शॉक्ली, विल्यम ब्रॅडफोर्ड : (१३ फेब्रुवारी १९१० – १२ ऑगस्ट १९८९). अमेरिकन भौतिकीविज्ञ. ट्रॅंझिस्टर प्रयुक्तीच्या विकासाबद्दल त्यांना ⇨जॉन बारडीन व ⇨वॉल्टर हौझर ब्रॅटन यांच्यासमवेत १९५६ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले. ट्रॅंझिस्टर प्रयुक्तीने अवजड आणि कमी कार्यक्षम असलेल्या निर्वात नलिकांची जागा मोठ्या प्रमाणात घेतली आणि त्यामुळे अतिलघुरूप इलेक्ट्रॉनिकीस सुरुवात झाली व विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत यास महत्त्व प्राप्त झाले. [⟶ ट्रॅंझिस्टर तंत्रविद्या].

शॉक्ली यांचा जन्म लंडन येथे झाला. तेथून तीन वर्षांनी त्यांचे कुटुंब अमेरिकेला परत गेले. १९३२ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची बी. एस्. पदवी मिळविली. पुढे त्यांनी मॅसॅचूसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अध्ययन केले. १९३६ मध्ये ‘सोडियम क्लोराइडाची ऊर्जापट्ट संरचना’ या विषयावरील प्रबंधामुळे त्यांना पीएच्. डी. पदवी मिळाली. बेल टेलिफोन लॅबोरेटरीज या संस्थेत ते ट्रॅंझिस्टर भौतिकी विभागाचे प्रमुख होते (१९३६ – १९५५). दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी यू. एस्. नाविक दलाच्या अँटिसबमरिन वॉरफेअर ऑपरेशन्स रिसर्च ग्रुपचे संशोधन संचालक, नंतर प्रिन्स्टन विद्यापीठ  व कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॅसाडीना) येथे अभ्यागत अधिव्याख्याते, संरक्षण खात्याच्या वेपन्स सिस्टिम्स इव्हॅल्यूएशन ग्रुपचे उपसंचालक व संशोधन संचालक, मौंटन व्ह्यू (कॅलिफोर्निया) येथील बेकमन इन्स्ट्रुमेंट्‌स इन्कॉर्पोरेशनच्या शॉक्ली सेमीकंडक्टर लॅबोरेटरीचे संचालक व विविध विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून मोलाचे कार्य केले.

शॉक्ली, बारडीन आणि ब्रॅटन यांनी १९४६ मध्ये बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये अर्धसंवाहकांसंबंधी मूलभूत संशोधन कार्यक्रम हाती घेतला. त्यांनी विशेषतः इलेक्ट्रॉनीय विवर्धनाकरिता अर्धसंवाहक प्रयुक्तीचा विकास करण्यास सुरुवात केली. बिंदु-स्पर्श ट्रॅंझिस्टराचा विकास करीत असतानाच शॉक्ली यांनी अर्धसंवाहक पदार्थापासून बनलेल्या p-n द्विप्रस्थांमध्ये विद्युत्‌प्रवाह एकाच दिशेने वाहतो हे सिद्ध करून दाखविले व त्याचा उपयोग p-n एकदिशकारक बनविण्यासाठी केला. त्यांनी p-n एकदिशकारकांची मागील बाजू एकमेकांस जोडून संधि-ट्रॅंझिस्टर तयार केला.

शॉक्ली यांनी घनद्रव्याचे ऊर्जापट्ट, निर्वात नलिकेचा सिद्धांत, तांब्याचे स्व-विसरण, सिल्व्हर क्लोराइडामधील प्रकाश – इलेक्ट्रॉनांसंबंधीचे प्रयोग या विषयांवरही संशोधन कार्य केले.

प्रमाणीकृत बुद्धिमत्ता चाचणीवरून बुद्धिमान वंशामध्ये आनुवंशिक घटक आढळून येतो आणि बुद्धिगुणांक चाचणीवरून कृष्णवर्णीय हे बौद्धिक गुणवत्तेत श्वेतवर्णीयांपेक्षा कमी दर्जाचे आहेत,  असे शॉक्ली यांचे मत होते. या मतामुळे ते १९६० च्या अखेरीस वादग्रस्त व्यक्ती ठरले.

त्यांचा इलेक्ट्रॉन्स अँड होल्स इन सेमीकंडक्टर्स (१९५०) हा ग्रंथ प्रसिद्ध असून इम्पर्फेक्शन ऑफ निअर्ली पर्फेक्ट क्रिस्टल्स (१९५२) या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. त्यांनी पन्नासपेक्षा अधिक शोधांची एकस्वे घेतली.

ते पॅलो ॲल्टो (कॅलिफोर्निया) येथे मरण पावले.

सूर्यवंशी, वि. ल.