरणिकेत लेखक जे व्यापक अनुसंधान ठेवतो, तसे ते काहीशा त्रोटक व स्वायत्त स्मृतिचित्रांत नेहमीच आढळेल असे नाही. तरीदेखील हे दोनही लेखनप्रकार पुष्कळदा परस्परपर्यायी ठरू शकतात.

पाश्र्चात्त्य वाङ्‌मयात संस्मरणिकालेखनाची प्रदीर्घ परंपरा आढळते. सतराव्या शतकातील इंग्लंडमधील यादवी युद्धांच्या घटनांवर आधारित अनेक संस्मरणे लिहिली गेली. त्यांपैकी एड्मंड लुड्लो व सर जॉन रेरेस्वी यांची मेम्वार्स उल्लेखनीय आहेत. प्रसिद्घ इंग्रज इतिहासकार ⇨ एडवर्ड गिबन याचे मेम्वार्स ऑफ हिज लाइफ अँड रायटिंग्ज हे संस्मरणिकावजा आत्मवृत्त प्रसिद्ध आहे. ते लॉर्ड शेफिल्डने मिसलेनिअस वर्क्स (१७९६) या शीर्षकाखाली संकलित करून प्रसिद्ध केले. त्यात एका स्वकार्यरत व्यक्तीचे नमुनेदार चित्रण आढळते. इटालियन नाटककार ⇨ कार्लो गोत्सी याचा Memorie inutili (१७६१, इं. भा. द मेम्वार्स ऑफ कॉर्लो गोत्सी, २ खंड १८९०) ही संस्मरणिका रसाळ आहे. फ्रेंच लेखकांनी संस्मरणिका या प्रकारात उत्कृष्ट प्रतीचे लिखाण करून तो प्रकार खूपच विकसित केला. ड्यूक दी सँसीमॉन हा तत्कालीन श्रेष्ठ संस्मरणिकाकार होता. त्याच्या Memoires या फ्रेंच संस्मरणिकेत १६९० या दशकाच्या प्रारंभापासून सु. १७२३ पर्यंतच्या कालखंडाचा वृत्तांत वर्णिला असून, चौदाव्या लूईच्या राजदरबारातील घडामोडींचे यथातथ्य वर्णन केले आहे. सूक्ष्म तपशीलवार व्यक्तिरेखाटने, हे या संस्मरणिकेचे लक्षणीय वैशिष्टय होय. ⇨ फांस्वा रने द शातोबीआं हा संस्मरणिकाकारही दर्जेदार लिखाणासाठी प्रसिद्घ होता. आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे त्याने ले मेम्वार दुत्रताँब (१८४९-५० इं. भा. मेम्वार्स फॉम बीयाँड द गेव्ह) या संस्मरणिकेचे लेखन करण्यात व्यतीत केली. रशियन कांतिकारक ⇨ प्यॉटर कपॉटक्यिन ह्याच्या मेम्वार्स ऑफ ए रेव्होल्यूशनिस्ट (२ खंड, १८९९ व १९०६) या संस्मरणिकेत त्याच्या कांतिकारक जीवनाचे नाट्यपूर्ण चित्रण आढळते. विसाव्या शतकात अनेक राजकारणी व लष्करी क्षेत्रांतील व्यक्तींनी संस्मरणिका लिहून आपले अनुभव व्यक्त केले. पहिल्या महायुद्धानंतर युद्धविषयक अनुभवांची अनेक स्मृतिचित्रे पश्चिमी वाङ्‌मयात निर्माण झाली. इंगज कवी व कादंबरीकार ⇨ रॉबर्ट गेव्ह्ज चे गुडबाय टू ऑल दॅट (१९२९) हे संस्मरणिकावजा आत्मकथन युद्धाची निरर्थकता, कौर्य, अमानुषता, दुःख व कडवटपणा यांचे विलक्षण प्रत्ययकारी चित्रण करते. दुसऱ्या महायुद्धातील अनुभवांचे चित्रण करणाऱ्या उत्कृष्ट संस्मरणिकांत इंग्लंडच्या व्हायकौन्ट बर्नार्ड लॉ मंगमरीने लिहिलेल्या मेम्वार्स (१९५८) व चार्ल्स द गॉलच्या Memoires de guerre (१९५४-५९ इं. भा. वॉर मेम्वार्स,१९५५-६०) यांचा विशेषत्वाने उल्लेख करता येईल. ⇨ आर्थर केस्टलर ने संस्मरणिकावजा आत्मकथन चार खंडांत प्रसिद्ध केले. त्यांपैकी ॲरो इन द ब्ल्यू (१९५२) विशेष प्रसिद्ध असून त्यात त्या काळात बुद्धीवादयांचे आकर्षण ठरलेली साम्यवादी विचारसरणी व साम्यवादी राजवटीचा प्रत्यक्ष अनुभव, यांतील विरोधाभासाचे भेदक दर्शन घडते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ⇨युलिसीझ एस्. गँट यांच्या द पर्सनल मेम्वार्स (१८८५-८६) व राष्ट्राध्यक्ष हॅरी टमन यांच्या मेम्वार्स (१९५५) ह्या त्या काळातील सामाजिक-राजकीय जीवनदर्शनाच्या संदर्भात विशेष उल्लेखनीय आहेत. ग्रर्ट्रूड स्टाइन या अमेरिकन लेखिकेचे द ऑटोबायॉग्राफी ऑफ ॲलिस बी. टोक्लास (१९३३) हे संस्मरणिकेच्या स्वरूपाचे असून, त्यात तिच्या सहवासात आलेल्या पिकासो, बाक, आपॉलिनेर, हेमिंग्वे, कोत्को, शेखुड अँडरसन इ. कलावंत-साहित्यिकांच्या सुरस आठवणी चितारल्या आहेत.

