सरकी : कपाशीच्या बियांना सरकी म्हणतात. कपाशीचे जिनिंग करायच्या धंदयातील सरकी हे दुय्यम उत्पादन होय [→ कापूस]. कपाशीच्या एका झाडापासून ०·४५ किगॅ. कापूस मिळाला तर ०·९० किगॅ. सरकी मिळते. जिनिंग कारखान्यातून मिळणारी सरकी पांढुरकी किंवा करडी दिसते. कारण तिच्या पृष्ठभागावर थोडा कापूस शिल्ल्क राहतोच. या कापसाला लिंटर म्हणतात. ‘लिंटर’ काढल्यावर सरकी जवळजवळ काळी दिसते. ती टोकदार, अंडाकार, भिन्न आकारमानाची असून तिच्या लांबीचे प्रमाण ७ ते १०·५ मिमी. असू शकते.
सरकीचे मुख्य घटक लिंटर, फोल, प्रथिन व तेल हे होत. ह्या घटकांचे सापेक्ष प्रमाण पिकाच्या जाती व वाणांप्रमाणे खूपच भिन्न असते. सरकीतील गराचे व फोलाचे सापेक्ष प्रमाण ३७ ते ५४% आणि ३२·३ ते ५२·७% असते. भारतात उपलब्ध होणाऱ्या सरकीचे सामान्यत: दोन प्रकारे वर्गीकरण करतात. एक ‘देशी’ व दुसरा ‘अमेरिकी’ प्रकार होय. अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथील ओटीआरआय या संशोधन संस्थेने १९५१-५८ या कालावधीत सरकीच्या ५९३ नमुन्यांचे विश्लेषण केले असून दोन्ही जातींच्या सरकीतील तीन प्रमुख घटकांचीवारी टक्के पुढीलप्रमाणे दिली आहे.
घटक |
देशी जात |
अमेरिकी जात |
||
|
मर्यादा(%) |
सरासरी(%) |
मर्यादा(%) |
सरासरी(%) |
लिंटर |
१ -१४ |
५·४ |
०·६-१६·१ |
९·७ |
तेल |
१२-२४·४ |
१७·३ |
१४-२०·८ |
१७·० |
प्रथिन |
१२·३-२४·२ |
१६·४ |
१६·२-२५·० |
१८·० |
इतर तेलबियांप्रमाणे सरकीतही फॉस्फरससुक्त संयुगे, स्टेरॉल, क्षार आणि अ, ब, ड व ई ही जीवनसत्त्वे आहेत. याशिवाय सरकीत अल्प प्रमाणात पण विशिष्ट गुणधर्मांचे घटक म्हणजे ‘गॉसिपॉल’ नावाचे संयुग आणि कच्च्या सरकी तेलाला गडद रंग देणारी रंगद्रव्ये असतात. गॉसिपॉलचे प्रमाण सुमारे १ टक्का असते.
इतिहास : शतकानुशतके कापसाचा वस्त्रासाठी उपयोग होत असला, तरी सरकीचा मोठया प्रमाणावर व्यापारी उपयोग करण्यासंबंधी अलीकडेच विकास झाला आहे. १७९४ मध्ये अमेरिकेत विटने यांनी कापसाच्या जिन यंत्राचा शोध लावल्यावर कापसाचे उत्पादन वाढले. त्यावेळी अमेरिकेत सरकीचा प्रमुख उपयोग (५-१०%) बियाण्यासाठी होत असे व उरलेली सरकी कारखान्याबाहेर ढीग करून ठेवीत किंवा नदीच्या पात्रात टाकून देत परंतु त्यामुळे आरोग्याला धोका उत्पन्न झाला. त्यामुळे सरकीवर प्रक्रिया करण्याच्या यंत्रसामगीत सुधारणा करण्याचे पद्धतशीर व अखंडपणे प्रयत्न झाले. सरकीच्या उदयोगाच्या विकासाचा इतिहास म्हणजे ह्या उदयोगाचा जवळजवळ समग्र इतिहास होय.
प्राचीन काळी हिंदू व चिनी लोक सरकीचे तेल दिव्यात जाळीत असत व त्याचे औषधी उपयोग करीत. त्यांची तेल काढण्याची पद्धती अविकसित होती. भारतामध्ये ग्रामीण भागात सरकीचे फोल व लिंटर न काढता घाणीने तेल काढीत. हे तेल हलक्या प्रतीचे असते. सरकीचा मुख्य उपयोग म्हणजे दुभत्या जनावरांचे खादय म्हणून पूर्वापारपासून चालत आला आहे. सरकी, कोंडा, कडधान्ये व चुणी यांचे मिश्रण तसेच किंवा पाण्यात शिजवून देण्याची पद्धत आहे. सरकीमुळे दुधातील मलईचे प्रमाण वाढते असा अनुभव आहे. १९३० पर्यंत सरकीचा उपयोग खत म्हणूनही मोठया प्रमाणावर करीत.
