सप्तर्षि : सात ऋषींचा समूह. हा प्रत्येक मन्वंतराशी निगडित असतो. मनू हे प्राचीन प्रशासकाचे पद अशी कल्पना पुराणांत आढळून येते. ह्या प्रशासकाच्या साहाय्यार्थ देवतागण, इंद्र, अवतार, मनुपुत्र ह्यांबरोबर त्या-त्या मन्वंतराचे मनू म्हणजे प्रशासक बदलला, की मन्वंतर झाले, असे म्हटले जाते ) सात ऋषीही असतात. प्रजा उत्पन्न करणे, हे सप्तर्षींचे कार्य असून ह्या प्रजेचे पालन मनू , तसेच त्याचे पुत्र करतात.[→ मनु].
प्रत्येक मन्वंतराचे सप्तर्षी वेगळे असतात. पुराणांत मानलेल्या चौदा मन्वंतरांचे एकूण अठ्ठयाण्णव ऋषी होतात.अंगिरस् (भृगू ),अत्री,कतू , पुलस्त्य, पुलह, मरीची आणि वसिष्ठ हे स्वायंभुवनामक पहिल्या मन्वंतरातले सप्तर्षी होत. सध्या चालू असलेले मन्वंतर सातवे असून ते ‘ वैवस्वत मन्वंतर ’ म्हणून ओळखले जाते. ह्या मन्वंतरातले सप्तर्षी असे : अत्री, कश्यप (काश्यप,वत्सर ), गौतम (शरद्वत ), जमदग्नी, भरद्वाज (भारद्वाज), वसिष्ठ ( वसुमत् ), विश्वामित्र. ऋग्वेद सर्वानुकमणी त खालील सूक्तद्रष्टे कवी सप्तर्षी म्हणून निर्दिष्ट केलेले आहेत : भारद्वाज बार्हस्पस्त्य, कश्यप मारीच, गोतम राहूगण, अत्रि भौम, विश्वामित्र गाथिन, जमदग्नी भार्गव, वसिष्ठ मैत्रावरूणी (९·१०७·१-२६ १०·१३७·१-७). महाभारता त सप्तर्षींची नामावली दिलेली असून तीत उल्लेखिलेले सप्तर्षी असे : मरीची, अत्री, अंगिरस्, पुलस्त्य, पुलह, कतू , वसिष्ठ. महाभारतात सप्तर्षींना ‘ दिशांचे स्वामी ’ असे म्हटले असून प्रत्येक दिशेच्या सप्तर्षींची नामावलीही दिली आहे.
भाद्रपद शुद्ध पंचमीस स्त्रिया करीत असलेल्या ⇨ऋषीपंचमी स सध्याच्या वैवस्वत मन्वंतराच्या सात ऋषींचीच पूजा करतात. श्रावणी वगैरे कित्येक धर्मकृत्यांत सप्तर्षींची पूजा करतात. काही ठिकाणी विवाहविधीच्या प्रसंगी वधू-वरांना वसिष्ठ-पत्नी अरूंधती हिचे दर्शन घ्यावयास लावतात.
पहा : ऋषि.
कुलकर्णी, अ. र.