सद्दाम हुसेन : ( २८ एप्रिल १९३७-३० डिसेंबर २००६). इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष व हुकूमशाह. त्याचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात, बगदादजवळील तिकित ( अल् औजा ) गावात झाला. हुसेनला त्याची विधवा आई आणि नातेवाईक यांनी वाढविले. त्याने बगदाद व कैरो येथील विदयालयांत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करी अकादमीत प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. बगदाद येथे १९५५ नंतर त्याने अरब राष्ट्रनीय चळवळी अंतर्गत बाथ पक्षाच्या राज-कारणात सकिय भाग घेतला. या सुमारास लष्कराने केलेल्या अवचित सत्तांतरात (१४ जुलै, १९५८) तेथील राजेशाही संपुष्टात येऊन बिगेडियर अब्दुल करीम कासीम पंतप्रधान व कर्नल अब्दुल सलिम आरेफ उपपंतप्रधान झाले पण पुढे कासीम व आरेफ यांत वितुष्ट आले. कासीमने सर्वसत्ता आपल्या हाती घेतली व आरेफला पदच्युत केले. त्याच वेळी कुर्दांनी उठाव केला. कासीमचा खून करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला (१९५९). त्यात हुसेनने महत्त्वाचा वाटा उचलला होता. या संघर्षात दोघेही जखमी झाले आणि हुसेन कैरोला ( ईजिप्त ) पळून गेला. तिथे त्याने पक्षाचे कार्य चालूच ठेवले. शिवाय एक वर्ष कायदयाचा अभ्यास केला. बगदादमध्ये बाथ पक्ष व राष्ट्रनीय लष्करी अधिकारी ह्यांच्या सहकार्याने फेबुवारी १९६३ रोजी पुन्हा लष्करी अवचित सत्तांतर होऊन जनरल कासीमला ठार मारण्यात आले आणि बाथ पक्षाने सत्ता हस्तगत केली. तेव्हा हुसेन इराकला परतला. त्याने उर्वरित कायदयाचा अभ्यास बगदाद विदयापीठात केला. त्याचवर्षी त्याने साजिदा खैरल्ल या युवतीशी विवाह केला. यावेळी कर्नल आरेफ राष्ट्राध्यक्ष व बिगेडियर अहमद अल् बक पंतप्रधान झाले. १८ नोव्हेंबर १९६३ रोजी अध्यक्ष आरेफने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली व बगदाद येथे एक कांतिकारी विभाग स्थापन केला. त्याच्या जुलमी सत्तेविरूद्ध सद्दाम हुसेनने कट रचला (१९६४). तो उघडकीस येऊन हुसेनला तुरूंगात डांबण्यात आले. तुरूंगात असतानाच त्याची बाथ पक्षाचा विभागीय नेता म्हणून निवड झाली (१९६५). त्याने तुरूंगातून पलायन केले. १३ एप्रिल १९६६ मध्ये अध्यक्ष आरेफचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा भाऊ अब्दुल आरेफ अध्यक्ष झाला. हुसेनने आरेफविरूद्धच्या जुलै १९६८ च्या क्रांतीत प्रमुख भूमिका बजावली. पदभ्रष्ट अध्यक्ष आरेफ अज्ञातवासात गेला. अहमद बक इराकचा राष्ट्राध्यक्ष झाला तथापि हुसेन हाच वस्तुत: ( डी फॅक्टो ) सर्वाधिकारी होता. त्याची कांतिकारी मंडळाच्या समितीचा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली (१९६९). जनरल बकशी हुसेनचे सौहार्दपूर्ण संबंध होते.
हुसेनने प्रथम देशांतर्गत समस्यांच्या बाबतीत लोकांशी संवाद साधला. १९७० मध्ये कुर्दिश अलगवादी नेत्यांबरोबर बोलणी करून एका करारान्वये त्या लोकांना अंतर्गत स्वातंत्र्य दिले. हा करार जेव्हा संपुष्टात आला, तेव्हा कुर्दांच्या कडव्या संघर्षाला तो कारणीभूत ठरला. हुसेनने कुर्दांवर हल्ले केले. इराकमधील तेल उदयोगांचे राष्ट्रनीयीकरण करण्यात (१९७२) हुसेनचा महत्त्वाचा वाटा होता. तेल उदयोग हा इराकच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता, सर्वस्व होते. तेलाच्या किंमती १९७३ मध्ये गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला उत्थान मिळाले. नवीन शाळा, विदयापीठे, रूग्णालये आणि कारखाने यांच्यात लक्षणीय वाढ झाली. आधुनिकीकरणाकडे देशाची वाटचाल चालू झाली. मुस्लिम स्त्रिया बुरख्याशिवाय सामाजिक जीवनात सहभागी होऊ लागल्या व शिक्षणही घेऊ लागल्या.
