शारीरिक शिक्षण : मुलामुलींच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षक. हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचे प्रमुख माध्यम आहे. असे असले, तरी शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही तर शरीराबरेबरच मन, भावना, विचार इत्यादींवर होणारे संस्कारसुद्धा त्यात अंतर्भूत आहेत.
विविध शारीरिक हालचालींद्वारे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवाचे संघटित ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण, अशी व्याख्या डी. ओबर्ट्युफर यांनी केली आहे. शारीरिक शिक्षण हा एका मोठ्या समग्र अशा विषयाचा एक भाग असून त्याचा संबंध महत्त्वाच्या स्नायूंच्या हालचालींशी आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या क्रियांशी आहे. अशी व्याख्या डॉ. जे. बी. नॅश यांनी केली आहे. ‘महत्त्वाच्या स्नायु-हालचालींमधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवाद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्यापर्यंतची वाढ व विकास साधणाऱ्या प्रक्रिया -समुच्चयास शारीरिक शिक्षण असे म्हणतात’, अशी कल्पना ब्राउनेल यांनी मांडलेली आहे. ‘शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे, म्हणजे शारीरिक शिक्षण होय’, अशी व्याख्या भारताच्या केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाने केलेली आहे.
शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे : शारीरिक शिक्षण व मनोरंजनाच्या आराखड्यामध्ये शारीरिक शिक्षणाची पुढील उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत :
(१) कार्यक्षमतेचा विकास : इंद्रियविकास आणि शरीराची सुदृढता यांवर शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते. इंद्रियांचा विकास कृतिपूर्ण परिश्रमातून होतो आणि त्यासाठी लहानपणापासून होणाऱ्या हालचाली कारणीभूत ठरतात. इंद्रियांना पोषक ठरणाऱ्या व त्यांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या हालचाली शिकवणे, हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट.
(२) मज्जासंस्था व स्नायुसंस्था यांतील सहकार्यात्मक विकास : शारीरिक क्रियांचे कौशल्य वाढवणे, हे शारीरिक शिक्षणाचे दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. लहान मुलांच्या सर्व नैसर्गिक हालचाली प्रयत्नाने आणि सरावाने हळुहळू सफाईदार होत जातात. चालणे, धावणे, उड्या मारणे, फेकणे, झेलणे, शरीराचा तोल सांभाळणे या मूलभूत क्रिया सहजपणे व कौशल्यपूर्ण होणे आवश्यक असते. लहान वयातच मुलांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांच्या स्नायू व मज्जासंस्था यांतील सहसंबंध सुधारून वरील मूलभूत क्रिया कौशल्यपूर्ण होऊ शकतात.
(३) व्यक्तिमत्त्वाचा विकास : व्यक्तीचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास साधून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास करणे. हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्तीचा बांधा, शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्तीचा बांधा, शारीरिक ठेवण, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कर्तृत्व आणि कला-गुण यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. यांतील अनेक घटकांचा विकास शारीरिक शिक्षणाने साधला जातो. त्यांतील काही प्रमुख उपघटक पुढीलप्रमाणे :
शारीरिक आरोग्यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता, व्यायाम, आहार, आरोग्यविषयक सवयी, विश्रांती, मनोरंजन इत्यादींचा समावेश होतो. ह्या सर्व गोष्टी शारीरिक शिक्षणांतर्गत समाविष्ट होतात. मानवी मनावरदेखील शारीरिक शिक्षणाचे योग्य संस्कार होतात. शारीरिक शिक्षणातील योगाभ्यासाद्वारे मानसिक स्वास्थ्याची प्राप्ती होते. व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य समाजाशी निगडित आहे. म्हणूनच शारीरिक शिक्षणाद्वारे शारीरिक, मानसिक, सामाजिक सुस्थिती साधणे, हे एक उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
शारीरिक शिक्षणामुळे निर्णयशक्तीचा विकासही साधला जातो. शारीरिक शिणातील विविध क्रीडांमध्ये अनेक वेळा तत्काळ निर्णय घेण्याचे प्रसंग येतात. उदा., कबड्डीमध्ये घोटापकड केव्हा करावी, चढाई वा बचाव केव्हा करावा, या संदर्भात तत्क्षणी चटकन व योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होऊ शकते.