सरकीचे तेल : पाश्चात्त्य पद्धतीने सरकीचे तेल काढण्याचे प्रयत्न भारतात १९३० च्या सुमारास सुरू झाले. तेल व पेंडेला मागणी कमी असल्यामुळे १९६५ पर्यंत सरकी गाळपात फारच हळूहळू प्रगती होत गेली. सतत सरकारी व खाजगी प्रयत्नाने सरकी तेल व पेंड यांचे महत्त्व माहीत झाले. तसेच खादय तेलाचा तुटवडा व पशुखादयाची वाढती मागणी यामुळे सरकी गाळप धंदा खूपच वाढत गेला.
सरकीचे तेल काढण्याची पुढील प्रक्रिया करतात. सरकी साफ करणे, लिंटर काढून टाकणे, फोलापासून गर वेगळा करणे, गराचा चुरा करणे किंवा गर शिजविणे आणि द्रवीय दाबयंत्रांनी तेल काढणे. विद्रावक निष्कर्षण आणि एक्सपेलर-तथा-विद्रावक निष्कर्षण यांचा उपयोग करून तेल काढण्याच्या प्रक्रियाही वापरतात. वीस टक्के तेल असलेल्या सरकीतून एक्सपेलरने १६% तेल निघते. विद्रावक निष्कर्षणाने हे प्रमाण १९·५% पर्यंत जाते. अशुद्ध तेल तांबडे ते गर्द लाल किंवा काळ्या रंगाचे असते व त्याला विशिष्ट वास येतो.
अशुद्ध तेल पंपाने टाकीत पाठवितात व त्यातील गाळ खाली बसू देतात. निवळ तेल ताबडतोब काढून घेऊन गाळून स्वच्छ टाक्यांत भरतात. खाद्य तेलाच्या उत्पादनासाठी अशुद्ध तेलातील मुक्त व साम्लांचे ४५° से. तापमानाला सौम्य कॉस्टिक सोडयाने उदासिनीकरण करतात. या प्रक्रियेत मुक्त अम्लापासून ‘ सोपस्टॉक ’ तयार होतो.त्यापासून स्वच्छ निवळ तेल वेगळे करून त्याचे विरंजक माती व सक्रियित कार्बन यांनी विरंजन करतात. ते गाळून त्याचे न्यूनीकृत दाबाखाली सु. १८०° से. तापमानाला बाष्पीय ऊर्ध्वपातन करून सुगंध पदार्थ काढून टाकतात. शुद्ध तेलाचा रंग फिकट पिवळा असून ते जवळ-जवळ वासरहित असते. त्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे असतात : वि. गु. ०·९१६८-०·९१८१ (२५° से. ला ), सॅपोनीकरण मूल्य १९१-१९८, आयोडीन मूल्य १०३-१०५, टायटर ३२-३८ असॅपोनीकारक द्रव्य ०·७-१·५%, तृप्त अम्ले २१-२५% व अतृप्त अम्ले ६९-७४%. शुद्ध तेलात ग्लिसराइडांशिवाय फॉस्फोलिपिने, फायटोस्टेरॉले व रंगद्रव्ये अल्प प्रमाणात असतात. सरकीचे तेल अर्धशुष्कक वर्गातील तेल आहे.
अम्लता, रंग व शुद्घीकरणातील तूट यांवरून कच्च्या तेलाची प्रतवारी करतात. शुद्ध तेलाचे भारतीय ॲगमार्क विनिर्देश पुढीलप्रमाणे आहेत : वि. गु. ०·९१०-०·९२०, प्रणमनांक १·४६४५-१·४६६०, सॅपोनीकरण मूल्य १९०-१९३, आयोडीन मूल्य १०५-११२, अम्ल मूल्य ०·५, असॅपोनीकारक द्रव्य जास्तीतजास्त १·५%. भारतात तेलाचा उपयोग मुख्यत: वनस्पती तूप बनविण्यासाठी होतो [→वनस्पति-१]. हलक्या दर्जाचे तेल साबण उत्पादनासाठी वापरतात. अमेरिकेत प्रक्रिया केलेल्या तेलापैकी बरेच तेल (७२%) लार्ड ( डुकराची चरबी) हिचा पर्याय बनविण्यासाठी, ११% तेल स्वयंपाकात व सॅलड तेल म्हणून, ७% तेल ⇨ मार्गारिनासाठी आणि उरलेला शुद्ध न करता येईल असा भाग साबणासाठी वापरतात. शुद्ध तेलाचे हायड्रोजनीकरण करतात.
