समाक्ष केबल : उच्च् कंप्रता विद्युत् संकेताचे वहन (उदा., आकाशकाला होणारा उच्च् कंप्रता विद्युत् प्रवाह पुरवठा) करण्याकरिता साध्या तारा चालत नाहीत, याकरिता सर्वांत सोपी व सामान्य पद्धती म्हणजे समांतर प्रेषण तारा योजना ही होय. हिच्याव्दारे विद्युत् प्रवाह प्रेषित केला असता यामध्ये विद्युत् शक्तीचा क्षय अनेक प्रकारे होऊ शकतो : (१) तारांच्या कार्यकारी रोधामुळे तारांच्या समग लांबीवर जूल शक्तिपात होतो. विद्युत् प्रवाह प्रत्यावर्ती (उलट-सुलट दिशेत वाहणारा) असल्यामुळे तो ⇨ त्वक् परिणामा नुसार संवाहक तारेच्या सबंध काटच्छेदाचा उपयोग करीत नाही. त्यामुळे कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या आवर्ताची संख्या) जशी वाढते तसे या रोधाचे मूल्य वाढत जाते असे दिसून येते. (२) विद्युत् प्रवाह प्रत्यावर्ती असल्यामुळे दोन तारांमधील विद्युत् अपारक [→ विद्युत् अपारक पदार्थ] भागातून धारक विद्युत् प्रवाह वाहतो. त्यामुळे अपारक शक्तिव्यय होतो. (३) तारांच्या सीमान्त स्थानी परावर्तना-मुळे शक्तिपात होतो. याकरिता भार हा शुद्ध रोधी स्वरूपाचा वापरून त्याचे मूल्य तारा योजनेच्या विशेषक संरोधाएवढे ठेवल्यास हा व्यय थांबविता येतो. (४) समांतर तारा योजनेमधून उच्च् कंप्रतेचा विद्युत् प्रवाह जात असल्यास, तारांतून वाहणाऱ्या ऊर्जेपैकी काही भाग प्रारित केला जातो. (५) समांतर तारा योजना अननुस्पंदी नसल्यास तारांमध्ये स्थिर तरंग निर्माण होण्याची शक्यता राहते, यामुळे काही ऊर्जा समांतर तारा योजनेत अडकली जाऊन तिचा ऱ्हास होऊ शकतो. स्थिर तरंग निर्माण होण्याकरिता विद्युत् ऊर्जेचे कोठे तरी परावर्तन व्हावे लागते. हे सीमान्त स्थानी होऊ शकेल किंवा तारांमध्ये खंड, सांधा अथवा विद्युत् गुणधर्मांत अचानक बदल यांमुळे सुद्धा होऊ शकेल. असे घडू नये म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी लागते. समांतर तारा योजनेतील वरील दोष काढून टाकून तिची उच्च कंप्रता विद्युत् प्रवाह वहनक्षमता वाढविण्याकरिता समाक्ष केबल योजना संशोधित करण्यात आली.