भावनांवर नियंत्रण ठेवून त्यांना आवर घालणे, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह असते. शारीरिक शिक्षणामधील विविध स्पर्धांमधून जयपराजयामुळे व्यक्ती आनंद किंवा दु:ख या भावनांचा अनुभव घेते. सुरुवातीस जरी त्या अधिक जोरदार स्वरूपात व्यक्त झाल्या, तरी हळूहळू खेळाडूंमध्ये त्यांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता प्राप्त होते. संघ किंवा देशासाठी खेळत असताना त्यातून संघनिष्ठा, समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा इ. भावना वाढीस लागतात. भावनांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती समाजात योग्य समायोजन साधून आनंदी जीवन जगण्यास लायक बनते.
आत्मविश्वास, सदाचार, धैर्य, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, दया, न्याय, तत्परता, निष्ठा इ. वैयक्तिक गुणांचा विकास शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून होतो. तसेच सहकार्य, बंधुभाव, आदरभाव, सहानुभूती, परोपकारबुद्धी, संघभावना, निष्ठा, खिलाडूवृत्ती, नेतृत्व, आज्ञाधारकपणा, सेवावृत्ती, सत्यप्रियता, शिस्त इ. सामाजिक गुणांच्या विकासाचे धडे ह्या माध्यमातून व्यक्तीस मिळतात.
शारीरिक शिक्षणातील अनेक क्रीडाविषयक बाबी सदाचाराचे तसेच नैतिक मूल्यांचे शिक्षण देतात. क्रीडांगणे ही बालकास सदाचारास प्रवृत्त करून चारित्र्य-घडणीचे काम करतात.
(४) मनोरंजन : व्यक्तीला आनंद, समाधान व स्वास्थ प्राप्त करून देणारी क्रिया म्हणजे मनोरंजन होय. म्हणूनच मनोरंजन हा शारीरिक शिक्षणाचा अविभाज्य भाग होय.
वरील सर्व उद्दिष्टांबरोबरच व्यावसायिक कार्यक्षमतेचा विकास, सहजप्रवृत्तींचा विकास व उदात्तीकरण, व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाचा विकास हीदेखील शारीरिक शिक्षणाची इतर महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम : प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण व आरोग्य ह्या विषयांतर्गत अनौपचारिक अनुकरणात्मक हालचाली, कृतियुक्त गाणी, गोष्टी नाट्यीकरण, मनोरंजनात्मक खेळ, कसरतीचे व्यायाम इत्यादी उपक्रमांवर विशेष भर देण्यात येतो. प्राथस्तरामधील विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या शरीरावर व विविध अवयवांवर योग्य तो ताबा मिळवून कौशल्य संपादन करण्याच्या दृष्टीने धावणे, फेकणे, उड्या मारणे, साध्या कसरती यांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केलेला आहे. तसेच देशी खेळांबरोबरच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारख्या विदेशी खेळांचा परिचय व्हावा या उद्देशाने या खेळांना स्थान दिलेले आहे. आरोग्यशिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे बालकांना आरोग्यविषयक मूल्यांची सर्वसाधारण कल्पना देऊन आरोग्यविषयक सवयी व कृती अंगी बाणवण्याची सवय वाढीस लावणे व त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे हे आहे. शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी एकूण वेळेच्या १/१० भारांश देण्यात आलेला आहे. शिक्षणशास्त्र पदविकाप्राप्त व खेळातील प्रावीण्य संपादन केलेले शिक्षक हा विषय शिकविण्यास पात्र असतात.
उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात विकासात्मक व्यायामप्रकार, मैदानी उपक्रम, मोठे खेळ, तालबद्ध हालचाली, योगासने, कवायत, द्वंद्वात्मक व्यायामप्रकार यांचा समावेश केलेला आहे. देशी खेळांबरोबरच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे विदेशी खेळ, तसेच बीम वर्क, व्हॉल्टींग हॉर्स, जांबिया, लाठी, धनुर्विद्या व जूदो यांचा समावेश इयत्ता ७ वी व ८ वी साठी केला आहे. आरोग्यशिक्षणाचाही त्यात समावेश आहे. एकूण वेळेच्या १/१० भारांश शारीरिक शिक्षण व आरोग्यशिक्षण या विषयांसाठी देण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्यासाठी प्रत्येक वर्गास चार तासांचे नियोजन करावे लागते.