सोपस्टॉक:अशुद्ध तेलाचे उदासिनीकरण करीत असताना ‘सोपस्टॉक’ हा उपपदार्थ मिळतो. तेलाच्या मुक्त वसाम्लांचे प्रमाण व अशुद्धता यांवर सोपस्टॉकचे प्रमाण अवलंबून असते. साधारणत: तेलाच्या ५ ते १० टक्के सोपस्टॉक मिळतो. त्याच्या घटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते. साबण २५-३०%, मुक्त तेल २०-२५%, पाणी ४५-५०%. आधुनिक शुद्ध करण्याच्या अखंड पद्धतीने मुक्त तेलाचे प्रमाण शेकडा ५ पर्यंत कमी करता येते.
सरकी तेलाचा सोपस्टॉक गर्द काळ्या रंगाचा असतो. त्यामुळे त्याचा साबणासाठी उपयोग करण्याकरिता विशिष्ट पद्धती वापराव्या लागतात. सोपस्टॉकचे रूपांतर मुक्त व साम्ले यात करून ऊर्ध्वपातनाने ती शुद्ध करता येतात.
सरकीची साठवण : सरकीमध्ये १०-११ टक्क्यांपेक्षा जास्त ओलसरपणा असल्यास साठवणीत सरकी ताबडतोब खराब होते. मुक्त व साम्लांचे प्रमाण वाढते, तसेच विद्राव्य रंगद्रव्यांची व असॅपोनीकारक द्रव्यांची सांद्रता वाढते. त्यामुळे अशा सरकीपासून काढलेले तेल शुद्ध करणे व विरंजन करणे कठीण जाते, तसेच पेंडही हलक्या दर्जाची मिळते. बियाणे म्हणून अशा सरकीला कमी किंमत येते. वरील प्रकारच्या ओल्या सरकीच्या साठवणीत हळूहळू तापमान वाढते व आपोआप आग लागण्याची भीती असते. त्यासाठी साठविण्यापूर्वी सरकी चांगली साफ करून सु.१० टक्के दमटपणा राहील अशा बेताने वाळवावी. गोदामात वायुवीजनाची उत्तम व्यवस्था असावी किंवा ताजी मुक्त हवा खेळती ठेवण्याची सोय असावी.
सरकीची पेंड : सरकीची पेंड प्रथिनयुक्त असल्यामुळे जनावरांना खुराक म्हणून देण्यास चांगली. टरफल काढलेल्या सरकीची पेंड व टरफल न काढलेल्या सरकीची पेंड असे पेंडीचे दोन प्रकार आहेत. या दोन्ही प्रकारांत प्रथिनांचे प्रमाण अनुक्रमे ४०% व २३% असते. तेलाचे प्रमाण ६-८% असून अल्प प्रमाणात फॉस्फरस, पोटॅश इ. घटक त्यांमध्ये असतात. दोन्ही प्रकारच्या पेंडीचा खुराक दुभत्या जनावरांना देतात. टरफल न काढलेल्या सरकीची पेंड वासरांना देत नाहीत, कारण तीत तंतूंचे प्रमाण जास्त असते. सरकीपेक्षा तिची पेंड जनावरांना चांगली पचनी पडते. पेंडीतील गॉसिपॉलमुळे विशिष्ट जनावरांना विषबाधा होते. गुराढोरांना त्याचा त्रास होत नाही, पण डुकरे, घोडे व मेंढयंना त्याचा त्रास होतो. पेंड वाफारून, ऑटोक्लेव्ह करून किंवा पाण्यात उकडून तिचा विषारीपणा कमी करतात. हलक्या प्रतीच्या पेंडीचा उपयोग खत म्हणून अगदी थोडया प्रमाणावर होतो.
