सप्तशृंगी : महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शक्तिपीठ. ते नासिक जिल्ह्यात चांदोर ( चांदवड ) पर्वतश्रेणीत नासिकच्या उत्तरेला सु. ४४ किमी.वर सप्तशृंगी देवी आहे. येथील शिखरांची सस.पासून उंची १,४८० मी. आहे. सात शिखरांचे ( शृंगे ) स्थान म्हणून यास सप्तशृंगी हे नाव पडले. मात्र प्रत्यक्षात येथून चारच शिखरे दिसतात. म्हणून त्याचा उल्लेख कधीकधी चतु:शृंगी असाही करतात. ब्रह्मवैवर्त पुराण व सप्तशती देवी माहात्म्य प्रकरणात सप्तशृंगीच्या अवतरणाविषयीची कथा आढळते.
मंदिराला तिन्ही बाजूंनी पायवाटा आहेत. त्यांपैकी वणीच्या बाजूने ३५० पायऱ्या लागतात.या पायऱ्या गिरमाजी रायराव नाईक यांच्या कान्हेरे,रूद्राजी व कृष्णाजी या तीन मुलांनी इ. स. १७६८-६९ दरम्यान बांधल्या. त्यांनी एक गणेशकुंड व गणेशमंदिर बांधल्याचाही उल्लेख पायऱ्यावरील पाच कोरीव लेखांत मिळतो. पायऱ्याच्या चढणीवर राम, हनुमान, राधा-कृष्ण आदींच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. या पायऱ्या संपल्यावर विस्तृत पठार लागते. तेथे काली, सूर्य, दत्तात्रेय आदी कुंडे असून धर्मशाळा आहे. कोळ्यांची वस्तीही आहे. पठारापासून सप्तशृंगीनिवासिनी देवीपर्यंत सु. ४७२ पायऱ्याची चढण आहे. या पायऱ्या सेनापती खंडेराव दाभाडयंच्या पत्नी उमाबाई यांनी इ. स. १७१० मध्ये बांधल्या.
शिखरावर एका पूर्वाभिमुख खडकात १८ चौ. मी. गुहावजा दालनात देवीची २· ४३ मी. उंचीची भव्य मूर्ती खडकात कोरलेली असून तिला अष्टभुजा देवी संबोधतात परंतु प्रत्यक्षात देवीला अठरा हात असून बहुतेक हातांत शस्त्रास्त्रे आहेत. एक डावा हात डाव्या बाजूच्या कानावर टेकला आहे. सततच्या शेंदूर विलेपनामुळे देवीचे मूळ अपेक्षित स्वरूपाचे मूर्तिशिल्प अस्पष्ट झाले आहे. दररोज देवीच्या माथ्यावर मुकुट ठेवून तिला साडी-चोळी नेसवितात व सणासुदीला दागिने घालतात. देवी सकाळी बाला, दुपारी तरूणी व सूर्यास्ताला वृद्धा भासते अशी श्रद्धा आहे. मंदिराच्या शिखरावर एक दुर्गम सुळका असून त्यावर यात्रेच्या वेळी निशाण ( ध्वज ) लावणे, हा साहसी कार्यकम असतो व तो मान बुरी गावच्या एका वतनदार घराण्याकडे जातो. दरवर्षी चैत्र आणि अश्विन महिन्यांत येथे मोठी यात्रा भरते. अनेकांची ही कुलदेवताही आहे.
संदर्भ : प्रभुदेसाई, प्रल्हाद कृष्ण, संपा. आदिशक्तीचे विश्वस्वरूप अर्थात देवीकोश, भाग २-३, पुणे, १९६५.
देशपांडे, सु. र.