समाशोधन केंद्र : (क्लिअरिंग हाउस). बँकिंगच्या व्यवहारातील एक सेवा-सुविधा. समाशोधन केंद्राव्दारे सदस्य-बँकांकडे आलेले धनादेश व तत्सम देयके यांची देवाणघेवाण करण्यात येऊन उरणारी शिल्ल्क रोख स्वरूपात संबंधित खातेदाराला चुकती करण्यात येते किंवा त्याच्या नावे जमा करण्यात येते किंवा देय असलेली बाकी रक्कम संबंधितांच्या खात्यावर नावे टाकण्यात येते.

समाशोधन केंद्राची व्यवस्था व रचना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आधिपत्याखाली व ठरविलेल्या पद्धतीनुसार चालते. ज्या शहरांत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शाखा आहेत, तेथे त्या शाखा व इतर शहरांत भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व अन्य ठिकाणी रिझर्व्ह बँक मंजूर करील, त्या सरकारी बँकेच्या शाखांमार्फत याचे व्यवस्थापन होते. समाशोधन केंद्राची सदस्यता राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी व्यापारी बँका व सहकारी बँका अथवा त्यांच्या शाखा यांनाच प्राप्त होते. मात्र व्यक्तिगत सदस्यत्व दिले जात नाही. हे केंद्र चालविणारी बँक ही अध्यक्ष असून सदस्य बँकांतून कार्यकारी मंडळ निवडले जाते व ते मंडळ कामकाजाची पद्धत, नियम वगैरे मंजूर करते.

समाशोधन केंद्र चालविणारी बँक त्यासाठी जागा उपलब्ध करून देते. केंद्राची सदस्यता ज्या बँकांना मिळाली नाही, त्यांना सदस्य बँकेच्या शिफारशीवरून उपसदस्यता मिळू शकते. समाशोधन केंद्राच्या नियमांप्रमाणे सदस्य वा उपसदस्य असलेल्या बँकांना सदस्यत्वाचा राजीनामा देता येतो. त्याचप्रमाणे नियमांनुसार त्यांचे सदस्यत्व रद्दही होऊ शकते.

समाशोधन केंद्राची व्यवस्थापकीय बँक-केंद्रावर होणारा व्यवस्थापकीय खर्च, जागा-भाडे, दूरध्वनी यांसारख्या सुविधांसाठी होणारा खर्च सर्व सदस्य बँकाकडून सारख्या प्रमाणात वाटून त्यांच्या खात्यांत नावे टाकून वसूल केला जातो. या केंद्राच्या व्यवस्थापन-मंडळाच्या नियमानुसार सभा होऊन त्यात व्यवस्थापनासंबंधी सूचना, अडचणी वगैरेंचा वेळोवेळी विचार होतो.

समाशोधन केंद्राच्या सदस्य बँकांचे व्यवस्थापकीय बँकेत खाते असणे आवश्यक असते. सदरच्या खात्यात सदस्य बँकेला किमान ठरलेली रक्कम ठेवावीच लागते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी सदस्य बँकेकडून दररोज कमीत कमी धनादेशांची अटही लागू करण्यात येते. प्रत्येक सदस्य बँकेने आपल्या अधिकृत प्रतिनिधीचे नाव व्यवस्थापकीयबँकेकडे कळवायचे असते. समाशोधन केंद्र दररोज दोन वेळा काम करते. पहिल्या वेळी सर्व सदस्य बँका त्यांच्याकडे असलेले धनादेश एकमेकांकडे वटविण्यासाठी देतात. त्यानंतर सदस्य बँका पुन्हा एकत्र येऊन वटणारे धनादेशांचे हिशेब ठरलेल्या पद्धतीने एकमेकांकडे जमा अथवा नावे करतात. अशी रक्कम त्यांच्या व्यवस्थापकीय बँकेच्या खात्यात जमा अथवा नावे होऊन हिशेब पूर्ण होतात. न वटलेले धनादेश त्या त्या बँकेकडे कारणांसह परत केले जातात. वटलेल्या धनादेशांची रक्कम ती ती बँक आपल्या ग्राहकांच्या खात्यात जमा करते. न वटलेले धनादेश ग्राहकांना परत केले जातात. मुंबईसारख्या मोठया औदयोगिक शहरात समाशोधन केंद्रातून अब्जावधी रकमेची तर, तालुका स्तरावर कित्येक लाख रकमेची दररोज उलाढाल होते.

अभ्यंकर, पराशर कृ.