सरॉयन, विल्यम : (३१ ऑगस्ट १९०८-१८ मे १९८१). अमेरिकन कथा-कादंबरीकार आणि नाटककार. जन्म अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील फ्रेझनो येथे. वडील आर्मेनियन आप्रवासी (इमिग्रंट). वडिलांच्या निधनानंतर (१९११) सरॉयनने चार वर्षे एका अनाथालयात काढली. वयाच्या आठव्या वर्षी तो चरितार्थासाठी वृत्तपत्रे विकू लागला. फ्रेझनो येथे शालेय शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला पण ते फारसे जमले नाही, त्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षी शाळा सोडली आणि स्वप्रयत्नानेच शिक्षण मिळविले. लेखक होण्याचा निर्णय त्याने वयाच्या विसाव्या वर्षी घेतला. १९३४ पासून त्याच्या कथा महत्त्वाच्या अमेरिकन मासिकांतून प्रसिद्घ होऊ लागल्या. द डेअरिंग यंग मॅन ऑन द फ्लाइंग ट्रॅपीझ (१९३४) हा त्याचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर इन्हेल टू एक्स्हेल (१९३६) पासून माय नेम इज ॲरम (१९४०) पर्यंत त्याचे सात कथासंग्रह प्रसिद्ध झाले. द ह्यूमन कॉमेडी ही त्याची कादंबरी १९४३ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर रॉक वॅगॅम (१९५१) आणि द लाफिंग मॅटर (१९५३) ह्यांसारख्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. विवाहापासून घटस्फोटापर्यंतचे आपले वैवाहिक जीवन त्याने आपल्या ह्या दोन कादंबऱ्यांतून मांडलेले आहे. त्याच्या बहुतेक कथा, त्याचे कुटुंब आणि त्याचे बालपण ह्यांवर आधारित आहेत.
माय हार्ट्स इन द हायलँड्स (१९३९) ह्या त्याने लिहिलेल्या एकांकिकेने लोकप्रिय नाटककार म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित केली. मात्र समीक्षकांच्या पसंतीस ही एकांकिका उतरली नाही तथापि त्याच वर्षी रंगभूमीवर आलेले द टाइम ऑफ युवर लाइफ हे नाटक लोकांप्रमाणेच समीक्षकांनीही प्रशंसिले. द ब्यूटिफूल पीपल (१९४१) हे त्यानंतरचे त्याचे आणखी एक उल्लेखनीय नाटक.
आधुनिक समाजाच्या ऐहिक जीवनातील दुःखांची जाणीव ठेवूनही जीवनातील आनंदाकडे उत्साहाने झुकणारा एक सतेज आशावाद सरॉयनने जोपासला. १९२९ साली सुरू झालेल्या जागतिक ⇨ महामंदी ने निर्माण केलेल्या नैराश्यमय वातावरणात अशा आशावादाची मानसिक गरज अमेरिकन समाजाला वाटत होती. त्यामुळे सरॉयचे लेखन आणि अमेरिकन मने ह्यांचे सूर जुळले. जगात दुष्ट प्रवृत्ती, भष्टाचार, दारिद्र्य, असुरक्षितता हे सर्व असूनही मानवजातीत अंगभूतच असलेल्या सत्प्रवृतींचा उच्चर सरॉयनने केला. समाजाने अव्हेरलेली, पण एक पकारच्या अंतःप्रज्ञेने जगातील आनंद शोधत राहणारी साधीसुधी माणसे त्याच्या नाटयकृतीतून दिसतात. काहीशी सैल रचना, तीव भावनात्मक संवाद आणि जगातील वास्तवाकडे पाहण्याची काव्यात्म दृष्टी ही सरॉयनच्या नाटयलेखनाची लक्षणीय वैशिष्टये होत. द टाइम ऑफ युवर लाइफ ह्या त्याच्या नाटकाला ‘न्यूयॉर्क ड्रामा किटिक्स सर्कल’चा पुरस्कार देण्यात आला होता तसेच या नाटकाला पुलिट्झर पारितोषिकही जाहीर झाले होते पण सरॉयनने ते नाकारले.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर सरॉयनची लोकप्रियता उतरणीला लागली. त्याच्या आशावादाचाही प्रभाव राहिला नाही. १९४५ नंतरच्या राजकीय-वैचारिक वातावरणात त्याची नाटके कालबाह्य वाटू लागली. द स्लॉटर ऑफ द इनोसंट्स (१९५२) सारख्या नाटकातून त्याने महायुद्धोत्तर नैतिकतेला भिडण्याचा प्रयत्न केला आणि माणूसच त्याच्या दु:खांना कारणीभूत असतो, हे दाखवून दिले, मात्र पूर्वीची लोकप्रियता त्याला पुन्हा प्राप्त झाली नाही.
सरॉयनचे १९५८ नंतरचे वास्तव्य फ्रेझनो ऐवजी पॅरिसमध्ये होऊ लागले कारण अमेरिकन करप्रणालीचा त्यास त्रास होऊ लागला तथापि तो फ्रेझनोला मधूनमधून जात असे व अखेर तिथेच त्याचे निधन झाले. अखेरच्या दोन दशकांत त्याने विपुल लेखन केले. त्यांपैकी हिअर कम्स, देअर गोज यू नो इहू (१९६१), नॉट डायिंग (१९६३), डेज ऑफ लाइफ अँड डेथ अँड एस्केप टू द मून (१९७१) आणि प्लेसिस व्हेअर आय हॅव्ह डन टाइम (१९७५) हे ग्रंथ निर्देशनीय आहेत.
फ्रेझनो येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Floan, Howard R. William Saroyan, 1966.
2. Kherdian, David,ABibliographyofWilliamSaroyan,19934–64, 1965.
कुलकर्णी, अ. र.