शामान : काही आदिम जनसमूहांच्या धार्मिक-लौकिक व्यवस्थेतील सर्वाधिकारी. सायबीरियन आणि उरल-अल्ताइक जमाती तसेच आग्नेय आशिया, ⇨ शिॲनिया, ⇨ आर्क्टिक प्रदेश, मध्य आशियातील काही प्रदेश, उत्तर अमेरिका इ. प्रदेशांतील काही आदिम जमातींत ‘शामान’ असतात. मूळ मँचू-तुंगूझ शब्दावरून `शामान’ हा शब्द आलेला असून त्याचा अर्थ ‘जो जाणतो तो’ किंवा ‘ज्याच्यासाठी ज्ञान आहे तो’असा आहे. प्राथमिक अवस्थेतील मनुष्य-समूहांमधील धर्मकल्पना यातुविद्येशी निगडित होत्या. त्या त्या जमातीतील यातुवेत्ता हा दिव्यशक्ती आणि माणूस यांच्यातील मध्यस्थ असे. गुंतागुंतीच्या यातुविद्येत तो प्रवीण असे. रोग, अतिवृष्टी, दुष्काळ यांसारख्या आपत्तींचे निवारण करणे, धनधान्य आणि गोधन समृद्ध करणे. भावी अरिष्टाची चिन्हे ओळखणे, शकुन पाहणे यांसारखी कामे अलौकिक शक्तीच्या द्वारे यातुवेत्ता करत असे. ‘शामान’ आणि ‘शामान धर्म’ अशा प्राथमिक अवस्थेतील यातुवेत्ता आणि यातुविद्या यांचीच विशिष्ट रूपे म्हणता येतील.
शामानपद हे वंशपरंपरेने किंवा देवदेवतांच्या निर्णयानुसार किंवा व्यक्तींच्या स्वयंप्रेरणेने वा लोकेच्छेने प्राप्त होते. तन्मयावस्था (एक्स्टसी) हा शामानाच्या सामर्थ्याचा गाभा आहे. तन्मयावस्थेतच तो परलोकाशी संपर्क-संवाद साधू शकतो. आपल्या जमातीच्या परंपरेचे समग्र ज्ञान शामानाच्या ठायी असते. या ज्ञानप्राप्तीसाठी प्रत्यक्षातील किंवा स्वप्नातील दीक्षाविधी असतो. तन्मयावस्था प्राप्त होऊनही दीक्षा मिळू शकते. जगावेगळे विचित्र-विक्षिप्त वर्तन हेही शामानांचे एक वैशिष्ट्य होय. कधी कधी त्याला क्रोधोन्मादाचे झटके येतात. वंशपरंपरागत शामानपदावर पूर्वजांचे आत्मे व्यक्तीची निवड करतात, असे मानले जाते.
शामानांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे जमातीमधील लोकांचे निरनिराळे आजार बरे करणे. आजार होणे ह्याचा अर्ध रुग्णाचा आत्मा त्याच्याजवळ राहिला नाही, असे मानले जाते. अशा भटकणाऱ्या आत्म्याला शामान आपल्या दैवी शक्तीने पुन्हा रुग्णाच्या शरीरात आणतो, अशी समजूत आहे. ह्याशिवाय मरण पावलेल्या माणसाच्या आत्म्याला शामान परलोकी नेतो, तसेच त्याच्या नव्या निवासस्थानी त्याला सोडतो. शामान हाच देवदेवतांना अर्पण केलेले बळी, पूजाद्रव्ये वगैरे यांच्यापर्यंत पोहोचवतो. काही जमातींमध्ये धवल शामान आणि कृष्ण शामान असे दोन प्रकार असतात. धवल शामानांचे नाते देवांशी असते, तर कृष्ण शामान अपदेवतांशी म्हणजे दुष्ट शक्तींशी संबंध ठेवून असतात. ढोल हे शामानांचे एक महत्त्वाचे साधन होय. ढोलाच्या नादातून शामानाची तन्मयावस्था साधली जाते.
शामानांची विश्वकल्पनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. विश्व हे दिव्य, स्वर्गीय वस्तूंनी भरलेले असून त्यांत देवता राहतात. त्यांचे जग वर्तुळकार असते. त्याच्या मध्यभागी एक भेग असून तिथून अधोलोकाकडे जाता येते. वरचे जग पृथ्वीच्या म्हणजे केंद्रस्थ जगाच्या वर असते. पृथ्वी ही एका महाकाय प्राण्याच्या खांद्यावर – उदा., प्रचंड कासव, मासा, बैल अथवा हत्ती – असून त्या प्राण्याच्या हालचालींमुळे भूकंप होतात. एक स्तंभ पृथ्वीला वरच्या जगाशी जोडतो. वरच्या जगाचेही अनेक स्तर असतात. पृथ्वीच्या नाभिस्थानावर एक वैश्विक वृक्ष उभा असतो आणि त्याचा शेंडा वरच्या जगात राहणाऱ्या देवांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचलेला असतो.
शामानाला त्याच्या अलौकिक सामर्थ्यांमुळे व कार्यामुळे जमातीत प्रतिष्ठा असते. त्याचे भयही जमातीतल्या लोकांना वाटत असते. शामान कधी शिकारीला वा मासे पकडायला जात नाही तसेच कोणत्याही उत्पादक कामात भाग घेत नाही. त्याचा चरितार्थ जमातीलाच चालवावा लागतो.
पहा : अलौकिक सृष्टी आदिम कला आदिवासी जडप्राणवाद जादूटोणा माना शकुनविचार.
संदर्भ : 1. Edsman, Carl-Martin, Ed. Studies in Shamanism, Stockholm, 1967.
2. Eliade, Mircea, Shamanism : Archaic Techniques of Ecstacy, New York, 1964.
3. Harner, Michael J. The Way of the Shaman, New York, 1980.
कुलकर्णी, अ. र.