मराठीतही संस्मरणिकेच्या स्वरूपाचे विपुल लिखाण झाले आहे. त्यांत स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रवजा संस्मरणिकांना तत्कालीन कौटुंबिक व सामाजिक जीवनचित्रणाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यांतील काही आठवणी (१९१०), बाया कर्वे यांचे माझे पुराण (१९४४), लीलाबाई पटवर्धन यांचे आमची अकरा वर्षे (१९४५) ह्या आत्मवृत्तांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांचे माझी जन्मठेप (१९२७) व शत्रूच्या शिबिरात (१९६५) हे लेखन संस्मरणिकावजा आहे. न. चिं. केळकरांच्या गतगोष्टी (१९३९) प्रमाणेच ग. त्र्यं. माडखोलकरांच्या दोन तपे (१९४६) व एका निर्वासिताची कहाणी या पुस्तकांचीही गणना संस्मरणिकेत करता येईल.

आत्मचरित्र व संस्मरणिका या दोन्ही प्रकारांच्या सीमारेषेवर मोडणारे लेखनही मराठीत विपुल प्रमाणात झाले आहे. उदा., चिंतामणराव कोल्हटकरांचे बहुरूपी (१९५७) हे आत्मकथनाबरोबरच रंगभूमीविषयक आठवणींचेही संकलन आहे, तसेच गोविंदराव टेंबे यांच्या माझा जीवन विहार (१९४८) मध्ये आत्मचरित्राबरोबरच तत्कालीन संगीतविश्र्वाचेही चित्रण आहे. हंसा वाडकर यांचे सांगत्ये ऐका (१९७०) हे आत्मकथनही उल्लेखनीय आहे. आत्मचरित्र व संस्मरणिका यांच्या सीमारेषेवरची अलीकडच्या काळातील काही विशेष उल्लेखनीय पुस्तके म्हणजे आहे मनोहर तरी (१९९८) – सुनीता देशपांडे नाच ग घुमा (१९९०)- माधवी देसाई बंध अनुबंध – कमल पाध्ये इत्यादी. ह्या प्रकारातील बलुतं (१९७८)- दया पवार आठवणींचे पक्षी (१९७९)- प्र. ई. सोनकांबळे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे (१९७९)- माधव कोंडविलकर आहिताग्नि राजवाडे आत्मवृत्त (१९८०)- आहिताग्नि राजवाडे तराळ-अंतराळ (१९८१)- शंकरराव खरात काटयवरची पोटं (१९८१)- उत्तम बंडू तुपे उपरा (१९८२)- लक्ष्मण माने आत्मनिवेदन (१९८४)- ग. ह. खरे उचल्या (१९८७)-लक्ष्मण गायकवाड इ. संस्मरणिकावजा आत्मकथनांना सामाजिक दस्तऐवज म्हणूनही महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

संदर्भ : 1. Cliford, James L. Ed. Biography as an Art, Toronto, 1962.

2. Maurois, Andre, Aspects of Biography, Cambridge, 1929.

3. Olney, James, Meaning of Autobiography, Princeton, 1972.

4. Spengeman, William C. The Forms of Autobiography, New Haven, 1980.

5. जोशी, अ. म. चरित्र-आत्मचरित्र, 1965.

6. यादव, आनंद, आत्मचरित्रमीमांसा, पुणे, 1998.

इनामदार, श्री. दे.