एकमेकांपासून निरोधित (विद्युत् दृष्टया अलग) केलेल्या दोन समकेंद्री संवाहकांना समाक्ष (एकच समाईक अक्ष असलेली) केबल असे म्हणतात. समाक्ष केबल हा शब्द सामान्यत: पॉलिएथिलीन या घन, चिवट विद्युत् अपारकाचा वापर केलेल्या लवचिक ⇨ प्रेषण मार्गा साठी वापरतात. यामधील आंतरिक तार (संवाहक) बऱ्याच पेडांच्या तांब्याच्या तारांची गुंफण करून बनविलेली असते. कधीकधी तिच्यावर चांदीचा किंवा निकेलाचा मुलामा दिलेला असतो. या कियांमुळे त्वक् परिणामानुसार होणाऱ्या रोधामधील वाढीचे बऱ्याच प्रमाणात निराकरण करता येते. यामधील बाह्य संवाहक वेणीगुंफित तांब्याचा असतो. बाह्य संवाहक आंतरिक संवाहकाला पूर्णपणे वेढतो व त्याकरिता विद्युत् त्रायक (परिरक्षक) बनतो. या दोन संवाहकांमध्ये विद्युत् प्रवाहाची दिशा एकमेकांच्या उलट असते. या सर्व गोष्टींमुळे समाक्ष केबलीमध्ये प्रारण व्ययाचे प्रमाण नगण्य असते. दोन्ही संवाहकांमध्ये पॉलिएथिलीन या विद्युत् अपारकाचा वापर केला असल्यामुळे या योजनेत अपारक शक्तिव्यय अत्यंत कमी असतो. समाक्ष केबलीमध्ये विद्युत् त्रायक पद्धती उच्च् क्षमतेची असल्यामुळे तिच्याजवळ धातूचे पदार्थ आले, तरी त्यांपासून काहीच अपाय होत नाही. त्यामुळे समाक्ष केबल जमिनीत पुरली, तरी त्यापासून तिला काही धोका पोहोचत नाही. त्यामुळे दूरचित्रवाणी, रेडिओ, वाहक-दूरध्वनी आणि इतर उच्च कंप्रता-उपकरणांत त्यांचा उपयोग होतो. एकनलिक (एकच नलिका असलेली) समाक्ष केबल दूरचित्रवाणी वितरणासाठी वापरतात, तर बहुनलिक केबल वाहक-दूरध्वनी आणि संदेशक मंडलांत वापरतात. आकृतीमध्ये १० समाक्ष प्रेषण मार्गांच्या जोड्या अंतर्भूत असलेल्या समाक्ष केबलीचा छेद दर्शविला आहे.
आधुनिक तंत्रांचा वापर केला असता प्रत्येक समाक्ष प्रेषण मार्गांची जोडी ०·५६४ ते १७·५४८ मेगॅर्हट्झ (दशलक्ष र्हट्झ) या पट्टयतील कंप्रता वाहून नेऊ शकते. या पट्टयमध्ये ३,६०० वाहक-दूरध्वनी मंडले किंवा एक दूरचित्रवाणी आणि ३,००० दूरध्वनी मंडले समाविष्ट होऊ शकतात १ सेंमी. प्रसामान्य (प्रमाण) केबलमध्ये प्रतिमैलास अंदाजे १ डेसिबल ते १६·२ डेसिबल इतके क्षीणन होते. केबलीची लांबी कित्येक मैल असल्यास पुन:क्षेपण केद्रांमधील (क्षीण झालेल्या लहरींचे वर्धन करून पुन:क्षेपन करणाऱ्या केंद्रातील) विवर्धक आणि जालक मंडलांच्या साहाय्याने आदान संकेताच्या कंप्रता पट्टातील सर्व कंप्रतांचे सारख्या प्रमाणात विवर्धन केले जाऊन संकेताचे मूळ स्वरूप कायम ठेवले होते. नजीक असलेल्या समाक्ष मार्गांतील विद्युत् चुंबकीय तरंगांचे युग्मन नीच कंप्रतांना वाढत जाते. त्यामुळे नीचतम उपयुक्त कंप्रतेवर मर्यादा होते. उच्च्तम उपयुक्त कंप्रतेत वाढ करण्यासाठी पुन:क्षेपण केंद्रे जवळजवळ ठेवावी लागतात.
विद्युत् चुंबकीय क्षेत्र : समाक्ष केबलीमधील विद्युत् चुंबकीय क्षेत्र दोन संवाहकांच्यामधील जागेतच निर्बंधित असते. त्यामध्ये विद्युत् प्रेरणा रेषा अरीय (चाकाच्या आकृत्यांप्रमाणे) असतात आणि चुंबकीय प्रेरणा रेषा समकेंद्री वर्तुळांच्या स्वरूपात असतात.
पहा : केबल दूरचित्रवाणी दूरध्वनिविदया प्रेषण मार्ग रेडिओ प्रेषण.
संदर्भ :1. Henny, K. Radio Engineering Handbook, New York,1959.
2. Lance, A. L. IntroductiontoMicrowaveTheoryandMeasurements, New York, 1964.
3. Orr, W. S. Radio Handbook, Summerland, 1959.
शेंडे, अ. वा.