परराष्ट्रनीय धोरणाच्या बाबतीत सुरूवातीला हुसेनने इराकला मध्यपूर्वेत महत्त्वाची भूमिका पार पाडण्यास मदत केली. इराणबरोबर वाटाघाटी करून १९७५ मध्ये त्याने इराकी सीमारेषा निश्चित करताना काही सवलती इराणला देऊ केल्या. त्याबदल्यात इराणने इराकमधील कुर्दांच्या चळवळीस असलेले समर्थन काढून घेतले. हुसेनने १९७९ मध्ये ईजिप्त आणि इझ्राएल यांच्यात कँप डेव्हिड येथे झालेल्या सामंजस्य करारास अरब लीगचा विरोध असल्याचे निदर्शनास आणले. राष्ट्राध्यक्ष अल् बक सकिय राजकारणातून १९७० नंतर हळूहळू बाजूला होऊ लागला होता. त्याने १९७९ साली राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हुसेन राष्ट्राध्यक्ष झाला. त्यांनी पंतप्रधान, लष्कर प्रमुख, राष्ट्रनीय क्रांतिकारी मंडळाचे अध्यक्षपद वगैरे अनेक पदे गहण केली. याच सुमारास इराणमध्ये रूहोल्ल खोमेनीच्या नेतृत्वाखालील इस्लामी सनातन्यांनी राजेशाही उलथवून टाकून इस्लामिक प्रजासत्ताक स्थापिले. तेव्हा हुसेनला मुस्लिम मूलतत्त्ववादी विचार इराकमध्ये फैलावतील, अशी चिंता वाटू लागली. विशेषत: इराक-मधील शिया मुस्लिम त्यांच्या आहारी जातील असे त्याला वाटले. तेव्हा त्याने गुप्तचर विभागाचा स्वैर वापर करून देशांतर्गत शत्रू नेस्तनाबूत केले. तसेच इराकी जनतेत स्वत:चा व्यक्तिप्रभाव ( पर्सनॅलिटी कल्ट ) निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याचे ध्येय अरब राष्ट्रनांतील ईजिप्तचे वर्चस्व कमी करून इराणच्या आखातात इराकचा प्रभाव प्रस्थापित करणे, हे होते. त्याने इराणबरोबर केलेला करार १९८० मध्ये दुर्लक्षित करून इराणवर आक्रमण केले. या युद्धाला राजकीय व सीमा संघर्षाची पार्श्वभूमी होती. शिवाय खुझिस्तान हा इराणचा सीमेवरील विपुल तेल उत्पादक प्रांत बळकावण्याचा इराकचा इरादा होता. इराणच्या तेल उदयोगालाच त्यांनी लक्ष्य केले होते. इराकला या युद्धात सौदी अरेबिया आणि अन्य काही अरब राष्ट्रनांनी आर्थिक साहाय्य केले. सुरूवातीस इराकला काही विजय प्राप्त झाले मात्र त्यानंतर इराणने कडवा प्रतिकार केला. अखेर १९८८ मध्ये शस्त्रसंधी होऊन हे युद्ध थांबले. या युद्धात अमेरिका व पाश्चात्त्य देश दोन्ही बाजूंना गुप्तपणे शस्त्रे पुरवीत होते.
इराण-इराक युद्धात दोन्ही देशांची मोठी हानी झाली. हजारो सैनिक जखमी वा मृत झाले. अनेक कुटुंबे निराधार झाली. इराकला ७५ अब्ज डॉलर्स एवढे अवाढव्य कर्ज झाले. हुसेन याच्याजवळ अनुभवी आणि सुसज्ज सेना होती. या सेनेचा त्याने प्रादेशिक राजकारणात उपयोग करण्यास सुरूवात केली. तिच्याकडे रासायनिक, जैविक, विषारी वायू पसरविणारी तसेच अण्वस्त्रे होती. त्यांचा वापर करून त्यांनी शियांचे उठाव व कुर्दांचे बंड चिरडून टाकले. इराकी सैन्याने मार्च १९८८ मध्ये विषारी वायूचा वापर कुर्द वसतिस्थानावर केला. त्यात पाच हजार कुर्द मृत्युमुखी पडले व एक लाख निर्वासित झाले. कुवेतने इराकवरील कर्जातील त्याचा वाटा माफ करावा, यासाठी दबाव तंत्राचा उपयोग तो करू लागला. अखेर कुवेतवर २ ऑगस्ट १९९० रोजी त्याने आक्रमण केले आणि कुवेत इराकला जोडला. जगभर इराकविरूद्ध जनमत तयार झाले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्रांच्या फौजांनी फेबुवारी १९९१ मध्ये इराकी सैन्याला कुवेतमधून बाहेर काढले. हे इराणी आखातातील पहिले युद्ध होय. इराकी सैन्याने माघार घेताना कुवेतमधील तेलाच्या विहिरी पेटवून देऊन कुवेतचे अतोनात नुकसान केले. हे युद्ध सहा आठवडे चालले. त्यात इराकचेही नुकसान झाले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ( यूनो ) इराकवर आर्थिक निर्बंध लादले. इराकच्या दक्षिणेकडील शिया पंथीय वसतीवर इराकी विमानांना हल्ले करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच सर्व संहारक अस्त्रे नष्ट करण्यासाठी यूनोने दबाव आणला. त्यास सद्दामला संमती दयावी लागली.
