शिवसागर : सिबसागर. भारताच्या आसाम राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २७,४२६ (१९७१). जोरहाटपासून ईशान्येस ५० किमी. अंतरावर, ब्रह्मपुत्रा नदीच्या दिखो या उपनदीच्या उजव्या काठावर हे वसले आहे. तेराव्या शतकात आहोम लोक या भागात आले. अठराव्या शतकात आहोम राज्याची शिवसागर ही राजधानी होती. त्यावेळी हे नगर रंगपूर या नावाने ओळखले जाई. आहोम राजा सिबसिंग याने १७२२ मध्ये येथे एक तलाव बांधला. त्यावरून या ठिकाणाला शिवसागर हे नाव पडले. लोहमार्गावरील तसेच राष्ट्रीय महामार्गावरील हे एक स्थानक असून प्रमुख चहा-प्रक्रिया केंद्र आहे. एक तेलबंदर म्हणूनही त्याला महत्त्व आहे. अठराव्या शतकापासूनची अनेक मंदिरे येथे आढळतात. शिवसागर तलावाच्या काठी तीन मंदिरे आहेत. येथे एक बाप्टिस्ट चर्चही आहे.
चौधरी, वसंत