समुद्रगुप्त : (३२०-३८०). गुप्त राजघराण्यातील (राजवंशातील) एक थोर राजा. पहिला चंद्रगुप्त आणि त्याची राणी लिच्छवी-राजकन्या कुमारदेवी यांचा तो पुत्र होय. चंद्रगुप्ताने आपल्या अंतकाळी दरबार भरवून समुद्रगुप्त याची आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली. त्यावरून तो त्याचा जेष्ठ पुत्र नव्हता, तरीही त्याचे कर्तृत्व लक्षात घेऊन चंद्रगुप्ताने त्याची युवराजपदी नियुक्ती केली. हरिषेणनामक समुद्रगुप्ताच्या महादंडनायकाने प्रयागप्रशस्तीत या प्रसंगाचे वर्णन केले असून तीत समुद्रगुप्ताचे व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व, पराक्रम, विव्दत्ता, राज्यविस्तार, अश्र्वमेध यज्ञ इत्यादींचे तपशील दिले आहेत.

आपल्या पित्याने केलेली निवड योग्य होती, हे समुद्रगुप्ताने गादीवर आल्यावर (३३५) आपल्या कृतीने सिद्ध केले. तो मोठा शूर आणि महत्त्वाकांक्षी राजा होता. त्याने प्रथम आपल्या राज्याच्या पश्र्चिममेस व दक्षिणेस राज्य करणाऱ्या रूद्रदेव, मतिल, नागदत्त, गणपतिनाग, नागसेन, अच्युत वगैरे राजांचा पराभव करून त्यांची राज्ये खालसा केली आणि विंध्य पर्वतातील अरण्य राज्यांच्या अधिपतींना आपले स्वामित्व कबूल करावयास लावले तेव्हा त्याच्या राज्याची पश्र्चिम सीमा चंबळा नदीपर्यंत पसरली. नंतर पश्र्चिमेच्या मालव, आर्जुनायन, यौधेय, मद्र आणि आभीर या गणराज्यांनी तसेच मध्य प्रदेशातील सनकादिकांनी आणि नेपाळ, आसाम इ. शेजारच्या राजांनी त्याचे स्वामित्व मान्य केले आणि त्याला खंडणी देऊ केली. दूरच्या माळवा काठेवाडातील क्षत्रपांनी आणि पंजाब अफगाणिस्तानातील कुशाणांनीही त्याच्यापुढे नम होऊन आणि त्याला कन्या देऊन आपल्या राज्याची अधिकारपत्रे देण्याविषयी त्याची प्रार्थना केली.

अशा रीतीने उत्तर भारतात आपले अप्रतिहत स्वामित्व प्रस्थापित केल्यावर त्याने दक्षिणेकडील कोसलच्या (छत्तीसगडच्या) महेंद्र राजाचा पराभव करून महाकांतारवर (बस्तर जिल्हा) स्वारी केली, तो देश जिंकल्यावर पूर्वेकडे वळून त्याने सध्याच्या गंजाम, विजगापट्टम, गोदावरी, कृष्णा आणि नेल्लेर जिल्ह्यांच्या राजांचा पराभव केला आणि कांची (सध्याचे कांजीवरम्) पर्यंत धडक मारली. त्याच्या सेनेबरोबर त्याचे आरमारही पूर्व किनाऱ्याने जात होते असे दिसते कारण त्याच्या विजयांची वार्ता ऐकताच सिंहल (श्रीलंका) आदी करून सर्व व्दिपातील अधिपतींनी त्याचे स्वामित्व मान्य करून त्याला उपायनादिकांनी प्रसन्न केले, असे त्याच्या प्रयागप्रशस्तीत म्हटले आहे.

समुद्रगुप्त महत्त्वाकांक्षी असला, तरी धोरणी होता. आपण जिंकलेल्या दक्षिण भारतातील दूरच्या देशांवर आपण स्वत: राज्य करणे शक्य होणार नाही, हे जाणून ते देश खालसा न करता त्याने त्या त्या राजांना आपले स्वामित्व कबूल करून वार्षिक खंडणी देण्याच्या अटीवर परत केले. तसेच दक्षिणेतील प्रबळ वाकाटक समाटांशी युद्ध करण्याचे त्याने टाळले.

