शुंपेटर, योझेफ आलोईस : (८ फेब्रुवारी, १८८३–८जानेवारी, १९५०). मोरेव्हियातील त्रिएश (चेकोस्लोव्हाकिया) येथे जन्मलेला अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण व्हिएन्ना येथे. पुढे बॉन विद्यापीठात सार्वजनिक वित्तव्यवहाराच्या अध्यासनावर त्यांनी प्राध्यापक-संशोधक म्हणून काम केले (१९२५–३२). त्याच वर्षी त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले. १९३२ पासून शेवटपर्यंत ते हार्व्हर्ड (अमेरिका) येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. १९१९ मध्ये सु. सहा महिने ते ऑस्ट्रियामध्ये रेने यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते परंतु भांडवल आयात करण्याच्या मुद्यावर त्यांचे इतर सहकारी – मंत्र्यांशी मतभेद झाल्याने ते बाहेर पडले. बिडरमान बँक या व्हिएन्नातील एका खाजगी बँकेचे ते अल्प काळापुरते अध्यक्ष होते पण ती बँक लवकरच बुडाली. कोणत्याही पारंपारिक संप्रदायात शुंपेटर बसत नाहीत तथापि लूझान संप्रदायाच्या विचारांशी त्यांची जवळीक होती. गणिती तंत्राचा अर्थशास्त्रात वापर करण्यासंबंधी ते अनुकूल होते. त्यांच्या स्वतःच्या लेखनात मात्र गणिती तंत्रांचा संयमित वापर आढळतो.
व्यापारचक्रावरील शुंपेटर यांचे द्विखंडात्मक पुस्तक १९३९ साली प्रसिद्ध झाले. त्यांचे आर्थिक विकासावरील विचार आणि व्यापारचक्रावरील विवेचन यांत अंतर्गत सुसंगती आढळते.
⇨ व्यापारचक्रे ही आर्थिक प्रक्रियेत अटळ आहेत व ती सर्वसाधारण विकासप्रक्रियेचाच अविभाज्य भाग आहेत, ही त्याच्या विवेचनाची सुरुवात आहे. त्यात नवप्रवर्तन हा मुख्य कारक घटक असून त्याबरोबर उत्पादकता, वित्तीय बदल, आर्थिक अभिवृद्धी यांना कसकसे स्थान आहे, ते त्यांनी विशद केले आहे. अर्थव्यवस्थेतील मंदी ही आर्थिक आपत्ती नसून सार्वत्रिक पुनर्रचना करण्याची ती संधी आहे, असे त्यांनी मानले. अल्पमध्यम आणि दीर्घकालीन व्यापारचक्रे कशी असतात, याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी अठराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत ग्रेट ब्रिटन, अमेरिका, जर्मनी या देशांसंबंधी उपलब्ध असलेल्या सांख्यिकीय माहितीचा आधार घेतला. छत्तीस ते चाळीस महिन्यांपर्यंत जे चक्र पूर्ण होते, त्यास त्यांनी ‘किचिन चक्र’ असे नाव दिले. वस्तुसाठ्यातील बदलामुळे असे अल्पकालीन बदल होताना आढळतात. सुमारे दहा ते अकरा वर्षांच्या कालखंडात बदलांचे जे आवर्तन पूर्ण होते, त्याला त्यांनी क्लेमेंट जुगलर यांचे नाव दिले. नवीन यंत्रसामग्री, नवप्रवर्तनात्मक शोध यांमुळे हे मध्यम मुदतीचे चक्र पूर्ण होते. छप्पन्न ते साठ वर्षे मुदतीने आवर्तन पुरे करणाऱ्या चक्रास ‘ कन्ड्राडीएव्ह चक्र’ असे नाव दिले. विजेचा नव्याने वापर, लोहमार्गाची बांधणी यांमुळे हे दीर्घकालीन चक्र पूर्ण होते. नवप्रवर्तन आणि आर्थिक चढउतारांचे परस्परसंबंध दाखवत असताना त्यांनी काही विशिष्ट धोरणांचा पुरस्कार केलेला आढळतो. उदा., कन्ड्राडीएव्ह चक्रातून बाहेर पडण्यासाठी स्वायत्त गुंतवणूक अर्थव्यवस्थेत वाढवत नेली जावी, असे त्यांनी मत मांडले. त्यांच्या 1912 च्या विकासाच्या पुस्तकात हा उल्लेख आढळतो. हीच संकल्पना विस्तारित आणि सुधारित स्वरूपात केन्सच्या लिखाणात पुढे आढळते. बचती, व्याज यांच्या प्रक्रियेबाबतचे जे सिद्धांत पुढे मांडले गेले – केन्स त्यात आघाडीवर होते – त्यांचे मूळ शुंपेटर यांच्या लिखाणात आहे.
