शिंगाळा : मार्जारमीन नामक सागरी माशाचा एक प्रकार. सायप्रिनिफॉर्मीस गणाच्या टॅचिसुरिडी कुलातील ऑस्टिओजिनीओसस, टॅचिसुरस, नेटुमा, हेक्झनेटिक्थीस, स्यूडॅरियस या प्रजातींतील विविध जाती, तसेच वरील गणाच्या सिल्युरॉयडी उपगणाच्या बॅग्रिडी कुलातील मिस्टस प्रजातीतील जाती शिंगाळा या नावाने ओळखल्या जातात. टॅचिसुरिडी कुलातील जाती सागरी मार्जारमीन म्हणून परिचित आहेत. हे मासे खवलेरहित असून त्यांना २–६ मिशा असतात. नाकपुड्या एका झडपेने विभागलेल्या असतात. त्यांचे मांसल पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) व गुदपक्ष (गुदद्वाराजवळील पर) आखूड असतात.
टॅचिसुरस डुसुमेरी ही जाती मलबार भागातील एक नमुनेदार जात आहे. तिचे शरीर धडधाकट असून मुस्कट रुंद असते. पाठीकडील रंग निळसर व खालची बाजू फिकट रंगाची असते. डोक्याची तकटे पुढे रुंद असतात. डोळे खालच्या कडेला असतात व पर काळे असतात. हा मासा त्या भागात खातात व मोठ्या प्रमाणावर तो खारविला व सुकविला जातो. टॅ. जेली, टॅ. मॅक्युलॅटस, टॅ. सोना व टॅ. थॅलासिनस या जातीही त्या त्या भागात परिचित आहेत.
बॅग्रिडी कुलातील माशाचा मांसल पृष्ठपक्ष उत्तम विकास पावलेला असतो व गुदपक्ष आखूड असतो. टाळू तसेच जबड्यावरही दात असतात. या कुलातील मिस्टस सिंघाला ही जाती भारतातील सर्वच प्रमुख नद्यांत आढळते. तसेच ती मेत्तुर धरणाच्या जलाशयातही आढळते. शरीर वरून तपकिरी व बाजू रुपेरी असतात. मांसल पराच्या बुडाच्या मागच्या टोकावर काळा गोला ठिपका असतो. हे मासे लहान कार्प मासे, इतर मासे व कोळंब्यांवर उपजीविका करतात. याची लांबी ४६ सेंमी. झाली म्हणजे तो प्रजोत्पादनक्षम होतो. तमिळनाडू भागात एप्रिल-जून महिन्यात त्याची वीण होते.तो आपले घरटे गर्द रंगाच्या वाळूयुक्त गाळात ४६ सेंमी. खोलीवर तयार करतो. पुढे आलेल्या खडकांचे संरक्षण बहुधा घरटयाला असते. नर अंडी उबवितो व पिलांची काळजी घेतो. दर खेपेला सु. शंभर पिले जन्मतात. मेत्तूर भागात त्याची लांबी ११७ सेँमी. पर्यंत व वजन ११ किग्रॅ. पर्यंत होते.
मि. सिंघाला या जातीच्या जोडीने महाराष्ट्रात मि. एओर ही जाती आढळते. त्यांच्यात काटे कमी असतात.
मि. विटाटुस ही जाती भारतात सर्वत्र व तमिळनाडूत मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याची लांबी सु. १ मी. पर्यंत असते. मि. कॅव्हॅसियस वा कातिर्ना ही जाती सर्व भारतभर व श्रीलंकेत आढळते. त्याची लांबी सु. अर्धा मीटर असते. ते खाद्य म्हणून लोकप्रिय आहेत.
पहा : मार्जारमीन.
जमदाडे, ज. वि. पाटील, चंद्रकांत