शास्त्रीय व्यवस्थापन : शास्त्रीय तत्त्वांचा उपयोग करून उद्योगसंस्थांचे व्यवस्थापन करण्याची पद्धती. हिचा पुरस्कार प्रथम विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिकेत ⇨फ्रेडरिक विन्झ्लो टेलर (१८५६–१९१५) या उत्पादनतंत्र विशारदाने केला. पोलादाचे उत्पादन करणाऱ्या उद्योगसंस्थांतील आपल्या अनुभवाच्या आधारावर केवळ कारखान्यातील उत्पादनाचे प्रमाण वाढविण्यासाठीच नव्हे, तर व्यापकदृष्ट्या सर्वत्र औद्योगिक कार्यक्षमता वाढावी, म्हणून उद्योगसंस्थांचे व्यवस्थापन शास्त्रीय तत्त्वांच्या आधारे करणे आवश्यक आहे, असे टेलरने प्रतिपादिले. त्याने व त्याच्या शिष्यांनी या प्रतिपादनाचा अमेरिकेत व इतरत्रही हिरिरीने प्रचार केला.
शास्त्रीय व्यवस्थापनाच्या यंत्रणेत टेलरने पुढील मुद्यांवर विशेष भर दिला : (१) यंत्रावर काम करणाऱ्या कामगारास आपले काम केवळ ढोबळ अनुमानांच्या साहाय्याने करू न देता त्याच्या कामाचे शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करून त्यासाठी पर्याप्त कार्यपद्धती शोधून काढली पाहिजे. (२) प्रत्येक कामगाराला या शास्त्रीय कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देऊन नंतरच यंत्रावर काम करण्याची संधी दिली जावी. (३) कामगार व व्यवस्थापक यांच्यामध्ये योग्य श्रमविभागणी झाली पाहिजे. व्यवस्थापकांनी कामाचे संशोधन करून कार्यपद्धती निश्चित करावी व कामाचे नियोजन करावे आणि कामगारांनी त्या निश्चित कार्यपद्धतीनुसारच नियोजन उत्पादन करावे. ही तीन तत्त्वे केवळ शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीलाच नव्हे, तर अन्य व्यवस्थापन पद्धतींसाठीदेखील उपयोगी पडतील, असा टेलरचा विश्वास होता. या तत्त्वांचे कारखान्यात प्रत्यक्ष उपयोजन करताना शास्त्रीय व्यवस्थापनाने आणखीही काही तंत्रांचा वापर सुचविला. एकतर कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी एखाद्या उत्कृष्ट कामगारास कामाची विविध अंगे पार पाडण्यासाठी किती वेळ लागतो, याची मोजणी करावयाची व त्यावरून कालनिश्चिती करावयाची. यालाच ‘कालमापन पद्धती’ म्हणतात. तसेच कामगाराच्या हालचालींचे शास्त्रीयदृष्ट्या निरीक्षण करून त्याच्या अनावश्यक हालचाली कमी करून व इतर हालचालींचा कार्यक्षम समन्वय साधून प्रत्येक कामासाठी पर्याप्त हालचालींचा अनुक्रम ठरविणारी क्रियामापनपद्धती वापरावयाची आणि त्यावरून प्रत्येक कामाची पर्याप्त कार्यपद्धती निश्चित करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाने पार पाडावी. नंतर या कार्यपद्धतीचे प्रशिक्षण सर्व संबंधित कामगारांना देऊन त्यांची कार्यक्षमता व त्यांचे उत्पादन वाढविण्यास व्यवस्थापनाने मदत करावी, असा टेलरचा आग्रह असे. तसेच कामगारांचे वेतन ठरविताना प्रोत्साहन पद्धतींचा उपयोग आवश्यक आहे, असा शास्त्रीय व्यवस्थापनाचा दृष्टिकोन होता. टेलरने सुचविलेले आणखी एक तंत्र म्हणेज ‘कार्यगणिक पर्यवेक्षण’ हे होय. एकाच पर्यवेक्षकावर कामगारांच्या सर्वच विविध कार्यांच्या बाबतीत देखरेख करण्याची जबाबदारी टाकणे चुकीचे आहे, असे टेलरचे मत होते. म्हणून पर्यवेक्षणाला विशेषीकरणाचे तत्त्व लावून प्रत्येक कार्यासाठी वेगवेगळा पर्यवेक्षक कारखान्यात नेमणे, त्याच्या दृष्टीने आवश्यक होते. अशा आठ विशेषज्ञ पर्यवेक्षकांची पर्यवेक्षणयंत्रणा त्याने सुचविली होती व तिचा अवलंब करूनच उद्योगसंस्थांना कारखान्यांची कार्यक्षमता पर्याप्त पातळीवर नेता येईल, असे त्याचे म्हणणे होते. या यंत्रणेनुसार एकाच कामगाराला आठ निरनिराळ्या पर्यवेक्षकांच्या हुकमतीखाली काम करावे लागल्याने उद्भवणाऱ्या अडचणी दुरापास्त ठरल्या व म्हणून या विशिष्ट पर्यवेक्षणपद्धतीचा फारसा प्रसार झाला नाही.
व्यवस्थापकाने कारखान्यातील वातावरण उत्कृष्ट ठेवल्यास, कामगारांना कार्यपद्धतीचे योग्य प्रशिक्षण दिल्यास व प्रोत्साहनयुक्त वेतनपद्धतीचा अवलंब केल्यास तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कामगारांकडून दिवसागणिक योग्य उत्पादन मिळू शकेल. असा टेलरचा विश्वास होता. साहजिकच कामाची टाळाटाळ करण्याच्या कामगारप्रवृत्तीची त्याला मनस्वी चीड असे. सर्वच बाबी शास्त्रीय तत्त्वांनुसार निश्चित करणे शक्य असल्यामुळे कामगार संघटनांना सांघिक सौद्याच्या धोरणाचा अवलंब करण्याची गरजच उरत नाही, असे त्यास वाटत असे. शास्त्रीय व्यवस्थापन उत्पादनकेंद्रित असल्याने उत्पादनात भर पडून कामगारांचे वेतन वाढेल व मालकांच्या नफ्यातही भर पडेल अशा रीतीने कामगारांचे हित तेच मालकांचेही हित असल्यामुळे शास्त्रीय व्यवस्थापनाने कामगार-मालक संघर्षाचे कारणच समूळ नष्ट होते, अशी टेलरची विचारसरणी होती. आपल्या दुराग्रही स्वभावामुळे इतरांशी तडजोड करण्यास तो कधीच तयार नसे, म्हणून त्याच्या आयुष्यभरात शास्त्रीय व्यवस्थापनाचा स्वीकार करण्यास कामगार व मालक या दोन्ही पक्षांनी विशेष उत्साह दाखविला नाही. कामगारांना आपला सांघिक सौद्याचा हक्क गमाविणे मान्य होण्यासारखे नव्हते व मालकांनाही सर्वच व्यवस्थापन जर शास्त्रीय तत्त्वांवर चालले, तर आपल्या व्यवस्थापकीय निर्णयहक्कास व सत्तेस बाधा येईल अशी भीती वाटे.
टेलरनंतर फ्रॅंक गिलब्रेथ (१८६८–१९२४), ग्रॅंट यांसारख्या त्याच्या शिष्यवरांनी शास्त्रीय व्यवस्थापनाचा पुरस्कार चालू ठेवला परंतु त्यांनी टेलरप्रमाणे त्यामध्ये कोणतीही तडजोड शक्य नाही असा दुराग्रह धरला नाही. ⇨ व्यवस्थापनशास्त्राचा व्यापक विकास होण्यासाठी शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीत व्यावहारिकदृष्ट्या जरूर तेथे मुरड घालण्यास हरकत नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला. कामगारांचा सांघिक सौद्याचा हक्क त्यांना मान्य असल्यामुळे शास्त्रीय व्यवस्थापनाला असलेला कामगारांचा विरोध बोथट झाला आणि हळूहळू ही व्यवस्थापनपद्धती अमेरिकन व इतर उद्योगसंस्थांमधून वापरली जाऊ लागली.