या युद्धाने इराक एकाकी पडला. त्या देशाची जागतिक स्तरावर आर्थिक कोंडी केली गेली. तरीसुद्धा इराणी आखाती युद्ध संपताच हुसेनने दक्षिणेकडील शियांचा उठाव चिरडून काढला तथापि उत्तरेकडील कुर्दांची बंडखोरी त्यांना थोपविता आली नाही कारण आंतराष्ट्रनीय संघटनांचे कुर्दांना संरक्षण होते. हुसेनचा मित्रपरिवार आणि नातेवाईक या युद्धानंतर विखुरले.
ज्यांनी ज्यांनी सद्दामला आणि त्याच्या सत्तेला विरोध केला अथवा ज्यांच्या विरोधाची त्यांना भीती वाटली, अशा सगळ्यांना सद्दामनी कैद केले वा ठार मारले. संयुक्त राष्ट्रांच्या कामामध्येही सद्दाम अडथळा आणू लागला. जैविक आणि रासायनिक अण्वस्त्रे इराकने तयार करू नयेत, यासाठी संयुक्त राष्ट्राने आगही असताना त्याच्या सरकारने अशी मोहीम सुरू केली की, संयुक्त राष्ट्रांनी इराकवर कोणतीही बंधने लादू नयेत. यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय वाद त्याला झेलावे लागले. १९९८ मध्ये हे वाद मिटविण्याचा प्रयत्न म्हणून त्याने फेबुवारी व पुन्हा नोव्हेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांना निरीक्षण पथक पाठविण्यास परवानगी दिली पण डिसेंबरमध्ये त्याने निरीक्षण पथक हाकलून दिले. यावर अमेरिका आणि ब्रिटन यांनी सतत चार दिवस इराकी सैन्य आणि औदयोगिक भाग यांवर हवाई हल्ले चढविले. यास उत्तर म्हणून हुसेनने निर्णायक फर्मान काढले की, संयुक्त राष्ट्राने यापुढे कुठलेही निरीक्षण पथक इराकमध्ये पाठवू शकणार नाहीत. अखेर संयुक्त राष्ट्रांच्या दडपणामुळे शेवटी नोव्हेंबर २००२ मध्ये हुसेनला माघार घ्यावी लागली. अमेरिकेचे दडपणही वाढत होते. हुसेनने निरीक्षण पथकास इराकमध्ये येण्यास परवानगी दिली. या पथकाने अधिक वेळ निरीक्षणासाठी मागून घेतला. इराकमधील अनेक क्षेपणास्त्रे व अँथॅक्सचा साठा जप्त करण्यात आल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. तरी अमेरिका-इंग्लंड आदी देशांच्या मनात इराकमधील संहारक अस्त्रांविषयीचा संशय व भिती कायम होती. अखेर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त फौजांनी मार्च २००३ मध्ये इराकवर हल्ला चढविला. हुसेनला पकडण्यासाठी आणि देशात दडवून ठेवलेली बंदी असलेली अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी हा हल्ला होता. एप्रिल महिन्यात बगदाद पडले. सद्दाम हुसेनची राजवट संपुष्टात आली पण बंदी असलेली शस्त्रास्त्रे अमेरिकन निरीक्षकांच्या पाहणीत दृष्टोपत्तीस आली नाहीत हे इराणी आखातातील दुसरे युद्ध असून अज्ञातवासात गेलेल्या सद्दामला तिकित जवळच्या अद्वार या गावी डिसेंबरमध्ये पकडण्यात आले (२००३). त्याच्यावर कुर्द, शिया मुस्लिम इत्यादींच्या निर्घृण हत्याकांडाचे आरोप ठेवून त्याला फाशी देण्यात आले.
वाड, विजया.