समता-२ : पुंजयामिकीनुसार समता हा तरंग फलनाचा एक भौतिकीय गुणधर्म आहे. तरंग फलनाच्या व्युत्करमणाखालील वर्तनाचे खुलासेवार वर्णन समतेव्दारे केले जाते. म्हणजे सर्व तिन्ही अवक्राशीय सहनिर्देशकांच्या एकाच वेळी आदिबिंदूतून होणाऱ्या परावर्तनाच्या स्थितीखालील तरंग फलनाच्या वर्तनाचे समता हे तपशीलवार विवेचन असते. अशा रीतीने बहुतेक बाबतीत समतेचा संबंध मूलभूत कणांच्या प्रणालीचे निदर्शन वा प्रतिनिधित्व करणाऱ्या तरंग फलनाच्या सममितीशी असतो (म्हणून समतेला अवक्राश परावर्तन सममिती असेही म्हणतात). गणितीय पद्धतीने सांगावयाचे झाल्यास तरंग फलनाच्या प्रणालीचे वर्णन करणाऱ्या सहनिर्देशकांचे आदिबिंदूतून व्युत्क्रमण होते. म्हणजे x,y व z या सहनिर्देशकांची जागा -x,-y व -z हे सहनिर्देशक घेतात. व्युत्कमणाने तरंग फलनात बदल न झाल्यास त्याची समता +१ (किंवा सम) व केवळ चिन्हात बदल झाल्यास त्याची समता -१ किंवा विषम असते. समता या संकल्पनेला क्षेत्रे व तरंग यांच्या संबंधातच अर्थ असतो आणि म्हणून केवळ अभिजात (रूढ) क्षेत्र सिद्धांतात किंवा पुंजयामिकीत समतेला अर्थ असतो. समतेची कल्पना हे पुंजयामिकीतील एक उपयुक्त साधन आहे [⟶ पुंजयामिकी].
भौतिकीमध्ये घटना (किंवा वस्तू वा प्रक्रिया) आणि तिचे आरशातील प्रतिबिंब ( प्रतिमा) ही दोन्ही जेव्हा निसर्गाच्या नियमांची परिपूर्ती करतात, तेव्हा समतेचे संरक्षण होते म्हणजे समतेची अक्षय्यता राखली जाते, असे भौतिकीविद मानतात. या बाबतीत निरीक्षकाला घटना व तिचे प्रतिबिंब यांतील भेद सांगता येत नाहीत. घटना व तिची प्रतिमा यांनाही हेच नियम लागू पडतात आणि यामुळे निरीक्षकाला एकीपासून दुसरी वेगळी ओळखण्याचा कोणताही निकष (वा सुगावा) उपलब्ध नसतो. समतेच्या अक्षय्यतेचे हे तत्त्व हंगेरीत जन्मलेले ⇨यूजीन पॉल विग्नर यांनी १९३३ च्या सुमारास सुस्पष्टपणे सूत्रबद्ध केले. या तत्त्वामुळे समतेची अक्षय्यता व कालव्युत्करमण या आविष्कारांचा तर्कशुद्ध परामर्श घेण्यास पहिला आधार मिळाला. सामान्य अशा सर्व यांत्रिक व विद्युतीय प्रणालींमध्ये समतेची अक्षय्यता राखली जाते. हे तत्त्व सुमारे तीस वर्षे आधारभूत मानण्यात येत होते.
समतेची अक्षय्यता हा नैसर्गिक नियम असून तो सर्व घटनांना लागू पडतो, असे एकेकाळी भौतिकीविद मानीत असत. मात्र चीनमध्ये जन्मलेले ⇨चेन निंग यांग आणि ⇨त्सुंग-डाओ ली या भौतिकीविदांनी १९५६ साली बीटा क्षयासारख्या (ऱ्हासासारख्या ) दुर्बल अणुकेंद्रीय परस्परक्रियांच्या (आंतरक्रियांच्या) बाबतीत समता अक्षय्यता तत्त्वाचे उल्ल्घन होण्याची शक्यता असल्याचे सैद्धांतिक भाकीत केले. या शक्यतेची चाचणी घेण्यासाठी व पुष्टी करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोगही सुचविले. के मेसॉन या मूलकणांच्या क्षयाविषयाची काही कोडी जाणून घेण्याचा प्रयत्न हे दोघे तेव्हा करीत होते.अणूपेक्षा लहान आकारमानाच्या मूलकणांच्या बाबतीत विद्युत चुंबकीय, प्रबल व दुर्बल या तीन परस्परक्रिया महत्त्वाच्या असतात. मात्र दुर्बल परस्परक्रियेला समतेच्या अक्षय्यतेचे तत्त्व लागू पडते असे दर्शविणारा कोणताच पुरावा नसल्याचे या दोघांनी दाखविले. भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या किरणोत्सर्गी अणुकेंद्रातून होणारे इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन हे दुर्बल परस्परक्रियेचे उदाहरण आहे.
सदर भाकिताशी निगडित असलेला पहिला प्रयोग युनायटेड नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडर्ड्समधील ई. अँबलर, डब्ल्यू. हेवर्ड, डी. डी. हॉप्स आणि सी. एस्. वू यांनी केला. यासाठी त्यांनी कोबाल्ट (६०) या किरणोत्सर्गी मूलद्रव्याचे अणू वापरले होते. या प्रयोगाच्या फलावरून अणूपेक्षा कमी आकारमानाच्या कणांच्या बाबतीत समतेचे नेहमीच संरक्षण होत नसल्याचे दिसून आले. कोलंबिया व शिकागो विदयापीठांतील इतर शास्त्रज्ञांनीही असे प्रयोग केले आणि यांग व ली यांच्या भाकिताची सत्यता प्रस्थापित केली. अशा प्रकारे समतेची अक्षय्यता हा निसर्गाचा वैश्विक नियम नसल्याचे दिसून आले. या शोधामुळे आणवीय व मूलकण भौतिकीच्या मूलभूत सिद्धांतात आमूलाग्र बदल घडून येण्यास मदत झाली. जटिल प्रणालीला एकूण (समग) समता असून ती त्या प्रणालीच्या घटकांच्या समतांचा गुणाकार असते.
पहा : अणुकेंद्रीय भौतिकी पुंजयामिकी मूलकण सममिति नियम.
ठाकूर, अ. ना.