व्यवस्थापनशास्त्राच्या टेलरच्या पश्चात् झालेल्या प्रगल्भ विकासाच्या संदर्भात त्याने सुचविलेल्या पद्धतीवर टीका करणे व तिचे दोष दाखविणे सोपे झाले आहे. अत्यंत कार्यक्षम कामगारांनाच टेलरच्या पद्धतीत वाव होता इतरांना थारा देण्यास तो तयार नसे. कामगार संघटनांची शास्त्रीय व्यवस्थापनास गरजच उरत नाही, असे तो मानी. व्यवस्थापकाने शास्त्रीय तत्त्वांचा अवलंब करून उत्पादन वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी उत्पादनपद्धती वारंवार बदलावी लागली व कामगारांवर कडक देखरेख ठेवावी लागली, तरी हरकत नाही, असा त्याचा दृष्टिकोन होता. या विशिष्ट दृष्टिकोनामुळे त्याच्या पद्धतीत अनुरूप अशा व्यवस्थापकीय शैलीमध्ये व्यवस्थापकांचे सर्व लक्ष कामगारांच्या कार्यक्षमतेवरच केंद्रित झाले पाहिजे, त्यांच्या सामाजिक व इतर गरजा आणि आकांक्षा यांची कदर बाळगण्याची गरज नाही, असे टेलर गृहीत धरत असे. केवळ आर्थिक प्रोत्साहनामुळे कामगार पर्याप्त उत्पादनास उद्युक्त होतील, अशी त्याची समजूत होती. परंतु कार्यक्षम उत्पादनामुळे जीवनमान सुधारले म्हणजे कामगारांना वेतनाचे महत्त्व कमी वाटून त्यांच्या इतर सामाजिक गरजा व आकांक्षा यांची कदर बाळगण्याची गरज नाही, असे टेलर गृहीत धरत असे. केवळ आर्थिक प्रोत्साहनामुळे कामगार पर्याप्त उत्पादनास उद्युक्त होतील, अशी त्याची समजूत होती. परंतु कार्यक्षम उत्पादनामुळे जीवनमान सुधारले म्हणजे कामगारांना वेतनाचे महत्त्व कमी वाटून त्यांच्या इतर सामाजिक गरजा व आकांक्षा ही अधिक महत्त्वाची प्रोत्साहने बनतात, याकडे टेलरचे दुर्लक्ष झाले. त्याने केवळ कारखान्यातील उत्पादन कसे वाढवावे. याचीच चिकित्सा केली असल्याने त्याच्या व्यवस्थापनपद्धतीत व्यवस्थापनाच्या इतर महत्त्वाच्या प्रश्नांचा उल्लेख आढळत नाही. यांसारख्या अनेक वैगुण्यांमुळे त्याच्या पद्धतीचा मूळ स्वरूपात तंतोतंत स्वीकार झाला नाही. तथापि कार्यमापनपद्धती, उत्पादन नियोजन व नियंत्रण आणि कामगार-कार्यक्षमता-शास्त्र या क्षेत्रांतील विकासास शास्त्रीय व्यवस्थापनपद्धतीतील कल्पनांनी बराच हातभार लावला आहे.
पहा : औद्योगिक व्यवस्थापन, भारतातील व्यवसाय प्रशासन व्यवसाय व्यवस्थापन.
संदर्भ : 1. Taylor, F. W. The Principles of Scientific Management, New York, 1947.
2. Tillett, A. Kernpuer, T. Wills, G. Management Thinker, England, 1970.
धोंगडे, ए. रा.