शवपेटिका : मृत व्यक्तीचा देह ठेवण्यासाठी शवपेटिकांचा वापर करण्याची प्रथा समाजात प्राचीन काळापासून चालत आल्याचे दिसते. त्या त्या समाजाच्या, जमातीच्या किंवा धर्माच्या अंत्यविधीप्रमाणे ही प्रथा वेगवेगळ्या स्वरूपात पाळली जाते. सामान्यपणे दगड, माती, लाकूड, लोखंडादी धातू अशा विविध माध्यमांच्या शवपेटिका आढळतात. त्याचप्रमाणे शवपेटिकांचे आकार-प्रकार, त्यांवरील सजावट, त्यांच्या वापराची पद्धत इ. बाबतींतही बहुविधता आढळते. मृत देहाचे दहन वा दफन करण्यापूर्वी त्यास शवपेटिकेत ठेवण्यात येते. त्याचप्रमाणे मृत देह एका ठिकाणाहून दुसऱ्या स्थळी नेतानाही शवपेटिकेचा वापर करतात.    

नवाश्मयुगाच्या शेवटी (इ. स. पू. ८००० ते इ. स. पू. ३०००) ईजिप्शियन राजांच्या शवपेटिका दगडांच्या, भव्य व रंगीत होत्या त्यांवर पपायरसचे आच्छादन करून शवाचे चरित्रात्मक टिपण चित्रलिपीत करीत. नंतरच्या काळात लाकडी किंवा चुनखडीच्या शवपेटिका वापरता आल्या. ⇨ तूतांखामेन (इ. स. पू. १३६६ ?– १३५० ?) यांच्या काळात सोन्याच्या किंवा चांदीच्या शवपेटिका तयार करीत. प्राचीन ग्रीक समाजात भाजक्या मातीच्या घटाकार, षटकोणी किंवा त्रिकोणी आकाराच्या शवपेटिका वापरत. ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतरच्या युरोपात दगडांच्या शवपेटिका होत्या. रोमन लोक चुनखडीच्या दगडांच्या शवपेटिका वापरीत.    

मध्ययुगीन युरोपात रंगविलेल्या व नक्षीकाम केलेल्या, लाकडी शवपेटिका वापरत. सतराव्या शतकात लोखंडी शवपेटिकांचा वापर सुरू झाला. अमेरिकेत काही मृत झालेल्या पाळीव प्राण्यांसाठीही शवपेटिका वापरतात.    

वीरमरण आलेल्या सैंनिकांचा पार्थिव देह त्यांच्या जन्मगावी नेण्यासाठीही शवपेटिकांचा वापर करण्यात येतो.

पहा : अंत्यविधी व अंत्यसंस्कार.                             

अवचट, प्र. प्र.