राज्यात परत आल्यावर समुद्रगुप्ताने आपला महासेनापती आणि परराष्ट्रमंत्री (महादंडनायक) हरिषेण याला आपल्या विजयाचे वर्णन करणारी प्रशस्ती लिहावयास सांगून, ती कौशाम्बी येथे असलेल्या अशोक स्तंभावर कोरवून घेतली. त्या प्रशस्तीमुळे इतर कोणत्याही प्राचीन भारतीय राजापेक्षा समुद्रगुप्ताविषयी अधिक विश्र्वसनीय माहिती उपलब्ध झालीआहे.

नंतर त्याने अश्र्वमेध यज्ञ करून प्राचीन वैदिक परंपरेचे पुनरूज्जीवन केले आणि आपले सम्राटपद जाहीर केले. त्यापूर्वी कित्येक शतके कोणीही अश्वमेध यज्ञ केला नव्हता म्हणून त्याच्या वंशजांच्या लेखात त्याचे ‘चिरोत्सन्नाश्र्वमेधाहर्ता’(दीर्घकाल प्रचारात नसलेला अश्वमेध यज्ञ करणारा) असे वर्णन आले आहे. त्याप्रसंगी त्याने आपली अश्वमेधनाणी पाडली. त्यांवर अश्र्वमेधाच्या अश्वाची आकृती असून ‘अश्र्वमेधपराक्रम:’ असा लेखही आहे.

समुद्रगुप्ताचे राज्य उत्तर भारताच्या विस्तृत प्रदेशावर पसरले होते. उत्तरेस हिमालय पर्वत, पश्र्चिमेस यमुना व चंबळा या नदया, पूर्वेस बह्मपुत्रा आणि दक्षिणेस मध्य प्रदेशातील सागर जिल्हा, हा त्याच्या अंमलाखाली होता. त्याचा दरारा तर उत्तरेस अफगाणिस्तानापासून दक्षिणेस सिंहल द्वीपापर्यंत पसरला होता.

हरिषेण त्याच्या पराक्रमाविषयी ‘समरशतावरणदक्ष’ (शेकडो रणांगणा-मध्ये युद्ध करण्यात दक्ष) असे म्हणतो. समुद्रगुप्ताने ‘पराक्रमाड़्क ‘विक्रमांक’ अशी सार्थ पदवी धारण केली होती. तो विद्वान, प्रतिभासंपन्न, शास्त्रज्ञ आणि कलाभिज्ञही होता. त्याला विव्दानांच्या संगतीत आनंद वाटे. त्याने स्वत: शास्त्रांचा अभ्यास केला होता आणि त्यांच्या तत्त्वांचे परिपालन केले होते. त्याने स्वत: इतकी सुंदर काव्ये रचली होती की, त्यांतील कल्पना आपल्या कृतीत आणण्यात विव्दज्जन स्वत:ला धन्य मानीत. त्याच्यायोगे त्याची ‘कविराज’ पदवी सुप्रतिष्ठित झाली होती. दुर्दैवाने ही सर्व काव्ये कालाच्या ओघात नष्ट झाली आहेत. हरिषेण याने रचलेली प्रयागप्रशस्ती ही संस्कृत चंपूकाव्याचा उत्कृष्ट नमुना आहे पण हरिषेण तीत म्हणतो की, माझी प्रतिभा समुद्रगुप्ताच्या सानिध्यात असल्यामुळे पल्ल्वित झाली आहे. समुद्रगुप्ताला संस्कृत भाषेविषयी नितांत प्रेम होते. आपल्या सोन्याच्या नाण्यांवर संस्कृतमध्ये लेख घालण्याची आपल्या पित्याची पद्धत समुद्रगुप्ताने चालू ठेऊन ते सुंदर विविध वृत्तांतील श्लोकार्धात रचले. त्यांपैकी काही असे आहेत : ‘समरशतविततविजयोजितरिपुरजितोदिवंयति’, ‘कृतान्तपरशुर्जयत्यजितराजजेताजित:’, ‘राजाधिराज: पृथिवीमविता दिवंयत्याहृतवाजिमेध:’ समुद्रगुप्त उत्तम कलाभिज्ञ होता. त्याने सहा भिन्न प्रकारची सुंदर सोन्यांची नाणी पाडली होती. त्याला वीणावादनाचाही नाद होता. त्याच्या एका नाण्यावर तो वीणा वाजवीत बसलेला दाखविला आहे. हरिषेण म्हणतो, त्याने बुद्धीमत्तेत बृहस्पतीला, वादयवादनात तुम्बुरूला आणि गायनात नारदाला मागे टाकले होते. समुद्रगुप्त अत्यंत उदार होता. त्याने शेकडो गोसहस्रदाने दिली होती. तो शत्रूंचा कर्दन काळ पण सज्जनांचा आश्रयदाता आणि दीन व अनाथजनांचा पोषिंदा होता.