माध्यमिक स्तरावरील इयत्ता ९ वी व १० वी मधील मुलामुलींची उंची झपाट्याने वाढत असते. तसेच समाजमान्यता प्राप्त करणे, नायकत्व करणे, सहकार्याच्या अवधानाचे केंद्र बनणे, अशा प्रवृत्ती त्यांच्यात दिसू लागतात. काहीतरी धाडसी कृत्य करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यासाठी शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये दंड, बैठका, पुलअप्स, मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॅंडबॉल, हॉकी, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, टेबल-टेनिस, पोहणे, व्यायामी खेळ, मल्लखांब, योगासने, कुस्ती किंवा जूदो ई. प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूण वेळेच्या १/१० भारांश शारीरिक शिक्षण व आरोग्यशिक्षण या विषयांसाठी देण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्यासाठी प्रत्येक वर्गास चार तासांचे नियोजन करणे आवश्यक असते.
आरोग्य आणि शारीरिक शिक्षणाची परीक्षा ही अंतर्गत असून ती संबंधित शाळांनी घ्यावयाची असते. या विषयात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली श्रेणी शाळांनी विभागीय मंडळांस कळवावी लागते. उच्च माध्यमिक स्तरावर (इयत्ता ११ वी व १२ वी) शारीरिक शिक्षण या विषयास आठवड्यातून दोन तासिकांचे नियोजन आहे. इयत्ता ११ वीसाठी ५० गुणांचा हा विषय अनिवार्य आहे परंतु इयत्ता १२ वीसाठी तो अनिवार्य नाही. महाविद्यालयीन स्तरावर मात्र केवळ शिवाजी विद्यापीठात प्रथम वर्षासाठी १० गुणांची अनिवार्य परीक्षा घेतली जाते. एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास हे १० गुण ग्रेस गुण म्हणून देऊन त्याला उत्तीर्ण केले जाते. हा अपवाद वगळता केवळ विभागीय, आंतरविभागीय, विद्यापीठीय स्पर्धांपुरतेच ह्या विषयाला स्थान आहे.
शारीरिक शिक्षणाच्या परंपरेची रूपरेखा : राष्ट्रीय स्तरावरील शारीरिक शिक्षणाचा विचार करता त्याचे वैदिक काल व पौराणिक कालखंड (इ.स. पू. २००० ते ६००), मध्युगीन व ऐतिहासिक कालखंड (इ.स.पू. ६०० ते इ.स.१७५०), ब्रिटिश कंपनी सरकार व अव्वल इंग्रजी कालखंड (१७५० ते १९४७) व स्वातंत्र्योत्तर कालखंड (१९४७ नंतर) असे भाग पडतील. वैदिक कालामध्ये स्वसंरक्षण व स्वजातिसंरक्षण यांकरिता सामर्थ्य वाढवण्यासाठी शारीरिक शिक्षणामध्ये युद्धोपयोगी शिक्षण व हालचाली उदा.,धनुर्विद्या, घोडदौड, रथ चालवणे इ. गोष्टींचा समावेश असे. त्याचबरोबर सूर्यनमस्कार, योगविद्या, ⇨ प्राणायाम यांचाही मानसिक तयारी करण्यासाठी समावेश होतो. मध्युगीन काळात लढाऊवृत्ती टिकवण्यासाठी कुस्ती, ⇨ मुष्टियुद्ध, ⇨अश्वारोहण, भालाफेक, तिरंदाजी इ. बाबींचा समावेश शारीरिक शिक्षणात होता. तसेच शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी प्राणायाम, सूर्यनमस्कार, वनविहार इ. व्यायामप्रकार केले जात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेसाठी शारीरिक व्यायाम हा एक अविभाज्य घटक होता. घोडदौड, नेमबाजी, धनुर्विद्या, कुस्ती, शिकार यांबरोबरच संगीत व नृत्य या कलांचा विकासदेखील ह्या काळात झालेला दिसून येतो. इ.स. १२०० नंतर मुस्लिम राजवटीत सैनिकांना युद्धसज्ज ठेवण्यासाठी घोडदौड, नेमबाजी, तलवारबाजी, कुस्ती, पोहणे, शिकार यांबरोबरच बैल, रेडा, हत्ती यांसारख्या प्राण्यांशी सामना करण्याचे शिक्षण दिले जाई. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी युवकांना युद्धाचे, बलसंवर्धनाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आढळते. समर्थ रामदासांनी गावोगावी हनुमान मंदिरे स्थापन केली. त्यांचेच रूपांतर पुढे आखाड्यांत झाले, तिथे दंड, बैठका, सूर्यनमस्कार, वजन उचलणे, कुस्ती, लाठी, दांडपट्टा तसेच ढालतलवारीने, जांबियाने, भाल्याने युद्ध करणे, अशा अनेक युद्धोपयोगी क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाई. पेशवे काळातही ही आखाडा-व्यायामपद्धत जपण्यात आली. त्या काळात मल्लविद्या व मल्लखांबाद्वारे शरीर कसदार व घाटदार बनविणाऱ्या व्यायामप्रकारांवर भर दिला जाई.
महाविद्यालयीन पातळीवर विभागीय, आंतरविभागीय स्पर्धा घेऊन त्यातून आंतरविद्यापीठ स्पर्धेकरता संघ निवडला जातो. तो प्रथम विभागवार स्पर्धेत सहभाग घेतो आणि नंतर अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होतो. शारीरिक शिक्षण संचालक म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्ती महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षणातील पदव्युत्तर कोर्स (एम.पी.एड. किंवा एम.पी.ई) पूर्ण केलेल्या असतात. काही महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण हा ऐच्छिक विषय म्हणून तीनही वर्षांसाठी निवडता येतो. तिथे वरील अर्हताप्राप्त व्यक्तींची शारीरिक शिक्षण अधिव्याख्याता म्हणून नेमणूक केलेली असते.
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता २५० ते ४०० विद्यार्थिसंख्येसाठी शैक्षणिक अर्हताप्राप्त एका क्रीडाशिक्षकाची नेमणूक करावी, असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये प्रथमवर्ष पदवी परीक्षेकरिता १० गुणांची शारीरिक शिक्षण परीक्षा अनिवार्य केलेली आहे. असे काही अपवाद वगळता शैक्षणिक पातळीवर हा विषय दुर्लक्षितच आहे.
शारीरिक शिक्षणाच्या विकासासाठी भारत सरकारने ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था १९५७ साली सुरू केली. तेथे शारीरिक शिक्षणाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. पीएच.डी. पदवीसाठी संशोधन करण्याची व्यवस्थाही तेथे आहे. पंजाबमधील पतियाळा येथे राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाची १९६१ साली स्थापना करण्यात आली. येथे विशिष्ट खेळातील मार्गदर्शक तयार केले जातात. अशीच केंद्रे नंतर कलकत्ता (कोलकाता), बंगलोर, गांधीनगर (गुजरात) या शहरांत सुरू करण्यात आली आहेत. विशिष्ट खेळातील मार्गदर्शकांसाठी सहा आठवड्यांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र औरंगाबाद केंद्रावर मे-जून महिन्यांत चालविला जातो.
बी.पी.एड्. ह्या पदवी परीक्षेसाठी क्रीडा-मानसशास्त्र, शारीरिक शिक्षणाचे आयोजन, नियोजन व व्यवस्थापन, शरीरविज्ञान व गतिशास्त्र, खेळांचे नियम व मार्गदर्शनाची तत्त्वे, शारीरिक शिक्षणातील मार्गदर्शन असे विषय आहेत. एम.पी.एड्. या पदव्युत्तर परीक्षेसाठी वरील विषयांसह क्रीडा-वैद्यकशास्त्र, शारीरिक शिक्षणातील संशोधन, योग व योगिक क्रिया ह्यांसारखे इतर विषय नेमलेले आहेत.
