संगोपित मूल : ( फॉस्टर चाइल्ड ). जेव्हा एखादे मूल त्याच्या नैसर्गिक कुटुंबातील विविध प्रकारच्या अडचणींमुळे काही मर्यादित काळापुरते दुसऱ्या कुटुंबातून वाढविले जाते, तेव्हा त्या मुलाला संगोपित मूल म्हणतात. ही सेवा संगोपनापुरती मर्यादित नसून तीत मुलाला व त्याच्या नैसर्गिक कुटुंबाला उपचारात्मक सेवा पुरविण्याची जबाबदारीही समाविष्ट आहे.
प्रत्येक मूल हे स्वत:च्या नैसर्गिक कुटुंबातूनच लहानाचे मोठे व्हावे, अशी अपेक्षा असते परंतु बऱ्याच वेळा मुलाचे संगोपन त्याच्या कुटुंबातून होऊ शकत नाही. अशा परिस्थितीतील मुलांना पूर्वी फक्त संस्थांतर्गत सेवाच उपलब्ध असत. त्यामुळे वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत ते मूल स्वत:च्या कुटुंबापासून दुरावत असे किंवा त्या कालावधीत त्याचा अगदी मर्यादित असा संपर्क कुटुंबाशी राहत असे. ह्याचे विपरीत परिणाम मुलावर होतात, असे आढळून आले आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे वेळोवेळी तयार केलेल्या मुलांच्या हक्कांच्या जाहीरनाम्यामुळे सर्व जगात बालकल्याणाच्या परंपरागत दिशांमध्ये बदल होऊ लागले.[→ बालकहक्कांचा जाहीरनामा]. प्रत्येक मुलाला त्याच्या नैसर्गिक कुटुंबातून संगोपन होण्याचा हक्क आहे व तो नाकारला जाण्याची शक्यता निर्माण झाल्यास दुसऱ्या कुटुंबातून तात्पुरते किंवा कायम संगोपन होण्याची व्यवस्था करायला हवी, ह्या तत्त्वप्रणालीवर बऱ्याच आधारात्मक सेवा बालकल्याणक्षेत्रात सुरू झाल्या. प्रतिपालकत्व सेवा योजना (फॉस्टर फॅमिली केअर) किंवा बालसंगोपन योजनाही त्यांपैकीच एक महत्त्वाची सेवा आहे.
नैसर्गिक कुटुंबातून येणाऱ्या अडचणी उदाहरणादाखल पुढीलप्रमाणे असतात : आई किंवा वडिलांचा अचानक मृत्यू, आई-वडिलांमधील बेबनाव, आजारपण, कैद किंवा व्यसनाधीनता, मुलावर कुटुंबातून होणारे शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार इत्यादी. अशा वेळी नैसर्गिक कुटुंब आपणहून अशी सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थेकडे जाऊ शकते. कुटुंबाच्या व मुलाच्या मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास करून संस्था त्या मुलासाठी योग्य त्या प्रतिपालक कुटुंबात संगोपनाची तात्पुरती सोय करते. संगोपित मुलाची प्रतिपालक कुटुंबातून सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. त्याच्या भावनिक, शारीरिक, सामाजिक, शैक्षणिक गरजा पुरविल्या जातात. प्रतिपालक कुटुंब संगोपित मुलाच्या नात्यातील किंवा नातेसंबंध नसणारेही असू शकते. स्वयंसेवी संस्थेची संगोपित मुलाच्या बाबतीत पुढील कार्ये असतात : (१) संगोपित मुलाची प्रतिपालक कुटुंबात राहण्याची मानसिक तयारी करणे. (२) सतत संगोपित मुलाच्या संपर्कात राहून त्याचे समायोजन व शिक्षण नीट होत असल्याची खात्री करत राहणे. मुलाच्या निगराणीसाठी पैशाच्या रूपाने प्रतिपालक कुटुंबाला मदत देणे. (३) लवकरात लवकर नैसर्गिक कुटुंबात मुलाला जाता यावे, म्हणून नैसर्गिक कुटुंबातील समस्यांचे निराकरण करण्यास मदत करणे.
संगोपित मुलाला किंवा ह्या संगोपनसेवेला भारतामध्ये कुठलेही कायदेशीर बंधन नाही परंतु राज्यपातळीवर बालसंगोपन योजना तयार करण्यात आलेली असून ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविली जाते. संगोपित मूल ही संकल्पना दत्तकपूर्व टप्प्यात बऱ्याचदा दिसून येते. जेव्हा एखादे दांपत्य कायदेशीर रीत्या स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने मूल दत्तक घेत असते, तेव्हा कायद्याच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन, पालकांनी कागदपत्रे सादर केल्यावर, मुलाला संगोपनासाठी पालकांच्या ताब्यात देण्याची सोय असते. हेतू हा की, त्या कालावधीत दोघांनाही एकमेकांची ओळख व्हावी व निवड झालेल्या दिवसापासून मुलाला घर मिळावे. कायदेशीर कार्यवाही पूर्ण होऊन त्या मुलाला दत्तक मुलाचे स्थान मिळेपर्यंत त्याला ‘ संगोपित मूल ’ असे संबोधण्यात येते. पालक व मूल ह्यांच्यातील हा प्रथम समायोजनाचा काळ असतो आणि ह्या सेवेतही स्वयंसेवी संस्थांची भूमिका महत्त्वाची असते.[→ दत्तक].
पहा : शिशुकल्याण समाजकल्याण.
संदर्भ : 1. Laird, Joan Hartman, Ann, A Handbook of Child Welfare: Context Knowledge and Practice, New York, 1985.
2. Mehta, Nilima, Ours by Choice, Mumbai, 1993.
3. Zietz, Dorothuy, Child Welfare–Principles and Methods, New York, 1966.
बावीकर, रूमा