शिशम, विलायती : (हिं. पिपल्यांग, पहाडी शिशम क. मीनादबट्टिमर सं. तोयपिप्पली इं. चायनीज टॅलो ट्री लॅ. सेपियम सेबिफेरम कुल -युफोर्बिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक पानझडी वृक्ष. तो मूळचा चीनमधील असून उत्तर भारतात भिन्न भिन्न उंचींवर त्याचे देशीयभवन झाले आहे व इतरत्र बागांमध्ये तो लावलेला आढळतो. याची उंची सु. १८ मी. व घेर २·५ मी. असून खोडावर उभ्या, उथळ भेगा असतात. याची पाने साधी, चौकोनी, लांब देठाची, एका आड एक व तळाशी ह्रदयाकृती असतात. जून पाने लाल शेंदरी असतात, त्यामुळे हा वृक्ष शोभिवंत दिसतो. फुले एकलिंगी, हिरवट पिवळी आणि लोंबत्या व एकेकट्या मंजिऱ्यांवर फांद्याच्या टोकाला येतात. मंजिरीवर खालच्या भागात थोडी स्त्री-पुष्पे व वरच्या भागात अनेक नर-पुष्पे येतात. त्यांना पाकळ्या नसतात. बोंड फळ काहीसे गोल, मांसल, निळसर-हिरवट, १·०–१·३ सेंमी. व्यासाचे असते. फळात मांसल व पांढरट आवरणाच्या, सपुष्क (पोषक प्रथिनयुक्त), लांबट तीन बिया असतात. या वृक्षाची इतर समान्य शारीरिक लक्षणे ⇨यूफोर्बिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
शिशमाच्या वृक्षाला भरपूर पाऊस मानवतो. तो हिमतुषार सहन करतो. त्यांची लागवड नद्या व ओघळी यांच्या काठाने करतात. लागवडीसाठी बिया, छाट कलमे व मुनवे (तळापासूनचे प्ररोह) वापरतात. जनावरे याचा पाला खात नाहीत, त्यामुळे चराऊ रानात तो टिकून राहतो. वाढ जलद होत असून वर्षाला त्याचा घेर २·५-५·६ सेंमी. पर्यंत वाढतो.
फळातून दोन प्रकारची मेदे (स्निग्ध पदार्थ) मिळतात (१) चायनीज व्हेजिटेबल टॅलो बीजोपांगापासून मिळतो व (२) स्टिलिंजिया तेल बियांतील गरापासून मिळते. पूर्ण वाढलेल्या वृक्षापासून वर्षाला २५-३० किग्रॅ. फळे मिळतात. हिमाचल प्रदेश भागातील बियांत ३०·७५% गर असतो. बियांत १९·३% टॅलो, १२·५% तंतू व ३७·४५% भुस्कट असते. चिनी टॅलोत ५५–७८% मेण असते ते वाफेच्या साहाय्याने काढतात. बियांपासून काढलेल्या घाण्याच्या तेलात मेद मिसळलेले अस्ते. व्यापारी मेणात तेलाची भेसळ असल्याने त्याचा वितळबिंदू कमी असतो. चिनी मेणाचा उपयोग मेणबत्त्या, सौंदर्यप्रसाधने, साबण व कापडावर चकाकी आणणारा लेप देण्यासाठी करतात. जळताना मेणबत्त्यांच्या ज्योतीला धूर व वास येत नाही. हे मेण कोकोच्या बियांयील पांढरट मेदाप्रमाणे असते. शुद्धीकरणानंतर ते खाण्यास योग्य असते. मऊ खाद्य मेदांना घट्टपणा आणण्यासाठी प्राण्यांच्या चरबीऐवजी हे मेण वापरतात. चीनमधून याचे घट्ट गोळे निर्यात होतात.
बियांतील गरात स्टिलिंजिया तेल ५३–६४% असते. ते सुकणारे असून जवसाच्या तेलापेक्षा सरस असते. त्याचा उपयोग वंगणे, मेणबत्त्या व साबण यांत करतात. ते दिव्यातही वापरतात. ते वांतिकारक, रेचक, जलरेचक व जखमा बऱ्याकरणारे आहे. जंगली अक्रोडाच्या टुंग तेलात त्याची भेसळ करतात. पेंडीचा उपयोग खत व जनावरांच्या खुराकासाठी करतात. योग्य प्रक्रियांनंतर त्यातील प्रथिनांचे प्रमाण ७५% होते, त्यामुळे माणसांनाही खाण्यास योग्य होते.
मुळाच्या सालीचा काढा भूक कमी होण्यावर देतात. सालीतील राळ रेचक असते. त्याची लाकूड पांढरे, हलके व कठीण असून त्याचा उपयोग खेळणी, सजावटीसामान, पेन्सिली, क्रिकेट बॅट इत्यादींसाठी करतात. पानांपासून काळा रंग मिळतो. आसाममध्ये एरी जातीच्या रेशमाचे किडे याच्या पानांवर पोसतात. वृक्षाचा रस जहाल असून कातडीवर फोड येतात.
टॅलो ट्री (बटर ट्री, लॅंपेंटॅडेस्मा ब्युटिरॅसिया कुल-गटिफेरी) या विलायती शिशमाशी संबंध नसलेल्या वृक्षाच्या बियांपासून मेणयुक्त रस मिळतो व त्या रसापासून खाद्य अबाष्पनशील वसायुक्त तेल (स्थिर तेल) मिळते.
पटवर्धन, शां. द.