शॅमॉय : (चॅमी, शॅमी). स्तनी वर्गातील गोकुलातल्या (बोव्हिडी) रूपिकॅप्रा प्रजातीचा प्राणी. शास्त्रीय नाव रूपिकॅप्रा-रूपिकॅप्रा. हा रवंथ करणार प्राणी युरोप आणि तुर्कस्तानातील पर्वतराजींमध्ये आढळतो.
शरीराची लांबी ९२–१५२ सें.मी. शेपूट काळे ३-४ सेंमी. खांद्यापाशी उंची ७६–८१ सेंमी. त्याचे वजन सुमारे २४ ते ५० कि.ग्रॅ. असते. नर आणि मादी या दोघांनाही शिंगे असून ती सरळ वर गेलेली आणि टोकाकडे मागे वळलेली असतात त्यांची लांबी १५ – २० सेंमी. असते. अंगावरचे केस आखूड व राठ असून त्यांचा रंग उन्हाळ्यात पिंगट-तपकिरी असतो हिवाळ्यात हे केस लांब व काळसर-तपकिरी होतात त्यांच्या खाली दाट लोकरीसारखे केस उगवतात. गळ्यावर पांढरे चकदळ असते. हा प्राणी डौलदार, चपळ आणि धाडसी असतो.
शॅमॉयांचे लहान कळप असतात, पण प्रौढ नर एकएकटे राहतात. यांची ज्ञानेंद्रिये तीक्ष्ण असून ते सदैव जागरूक असतात. धोक्याची सूचना मिळाल्याबरोबर सबंध कळप पळून दुर्गम ठिकाणी जातो. हे शाकाहारी आहेत. उन्हाळ्यात वनस्पती व फुले यांवर आणि हिवाळ्यात पाइन वृक्षांचे धुमारे, शैवाक वगैरेंवर ते उपजीविका करतात.
ऑक्टोबर महिन्यात माजावर आल्यावर प्रौढ नर कळपात दाखल होतात आणि तरुण नरांना कळपाबाहेर घालवतात. प्रौढ नरांत माद्यांकरिता या वेळी निकराच्या झुंजी लागतात. वीस आठवड्यांच्या गर्भावधीनंतर मादील एकच पिल्लू होते. गवत व शैवाकाच्या मऊ गादीवर पिलाचा जन्म होतो. जन्मानंतर काही तासांत पिलू आईच्या पाठोपाठ चालू लागते. पिलाची आई मरण पावल्यास इतर माद्या पिलाची काळजी घेतात. शॅमॉयचे आयुर्मान सुमारे २२ वर्षांचे असते.
जेव्हा दाट बर्फ़ पडते व अन्न मिळत नाही अशा वेळी शॅमॉय एक-दोन आठवडे अन्नाशिवाय (उपाशी) राहू शकतात. त्याची त्वचा अतिशय मृदू असते. तिच्यापासून ‘शॅमी’ नावाचे अतिशय मऊ चामडे तयार करतात. त्याचा उपयोग काच स्वच्छ करण्यासाठी करतात. त्याचे मांस मृगाच्या मांसासारखे रुचकर असते. शिकाऱ्यांनी या प्राण्याची बेसुमार हत्या केल्यामुळे हा हल्ली दुर्मिळ झाला आहे.
कर्वे, ज. नी.