शम्स फकीर : (१८४३–१९०४). काश्मिरी सुफी परंपरेतील संतकवी. मूळ नाव मुहम्मद सिद्दिक शेख. जन्म चिंक्रल मोहल्ला श्रीनगर येथे. घरच्या गरिबीमुळे वयाच्या बाराव्या वर्षापासून तो शाली विणण्याचे काम करीत असे. वयाच्या सु. पंचविसाव्या वर्षी तो अमृतसरला आला. तेथे सु. बारा वर्ष मुर्शिदच्या (धर्मगुरू) मार्गदर्शनाखाली अध्यात्माचे उच्च ज्ञान त्याने प्राप्त केले. त्याच्या धार्मिक कवनांच्या प्रभावामुळे शेकडो अनुयायी त्याच्याभोवती गोळा झाले. अनंतनाग येथे त्याचा विवाह झाला व क्रिशपोर, बडगाम येथे तो स्थायिक झाला. तेथेच त्याचे निधन झाले. त्याची शिष्यपरंपरा फार मोठी होती. त्याने विपुल गीते व गझल रचल्या पण त्यातल्या फार थोड्या आता उपलब्ध आहेत. त्यांतही त्याच्या चमकदार कल्पनाशक्तीचे उत्तुंग आविष्कार आढळतात. त्याच्या मरणोत्तर दोन भागांत त्याच्या रचना प्रसिद्ध करण्यात आल्या. पहिल्या भागात २८, तर दुसऱ्या. भागात ३२ कवने संकलित केली आहेत. सूफियान कलमाच्या अनेक भाट-गायकांनी त्याची कवने मौखिक परंपरेने जतन केली. त्याच्या अनेक गीतांमध्ये स्थानिक देवदेवतांच्या मुद्रा पुन्हाःपुन्हा उमटताना दिसतात. काही गीते उच्च कोटीच्या गूढ आध्यात्मिक अनुभूतींचा साक्षात्कार व्यक्त करतात. त्याच्या काव्यात पारंपरिक सुफी तत्त्वज्ञानाचा आणि काश्मीरी शैव पंथातील अद्वैतवादाचा सहजसुंदर समन्वय साधलेला दिसून येतो. त्याची अनेक पदे रूपकात्मक आहेत. अमर्याद दिक्कालाला कवेत घेणारी उत्तुंग कल्पनाशक्ती त्याच्या स्फुट भावकवितांतून दिसून येते. त्याच्या काही गझला व अन्य कवनांतून उत्कट शृंगारभाव व धार्मिक गूढवाद यांची सांगड घातलेली आहे. त्याच्या रचना साध्यासुध्या काश्मीरी बोलीभाषेत आहेत. विसाव्या शतकातील काश्मीरी गूढवादी कविपरंपरेचा तो आद्य प्रणेता ठरला. या परंपरेतील वहहाव खर, अहमद बटवरी, समद मीर, अहद झरगर या कवींवर त्याचा विशेत्वाने प्रभाव जाणवतो.

 संदर्भ : Ahmed, Shamsuddin, Shams Faquir, 1959.

हाजिनी, मोही-इद्दीन (इं) इनामदार, श्री. दे (म)