शान्सी : चीनच्या उत्तर भागातील एक प्रांत. त्याच्या पूर्वेस होपे प्रांत, दक्षिणेस व आग्नेयीस होनान प्रांत, पश्चिमेस शेन्सी प्रांत, तर उत्तरेस इनर मंगोलिया हा स्वायत्त प्रदेश आहे. शान्सी प्रांताचे क्षेत्रफळ १,५७,२००चौ.किमी. व लोकसंख्या ३,१०,९०,००० (१९९८ अंदाज) आहे. ताइयूआन (लोकसंख्या १६,८०,००० – १९९३) हे प्रांतिक राजधानीचे शहर आहे.
शान्सी प्रांताचा बहुतांश भाग विस्तृत पठारी प्रदेशाने व्यापला असून त्याची समुद्रसपाटी पासून सरासरी उंची ३०० ते ९०० मी.च्या दरम्यान आहे. बहुतांश भूमी लोएस मृदेने व्यापली आहे. या लोएसयुक्त उच्चभूमीच्या उत्तरेस मंगोलियन स्टेपी (गवताळ) प्रदेश, पश्चिमेस व दणिक्षेस ह्वांग नदी (पीत नदी) आणि पूर्वेस उत्तर चिनी मैदान आहे. प्रांताच्या पूर्व सरहद्दीवर ताइहांग पर्वतरांग असून त्यावरूनच या प्रांताला शान्सी किंवा शान्क्झी (पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेश) हे नाव पडले. उत्तर सरहद्दीवर असलेल्या चीनच्या भिंतीमुळे शान्सी प्रांत इनर मंगोलियापासून अलग झाला आहे. एकूण क्षेत्रफळापैकी केवळ दहा टक्के प्रदेश मैदानी आहे. हा प्रदेश प्रामुख्याने उत्तरेकडील डाटुंगच्या सभोवताली आढळतो. या प्रांतातील सार्वाधिक उंची (३,०५८ मी.) ईशान्य भागात असलेल्या वूताई पर्वत भागात आढळते. शान्सीच्या पश्चिम सरहद्दीवरून उत्तर-दक्षिण दिशेत वाहणारी ह्वांग नदी पर्वतीय प्रदेशातून वाहत असल्यामुळे तिने पात्रात खोल घळ्या निर्माण केल्या आहेत. प्रांतातील फेन नदीचे खोरे विशेष महत्त्वाचे आहे. उत्तर- दक्षिण दिशेत वाहणारी फेन ही ह्वांग नदीची प्रमुख उपनदी आहे.
मंगोलियन वाळवंटाजवळ स्थान असल्यामुळे शान्सीचे हवामान अर्धशुष्क प्रकारचे आहे. हिवाळे थंड व उन्हाळे उष्ण असतात. पावसाची वार्षिक सरासरी फक्त ३८ सेंमी. आहे. पाऊस प्रामुख्याने जुलै व ऑगस्ट महिन्यांत पडतो. हिवाळ्यातील तापमान –२९० से. पर्यंत खाली जाते, तर उन्हाळ्यात ते ३२० से. पर्यंत वाढते. हिवाळ्यातील अवर्षण, उन्हाळ्यातील गारपीट व पूर परिस्थिती या नेहमीच्याच आपत्ती आहेत.
इ.स.पू. पाचव्या ते तिसऱ्या सहस्रकांत या प्रदेशात काही तृणधान्यांचे उत्पादन होत असल्याचे पुरावे मिळतात. हा प्रदेश अधिक उंचीवर असल्यामुळे प्राचीन काळापासून त्याचे स्थान मोक्याचे ठरले. होपे व होनान या सुपीक मैदानी प्रदेशांकडे जाण्याचे शान्सी हे प्रवेशद्वारच होते. तसेच खुद्द चीन आणि मंगोलिया तथा मध्य आशियाई प्रदेशातील स्टेपीज यांदरम्यानचा हा एक मोक्याचा मध्यवर्ती क्षेत्रविभाग (बफर झोन) होता. लष्कर व व्यापारी मोहिमांच्या दृष्टीनेही हा प्रांत महत्त्वाचा होता. भारतातून चीनमध्ये झालेला बौद्ध धर्माचा प्रवेश इतर काही मार्गांप्रमाणेच याही प्रांतातून झाला. वेगवेगळ्या राजवंशांच्या कारकीर्दीत शान्सीच्या राजकीय दर्जातही स्थित्यंतरे होत राहिली.
इ.स.पू. दुसऱ्या सहस्रकात चिनी सम्राटांची राजधानी याच प्रदेशात होती. हान राजवंशाच्या काळात (इ.स.पू. २०२ ते इ.स. २२०) हा प्रदेश पिंचौ स्टेट नावाने, थांग राजवंशाच्या काळात (इ.स. ६१८–९०६) ‘हॉटुंग ताओ’ नावाने, तर सुंग राजवंशाच्या काळात ( इ. स. ९६० – १२७९) हॉटुंग रूट या नावाने हा प्रदेश ओळखला जाई. चीनमध्ये मंगोल सत्ता असताना हा प्रदेश हॉटुंग व शान्सी अशा दोन प्रांतांत विभागण्यात आला. मिंग राजवंशाच्या काळात (१३६८–१६४४) त्याचे शान्सीमध्ये एकत्रीकरण करण्यात आले. व्यापारामध्ये शान्सी आघाडीवर असल्यामुळे अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत येथे सावकारांचा तसेच व्यापाऱ्यांचा एक मोठा वर्ग निर्माण झाला. संपूर्ण चीनमध्ये हे सावकार व व्यापारी प्रसिद्ध होते. १९११–१२ मध्ये च्यिंग् राजवंशाची सत्ता झुगारून दिल्यापासून कम्युनिस्ट सत्ता येईपर्यंत (१९४९) यन् शीशान याने शान्सी प्रदेशावर अनियंत्रित सत्ता गाजविली. त्याने केलेल्या काही अंतर्गत सुधारणांमुळे येथे काही प्रमाणात समृद्धी आली. चीन-जपान युद्धकाळात (१९३७ – ४५) जपान्यांनी या प्रांतात कोळसा खाणकाम आणि अवजड उद्योगांचा विकास केला. कम्युनिस्ट राजवटीत १९४९ नंतर कृषी व हस्तव्यवसायविषयक सहकारी संस्थांना चालना देण्यात आली.