सरकीचे पीठ : पेंडीचे विद्रावक निष्कर्षण केल्यास अशा तेलविरहित पेंडीस पीठ म्हणतात. या सरकीच्या पिठाचा उपयोग अन्न म्हणून होतो. मात्र मूळ पेंड उत्तम प्रतीची व गॉसिपॉलचे प्रमाण अगदी कमी पाहिजे. हे पीठ फिकट रंगाचे असून त्याचा स्वाद आल्हाददायक असतो. ते प्रथिनप्रधान असल्यामुळे तृणधान्याच्या पिठाला ते उत्तम पूरक आहे. अमेरिकेत बेकरी उत्पादनांत त्याचा उपयोग वाढत आहे. त्यामध्ये भरपूर खनिजे आणि ब गटातील जीवनसत्त्वे असतात. ऊष्मा प्रक्रियित गडद तांबूस तपकिरी पीठ बेकरी उत्पादनात कोकोऐवजी वापरतात.आसं-जक व तंतू निर्मितीत प्रथिनांचा पुरवठा करणारे म्हणून पिठाचा उपयोग करतात. सरकीचे पीठ, केसिन, सोयाबिनाचे पीठ व संश्लिष्ट रेझीन यांपासून तयार केलेला प्लायवुडाचा सरस जलाभेदय असून अपघर्षक नसतो.
गॉसिपॉल : विद्रावक निष्कर्षणाची प्रक्रिया करताना एक टन सरकीपासून ४-६ किगॅ. गॉसिपॉल मिळविता येईल. जे पदार्थ अन्न म्हणून खायचे नाहीत अशा पदार्थांत ते प्रतिऑक्सिडीकारक म्हणून वापरतात. ते पदार्थ रेशीम व लोकर रंगविण्यासाठी वापरतात. ते पूतिरोधकांत व प्लॅस्टिकांत वापरतात.
टरफल : (फोल). सरकीचा तिसरा हिस्सा टरफल असते. तेजना-वरांना भरडा म्हणून देतात. जनावरे ते आवडीने खातात व त्यांचे पोषणमूल्य गव्हाच्या कोंडयाएवढे असते. त्याचा खत व सरपण म्हणूनही उपयोग होतो. त्यांच्यापासून फुरफराल व सकियित कार्बन बनविण्याचे संशोधन झाले आहे. त्यामध्ये ७% टॅनीन असते.
लिंटर : जिनिंग करून सरकीवरील सर्वच कापूस निघत नाही. सामान्यत: बहुतेक आशियायी व अमेरिकन कपाशीमध्ये सरकीवर ७-१० मिमी. लांब बारीक तंतू राहतात. लिंटर बाहेरच्या धुळीमुळे मळकट होतात आणि रंगाने पिवळट, करडे अगर भुरकट दिसतात. अमेरिकेत सरकी तेलाच्या उदयोगांत लिंटर महत्त्वाचे दुय्यम उत्पादन मिळते. ते दोन टप्प्यांत काढतात. पहिल्या टप्प्यात २५% व दुसऱ्या टप्प्यात ७५% लिंटर काढतात. पहिल्या टप्प्यातील लिंटर हे उच्च् प्रतीचे असून त्याचा उपयोग शस्त्रक्रियेच्या वेळी लागणारा कापूस, दोरा, वाती, गालिचे इत्यादींसाठी करतात. दुसऱ्या टप्प्यातील लिंटरचा उपयोग मुख्यत: रेयॉन, प्लॅस्टिक, लॅकर, छायाचित्रण फिल्म व सेल्युलोज स्फोटके यांच्या उत्पादनाच्या रासायनिक उदयोगांत होतो. वरील दोन टप्प्यांच्या दरम्यान निघणाऱ्या लिंटरला ‘मिल रन लिंटर’ म्हणतात व ते गादया, उश्या, कुशन भरण्यासाठी व फेल्ट बनविण्यासाठी वापरतात.
उत्पादन : भारतात सरकी तेलाच्या उत्पादनास आणि तेल व पेंड यांच्या उपयोगास तेजी आली आहे व या धंदयाची प्रगतीच होत आहे. सरकी तेलाचा बराचसा भाग वनस्पती तूप बनविण्यास वापरला जातो. वनस्पती तूपात किमान १५% सरकी तेल असावे असा सरकारी निर्बंध आहे. जास्त प्रमाणात वापरल्यास कारखान्यांना उत्तेजनार्थ करात सूट मिळते. खाण्याकरिता म्हणून शुद्ध सरकी तेलाचे उत्पादन वाढू लागले आहे. दररोज ५० ते १५० टन सरकी गाळप करण्याचे अदययावत यंत्रसामगीने सिद्ध असलेले कारखाने निघाले आहेत.
जमदाडे, ज. वि.