ब्रिटिश कालखंडात १८३३ मध्ये मध्यवर्ती सरकारने, तर १८७० मध्ये प्रांतिक सरकारांनी शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली परंतु त्यामध्ये शारीरिक शिक्षण या विषयास स्थान नव्हते. १९१२ मध्ये मध्यवर्ती सरकारने शारीरिक शिक्षणाकरिता विशेष तरतूद केली. तेव्हापासून फुटबॉल, क्रिकेट यांसारखे खेळ सरकारी शाळांमधून शिकवले जाऊ लागले. १९३५ नंतर तत्कालीन मुंबई इलाख्यातील शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक नेमून शारीरिक शिक्षण देण्यास प्रारंभ झाला.
स्वातंत्र्योत्तर कालखंडात शारीरिक शिक्षणास पंचवार्षिक योजनेत स्थान लाभले. १९४७ ते १९६२ ह्या कालावधीत अनेक समित्यांच्या शिफारशींवरून शारीरिक शिक्षणासाठी प्राथमिक शाळेत वर्गशिक्षक, तर माध्यमिक शाळेत शारीरिक शिक्षणाचे खास प्रशिक्षण घेतलेले शिक्षक नेमले जाऊ लागले. शारीरिक शिक्षणाचा स्वतंत्र अभ्यासक्रम आखण्यात आला. विद्यार्थ्यांच्या क्रीडानैपुण्यास वाव देण्यासाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळ्यांवरच्या स्पर्धा आयोजित करून विविध पारितोषिके व शिष्यवृत्त्या देण्याची तरतूद करण्यात आली. पावसाळी व हिवाळी स्पर्धा या नावाने या स्पर्धा ओळखल्या जातात. [⟶ भारत (खेळ व मनोरंजन)].
महाराष्ट्रामध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने अमरावती शारीरिक शिक्षणाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कांदिवली येथील शारीरिक शिक्षण प्रशिक्षण संस्था राज्यशासनातर्फे चालवली जात असे. अलीकडील काळामध्ये महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय (पुणे), श्री अंबाबाई तालीम संस्थेचे डॉ. पद्मसिंह पाटील शारीरिक शिक्षण महाविद्यालय (मिरज) आदी महाविद्यालये शारीरिक शिक्षणातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवितात. वडाळा व बार्शी येथेही शारीरिक शिक्षण महाविद्यालये आहेत. औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक महामंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय तसेच मिलिंद शारीरिक शिक्षण महाविद्यालय कार्यरत आहे.
महाराष्ट्रात अनेक व्यायामशाळांनी शारीरिक शिक्षणाच्या प्रचारप्रसाराचे कार्य पूर्वीपासून केले आहे. यांत अमरावतीचे श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, मिरजेची श्रीअंबाबाई तालीम संस्था व भानू तालीम संस्था, पुण्याचे महाराष्ट्रीय मंडळ, दादरचे समर्थ व्यायाम मंडळ, औरंगाबादचे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ इत्यादींनी खूप मोठ्या प्रमाणावर कार्य केले आहे. श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती व श्रीअंबाबाई तालीम संस्था, मिरज या संस्था संपूर्ण भारतभर व्यायाम प्रात्यक्षिकांचे दौरे काढतात. अन्य मंडळांतून खेळाडूंना विविध खेळांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. [⟶ महाराष्ट्र राज्य (खेळ व मनोरंजन)].
पहा : खेळ व्यायाम व्यायामविद्या व्यायामशाळा व्यायामी व मैदानी खेळ.
संदर्भ : 1. Bucher, C.A. Deborah, A. Wuest, Foundations of Physical Education, Toronto, 1987.
2. Clarke, H. H. Clarke, D.H. Application of Measurement to Physical Education, New Delhi, 1987.
3. जर्दे, श्रीपाल आ. शारीरिक शिक्षणाचा इतिहास, कोल्हापूर, 1988.
4. जर्दे, श्रीपाल आ. जर्दे, सुनीता श्री. शारीरिक शिक्षणाचे स्वरूप, कोल्हापूर, 1991.
५. वाखारकर, दि. गो. आलेगावकर, प. म. शारीरिक शिक्षणाचे ऐतिहासिक स्वरूप, पुणे, १९८४.
काळे, अशोक अरविंद