शान्सीमध्ये लोएस सुपीक मृदा असली, तरी कमी पर्जन्यमान, मोठ्या प्रमाणावरील जमिनीची धूप, वृक्षारोपणाचा अभाव, लोएस प्रदेशातून वेगाने होणारे बाष्पीभवन, पीक वाढीचा अल्पकाळ यांमुळे शेतीव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू शकत नाही. पूर्वी वारंवार दुष्काळही पडत असत. १९५५ मध्ये ह्वांग नदीवर सानमनशिया येथे ९० मी. उंचीचे धरण बांधण्यात आले. त्यामुळे २, ३५० चौ.किमी. क्षेत्राचा जलाशय निर्माण झाला. पुराचा धोकाही कमी झाला. छोटी धरणे, लोएस टेकड्यांच्या उतारांवरील आडवे बांध, जलसिंचन, वनरोपण इ. कार्यक्रम राबविण्यात आले. फेन नदीच्या खोऱ्यातील कृषी उत्पादनांत वाढ करण्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या. कृषिक्षेत्र प्रामुख्याने फेन नदीच्या खोऱ्यातच केंद्रित झाले आहे. गहू, ज्वारी, सोयाबीन, मका, काउलीआंग, बार्ली, तीळ, फळे (प्रामुख्याने द्राक्षे), तंबाखू, कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत. कापूस उत्पादनात देशात शान्सी अग्रेसर आहे. उत्तरेकडील गवताळ प्रदेशात पशुपालन व्यवसाय चालतो. येथून कापूस, लोकर व कातडी यांची निर्यात होते. पर्वतीय प्रदेशात वनोद्योग महत्त्वाचा आहे.
चीनमधील कोळशाचे सर्वाधिक साठे शान्सी प्रांतात आहेत. डाटुंग, शीशान, यांगचुआन, फन्शी, शेनकांग ही खाणकामाची प्रमुख केंद्रे आहेत. फन्शी या नगराजवळ टिटॅनियम व व्हॅनेडियम या खनिजांचे साठे आहेत. याशिवाय चांदी, जस्त, तांबे यांच्या खनिजांचे साठे या प्रांतात आढळतात. नैर्ऋत्य भागात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते. अँथ्रॅसाइट आणि कोकसाठी लागणारा उच्च दर्जाचा कोळसा भरपूर असल्यामुळे अवजड उद्योगांचा विकास या प्रांतात झाला आहे. लोह व पोलास, अवजड यंत्रसामग्री, खाणकामाची यंत्रे, औद्योगिक रसायने, रासायनिक खते, सिमेंट, कागद, वस्त्रोद्योग, रेल्वे इंजिने, कृषी अवजारे, पिठाच्या गिरण्या, दारू गाळणे इ. उद्योगधंदे येथे चालतात. बहुतांश उद्योगांचे केंद्रीकरण ताइयूआन – यूत्झू प्रदेशात झालेले आहे. डाटुंग, यांगक्वान, यूसी व चांगझी ही इतर औद्योगिक केंद्रे आहेत.
शान्सीमध्ये लोहमार्गांचा विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे. उत्तर-दक्षिण जाणारा लोहमार्ग सर्वांत लांब आहे. लांब पल्ल्याचे व बारमाही रस्ते कमी आहेत. ह्वांग नदी जलवाहतुकीच्या दृष्टीने विशेष उपयुक्त ठरत नाही. मालवाहतुकीसाठी प्रामुख्याने फेन नदीचा मर्यादित प्रमाणात वापर केला जातो. हिवाळ्यात मात्र ही नदी गोठलेली असते.
शान्सीमधील लोक मूळ हान वंशीय असून ते ‘नॉर्थ चायना मँडरीन’ ही भाषा बोलतात. अल्पसंख्य वांशिक गटांमध्ये चिनी, मुस्लिम, मंगोल व मांचू लोकांचा समावेश होतो. मंगोल लोक उत्तर भागात अधिक आहेत. ताइयूआन व इतर शहरांत काही प्रमाणात मुस्लिम आढळतात. ताइयूआन व डाटुंग (लोकसंख्या ११,१०,००० – १९९१) ही शान्सीमधील प्रमुख नागरी केंद्रे आहेत. डाटुंग हे शहर होपे प्रांत व इनर मंगोलिया यांच्या सरहद्दीजवळ असून, शान्सीमधील हे एक प्रमुख औद्योगिक, खाणकामाचे व लोहमार्ग वाहतुकीचे केंद्र आहे. उत्तरेकडील वै राजघराण्याच्या काळातील (इ.स. ३८६–५३५) कलात्मक व पवित्र मानल्या गेलेल्या बौद्ध गुंफा डाटुंगजवळील युकँग येथे आहेत.
चौधरी, वसंत