समद्रव्यमानांक : तोच द्रव्यमानांक [ A ] परंतु भिन्न अणुकमांक [ Z ] असलेल्या अणूंना अणुकेंद्रीय भौतिकीत समद्रव्यमानांक असे म्हणतात. म्हणजेच न्यूक्लिऑनांची (न्यूट्रॉन व प्रोटॉन यांची एकूण) संख्या सारखी असते परंतु प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या वेगवेगळी असते. उदा., क्लोरीन (३७) आणि आर्गॉन (३७) हे समद्रव्यमानांक आहेत. क्लोरीन (३७) च्या अणुकेंद्रात १७ प्रोटॉन व २० न्यूट्रॉन असतात. तर आर्गॉन (३७) च्या अणुकेंद्रात १८ प्रोटॉन व १९ न्यूट्नॉन असतात. स्वाभाविकपणे समद्रव्यमानांकाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म वेगवेगळे दिसतात. कारण द्रव्यमान जवळजवळ सारखेच असले, तरी ते अणू निरनिराळ्या मूलद्रव्यांचे असतात. ज्या दोन घटकांपैकी ( द्रव्यमानांक, अणुकमांक ) कोणता तरी एक घटक निश्र्चित माहीत नाही अशा समद्रव्यमानांकाच्या १० जोडया वगळता इतर ४४ जोडया माहीत आहेत. पुष्कळशा मद्रव्यमानांकामध्ये द्रव्यमानांकाच्या व अणुकमांकाच्या संख्या सम असतात आणि त्यातील अणुकमांकांमध्ये दोन अंकांचा फरक असतो. परंतु द्रव्यमानांकांच्या व अणुकमांकांच्या संख्या विषम आणि अणुकमांकांमध्ये एक अंकाचा फरक असलेले समद्रव्यमानांक फार थोडे आहेत. अणुकमांकांमध्ये एक अंकाचा फरक असलेल्या समद्रव्यमानांकामधील दोन्ही अणू स्थिर असू शकत नाहीत. अपरिहार्यपणे β– उत्सर्जनाने [ Z → Z + 1], β+ उत्सर्जनाने [ Z → Z – 1] किंवा इलेक्ट्रॉनाचा ऱ्हास करून [ Z → Z – १] एक अणू दुसऱ्या अणूमध्ये ऱ्हास पावतो. अशा प्रकारे बीटा क्षयात जनक व अपत्य अणुकेंद्रे नेहमीच समद्रव्यमानांक असतात. कारण या प्रक्रियेत एक तर न्यूट्नॉनाचे प्रोटॉनात अथवा प्रोटॉनाचे न्यूट्नॉनात परिवर्तन होते. स्थिर समद्रव्यमानांक जोडयांची पुष्कळशी उदाहरणे माहीत आहेत. तसेच स्थिर समद्रव्यमानांक त्रिकूटांची चारच उदाहरणे आहेत. द्रव्यमानांकांच्या [A] बहुतेक मूल्यांच्या बाबतीत ज्ञात किरणोत्सर्गी समद्रव्यमानांकांची संख्या स्थिर समद्रव्यमानांकांच्या संख्येपेक्षा जास्त असते.
समस्थानिकांमध्ये (समद्रव्यमानांकाप्रमाणे नव्हे) अणुकमांक तोच परंतु द्रव्यमानांक भिन्न असतात. समद्रव्यमानांकीय समस्थानिकामध्ये समान द्रव्यमानांक व समान अणुकमांक असलेल्या एका मूलद्रव्याचे दोन प्रकार आढळून येतात. अणूच्या एका प्रकारापासून गॅमा किरणांच्या क्षयाने अणूचा दुसरा प्रकार मिळतो. तसेच नेहमीच्या किरणोत्सर्गी पद्धतीप्रमाणे ( प्रारण क्रियेप्रमाणे ) त्या अणूच्या प्रकारापासून विघटन क्रियेने दुसरे मूलद्रव्य मिळते. या दोघांचे अर्धायुकाल भिन्न असतात.
पहा : अणुकेंद्रीय भौतिकी किरणोत्सर्ग मूलद्रव्ये.
सूर्यवंशी, वि. ल.