सरदेसाय, मनोहरराय लक्ष्मणराव : (१८ जानेवारी १९२५-२२ जून २००६). कोकणी कवी, निबंधकार व अनुवादक. जन्म पणजी (गोवा) येथे. त्यांचे वडील ⇨ लक्ष्मणराव सरदेसाई हे प्रख्यात साहित्यिक होते. त्यामुळे वाङ्मयीन वारसा त्यांना घरातूनच लाभला. विल्सन कॉलेज, मुंबई येथे त्यांचे महाविदयालयीन व पदव्युत्तर शिक्षण झाले. फ्रेंच व मराठी विषय घेऊन ते मुंबई विदयापीठातून प्रथम वर्गात प्रथम आले (१९४९). नंतर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये फ्रेंच विषयाचे अधिव्याख्याता म्हणून अध्यापन-कारकीर्दीला सुरूवात केली. १९५२ मध्ये ते फ्रान्सला गेले व ‘अठराव्या शतकातील फ्रान्समधील भारताची प्रतिमा’ या विषयावर त्यांनी सॉर्बां विदयापीठाची फ्रेंचमध्ये डॉक्टरेट मिळविली (१९५८). भारतात परतल्यावर त्यांनी दिल्ली आकाशवाणी केंद्रात फ्रेंच विभागात एक वर्ष नोकरी केली (१९६०). गोवा येथील कोकणी भाषा मंडळाचे ते अध्यक्ष होते (१९६४-६७). मुंबई विदयापीठात ते फ्रेंचचे प्रपाठक व फ्रेंच-पोर्तुगीज विभागप्रमुख होते (१९७९-८५). त्यांनी कोकणी भाषेतील कमिक पुस्तकांचे संपादनही केले. कोंकणी विश्वकोशा चे प्रमुख संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले (गोवा विदयापीठ, १९९१).
त्यांची मातृभाषा कोकणी असून, त्यांची एकूण २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रारंभीच्या काळात त्यांनी निरनिराळ्या मराठी नियतकालिकांतून मराठी कथा, कविता, लेख इ. प्रसिद्ध केले, तसेच सादया कोकणी मासिकाचे संपादन केले. आवज रे धोलार पडली बडी हे पदयमय नृत्यनाटय त्यांनी १९६१ मध्ये लिहिले व सादर केले. कृष्णाने केलेल्या कंसवधाचे रूपकात्मक चित्रण त्यात असून, त्या द्वारा अप्रत्यक्ष रीत्या गोव्यातील जुलमी पोर्तुगीज राजवटीचे संसूचन केले आहे. त्यानंतर त्यांचा गोंया तुज्या मोगाखातीर (१९६१) हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. मातृभूमी गोव्याविषयीच्या उत्कट प्रेमाच्या ह्या कविता आहेत. जायात जागे (१९६४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात समाजवादी आशयाच्या कविता आहेत. जय पुण्यभू जय भारता (१९६५) हा त्यांचा देशभक्तिपर कवितांचा संग्रह आहे. बेब्यांचे काजार (१९६५) ह्या त्यांच्या बालगीत संग्रहाला अमाप लोकप्रियता लाभली. ‘कविराज’ या किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आले (१९६६), तसेच आकाशवाणी केंद्रातर्फे कोकणीतील देशभक्तिपर गीतासाठी पहिले पारितोषिक देण्यात आले. त्यांचा रामगीता (१९६८) हा श्रीराम-चरित्रावर आधारित भावगीतसंग्रह असून, ही गीते संगीतबद्ध करण्यात आली. जायो जुयो (१९७०) ह्या काव्यसंग्रहाला गोवा कला अकादमीचे (१९७३), तर पिसोळी (१९७८) ह्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचे पुरस्कार लाभले (१९८०). हे आशय व घाट यांचे वैविध्य असलेले लघुकाव्यसंग्रह आहेत. भांगराची कुराड (१९७९) व माणकुली गीता (१९८२) हे त्यांचे बालगीतसंग्रह उल्लेखनीय आहेत. आपल्या काव्याद्वारा कोकणी भाषेला वैभव व प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे, कोकणीचे कट्टर समर्थक व खंदे पुरस्कर्ते म्हणून त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. हे उद्दिष्ट साधण्यासाठी त्यांनी कोकणी व इंग्रजी भाषांत अनेक पुस्तपत्रे लिहिली, तसेच ही लोकशाय व आयलो पोल यांसारखी उपरोधप्रचुर दीर्घकाव्ये लिहिली. यांखेरीज स्मगलर (१९७५) व आयलो बदलले हे एकांकिकासंग्रह, तसेच साहित्यास्वाद (१९९३) हा वाङ्मयीन निबंधसंग्रह हे त्यांचे उल्लेखनीय साहित्य होय. व्हॉल्तेअरची कांदीद ही अभिजात फ्रेंच साहित्यकृती, रॉमँ रॉलां यांचे द लाइफ ऑफ विवेकानंद अँड द यूनिव्हर्सल गॉस्पेल व सार्त्रचे ले मो हे आत्मचरित्र यांची त्यांनी कोकणीत भाषांतरे केली. तसेच बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांच्या असमिया साहित्यकृतींचे कोकणीत सरस अनुवाद केले. त्यांनी कोकणी चित्रपटासाठी पटकथा व गीते लिहिली. त्यांचा रंगीत माझे अनंतरंग (२००६) हा एकमेव मराठी काव्यसंग्रह होय. त्यांनी अनेक परदेश दौरे केले. त्यांनी अनेक पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांतून त्यांची प्रगाढ विद्वत्ता दिसून येते. समर्थ प्रतिमांनी युक्त अशी साधी भाषा व नित्याच्या प्रचलित विषयांना व्यक्त करणारी अनुरूप अशी प्रवाही शैली या वैशिष्टयामुळे मुळे ते कोकणीतील प्रमुख अग्रणी कवी मानले जातात. त्यांना फ्रेंच सरकारतर्फे ‘शव्हालिए दे पाल्म आकादेमीक’ (फ्रेंच साहित्य विशारद) किताब (१९८८), गोवा राज्य फिल्म महोत्सव (१९९७) चे सर्वोत्कृष्ट कोकणी सिनेगीतांसाठी प्रथम पारितोषिक, गोवा कला अकादेमीतर्फे गोमंतशारदा पुरस्कार (२०००), गोवा सारस्वत समाजातर्फे सरस्वती पुरस्कार (२००४) इ. मानसन्मान प्राप्त झाले.
इनामदार, श्री. दे.