शेकरा : एक प्रकारची खार. तिला शेकरी, शेकरू, भीमाशंकरी अशीही इतर नावे आहेत. ती पश्चिम घाटातील घनदाट जंगलांत व पूर्वेला मिदनापूर (बिहार) व कटकपर्यंत आढळते. तिच्या शरीराची डोक्यासह लांबी ३५-४० सेंमी. व शेपटाची लांबी सु. ६० सेंमी. असते. या आकारमानाच्या सर्व भारतीय खारींचा समावेश कृंतक गणाच्या सायूरिडी कुलाच्या रॅट्युफा प्रजातीत होतो. रॅट्युफा इंडिका (इंडियन जायंट स्क्विरल), रॅ. मॅक्रोयुरा (ग्रिझल्ड जायंट स्क्विरल) व रॅ. बायकलर (मलायन जायंट स्क्विरल) या तिन्ही जाती शेकरा या नावाने ओळखल्या जातात. रॅ. इंडिका ही जाती द्वीपकल्पीय भारतात गंगा नदीच्या दक्षिणेकडील पानझडी, मिश्रपानझडी व दमट सदाहरित जंगलांत राहते. रॅ. मॅक्रोयुरा ही जाती दक्षिण भारतातील काही डोंगर रांगांत व श्रीलंकेत आढळते. तिची वरची बाजू व शेपटी करडी किंवा कमीअधिक प्रमाणात करडसर पांढरी झाक असलेली तपकिरीशी करडी असते, हे तिच्यातील सुस्पष्ट लक्षण होय. रॅ. बायकलर ही जाती गंगा नदीच्या उत्तरेस नेपाळ, सिक्कीम, भूतान व आसाम येथे तसेच म्यानमार व मलाया येथे आढळते. तिचे केस गर्द तपकिरी, बहुधा काळे असून शरीराची खालची बाजू पिवळसर तपकिरी असते.
शेकरा बुजरी व सावध असून सहजासहजी दृष्टीस पडत नाही. पुष्कळदा पुनःपुन्हा केलेल्या मोठ्या खडखड अशा आवाजावरून तिचे अस्तित्व ओळखू येते. अनोळखी आवाज ऐकून व दृश्य पाहून या खारी चहूबाजूंना ओरडू लागतात, भुंकतात व धोक्याचा इशारा देतात पण हळू काढलेला चिरचिर आवाज हा आनंद किंवा ओळख पटल्याचा निदर्शक असतो.
पहा : खार.
जमदाडे, ज. वि.