विकास आणि चक्रीय बदलांची उत्क्रांती स्पष्ट करताना शोध, नवप्रवर्तन आणि उद्योजकता यांच्यातील परस्परसंबंध त्यांनी स्पष्ट केला. शोध व नवप्रवर्तन यांतील फरक त्यांनी मांडला व त्या मुद्यांवर पुढे अनेक तज्ञांनी त्यावरील चर्चा चालू ठेवली. मक्तेदारी किंवा अगदी मर्यादित स्पर्धा असणाऱ्या बाजारात नवप्रवर्तनास मुबलक वाव मिळत असल्याने त्या प्रकारच्या बाजारांचा त्यांनी पुरस्कार केलेला आढळतो. मक्तेदारी बाजारांचा विकास होत असताना हटकून घडून येणारी आणखी एक घटना म्हणजे सर्जनशील विनाश ही होय. भांडवलशाहीत ही घटना अटळ होय. नवनवीन शोध, त्या शोधांचा व्यापारी तत्त्वावर स्वीकार आणि त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानाची आणि उत्पादनाची पीछेहाट तसेच त्या जागी नव्या उत्पादनाचा पऱ्यायी स्वीकार, या सर्व घटनाक्रमास सर्जनशील विनाश असे नाव देण्यात आले.
करपद्धती व करधोरण यांवर त्यांनी १९१८मध्ये एक पुस्तक लिहिले. पहिल्या महायुद्धानंतरच्या ऑस्ट्रियातील आर्थिक समस्यांचे त्यात विवेचन आहे. आर्थिक धोरणाचा आराखडा कसा असावा, याचा वस्तुपाठच त्या पुस्तकातून जाणवतो. त्या काळात त्यांनी करपद्धती, आर्थिक मंदी, न्यू डील यांवर विपुल लिखाण केले.
कार्ल मार्क्सचा १८८३ मध्ये मृत्यू झाला व त्याच वर्षी केन्स तसेच शुंपेटर यांचा जन्म झाला हा एक अर्थपूर्ण योगायोग म्हणता येईल. भांडवलशाही, समाजवाद व लोकशाही या विषयीच्या पुस्तकात शुंपेटर यांचे भांडवलशाहीच्या वाटचालीबाबतचे मौलिक चिंतन आढळते. उद्योजक, मक्तेदाऱ्या, तांत्रिक सुधारणा, आर्थिक चढउतार हे टप्पे पार करीत भांडवलशाहीची प्रगती सुरूच राहील, असा त्यांचा दावा आहे. परंतु पुढे उद्योजकांच्या स्वतंत्र निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आक्रमणे होतील, नोकरशाहीची पकड वाढल्यावर उद्योजकांची सर्जनशीलता कमी होईल, भांडवलशाहीची वाढ हळूहळू खुंटेल आणि समाजवाद अवतरेल, असे त्यांचे भाकीत होते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील अंतर्गत संरचनात्मक विसंगतीमुळे भांडवलशाही आपोआप लयाला जाईल व समाजवाद येईल, असे मार्क्सचे मत होते.
हिस्टरी ऑफ इकॉनॉमिक ॲनॅलिसिस (१९५४) या मरणोत्तर प्रकाशित बृहदग्रंथात शुंपेटर यांचे महत्त्वाचे योगदान असून त्यात पूर्वसुरींच्या वैचारिक प्रवासाचा आढावा आहे, पण त्यास एका तात्त्विक चिंतनाची बैठक आहे. मात्र या पुस्तकावरही काही बाबतीत टीका झाली. नवसनातनवादी अर्थशास्त्राच्या योगदानास या इतिहासात उचित न्याय दिला नाही, असा आक्षेप घेण्यात आला. तसेच कुर्नो या अर्थतज्ज्ञाचे लेखन व त्याचा प्रभाव रिकार्डोहून सरस आहे, हे त्यांचे मत आणि व्हालरा व मार्शल यांच्या तुलनेत त्यांनी व्हालराच्या बाजूने दिलेले झुकते माप या बाबी टीकास्पद ठरल्या.
टॅकोनिक (कनेक्टिकट–अमेरिका) येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : 1. Frisch, H. Ed. Schumpetarian Economics, New York, 1982.
2. Harris, S. E. Ed. Schumpeter-Social Scientist, Cambridge, 1951.
3. Marz, Eduard, Ed. y3wuoeph Schumpeter-Scholar, Teacher and Politician, New Delhi, 1991.
4.Swedberg, R. Ed. y3wuoeph A. Schumpeter- The Economics and Sociology of Capitalism, London, 1991.
दास्ताने, संतोष