 समुद्रगुप्त स्वत: हिंदुधर्मी होता, तरी त्याचा इतर धर्मांनाही उदार आश्रय होता. त्याने प्राचीन ऐरिकिण (सागर जिल्ह्यातील एरण) येथे बांधलेल्या विष्णुमंदिराचे अवशेष अदयापि तेथे दिसतात. त्यावरून तत्कालीन स्थापत्य व शिल्पकलेची प्रचिती येते. वामनाच्या काव्यालंकारसूत्रवृत्तीत उद्धृत केलेल्या श्लोकार्धावरून सुप्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ वसुबंधू यास त्याचा आश्रय होता असे समजते. त्याकाळी लंकेतून बोधगयेस गेलेल्या काही यात्रेकरूंना तेथे राहण्याची अडचण भासली, तेव्हा त्यांनी आपल्या (मेघवर्ण) राजाचे त्याच्याकडे लक्ष वेधले. त्या राजाने समुद्रगुप्ताकडे मौल्यवान नजराणा पाठवून बोधगया येथे श्रीलंकेच्या यात्रेकरूंकरिता विहार बांधण्याची परवानगी मागितली आणि समुद्रगुप्ताने ती आनंदाने दिली.

समुद्रगुप्ताच्या ध्वजांकित नाण्यासारखी काही सोन्याची नाणी सापडली आहेत. त्यांच्या पुढील बाजूवर ‘काचो गामवाजित्य दिवं कर्मभिरूतमैर्ज-यति’ असा लेख आणि मागील बाजूवर ‘सर्वराजोच्छेत्ता’ असे बिरूद आहे. ही नाणी पाडणारा हा काच नृपती कोण, याविषयी विद्वानांत मतभिन्नता आहे. कोणी म्हणतात तो समुद्रगुप्ताचा वडीलभाऊ होता, तर इतर कोणी तो त्याचा पुत्र होता आणि पुढे चुकीने त्याचे नाव रामगुप्त असे वाचण्यात आले असे प्रतिपादितात पण त्याच्या नाण्यांवरील लेख समुद्रगुप्ताच्या काही नाण्यांवरील लेखकासारखाच आहे. विशेषत: त्याचे ‘सर्वराजोच्छेत्ता’बिरूद सार्थ असेल, तर ते गुप्तवंशात एका समुद्रगुप्तालाच लागू पडते. तेव्हा ही नाणी समुद्रगुप्तानेच पाडली होती आणि काच हे त्याचे दुसरे नाव होते, हा पक्ष संभवनीय वाटतो.

इतिहासकार समुद्रगुप्ताला भारतीय नेपोलियन मानतात कारण त्याची कारकीर्द दिग्विजयात गेली. समुद्रगुप्ताला अनेक राण्या होत्या. त्यांतील दत्तदेवी ही पट्टराणी होती. तिचा मुलगा चंद्रगुप्त (दुसरा) समुद्रगुप्तानंतर गादीवर आला.

पहा : गुप्तकाल.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1983.

     2. Majumdar, R. C. Altekar, A. S. The Vakatak-Gupta Age, Lahore, 1946.

      ३. गोपाल, लल्ल्नजी, समुद्रगुप्त, लखनव, १९६९.

मिराशी, वा. वि.