व्ह्येता, फ्रांस्वा : ( ? १५४० – १३ डिसेंबर १६०३) फ्रेंच गणितज्ञ. आधुनिक बीजगणिताचे जनक. ज्ञात व अज्ञात राशींकरिता अक्षरे किंवा संकेतने वापरण्याची पद्धतशीर प्रथा त्यांनीच सुरू केली. यामुळे बीजगणित म्हणजे व्यापकीकृत अंकगणित ही संकल्पना रूढ झाली. त्यांनी ⇨समीकरण सिद्धातांतही कार्य केले. त्यांनी ⇨त्रिकोणमिती, ⇨बीजगणित व ⇨भूमिती या ज्ञानशाखांत महत्त्वाचे शोध लावले.
व्ह्येता यांचा जन्म फोंतन्ये-ल-काँत (फ्रान्स) येथे झाला. त्यांनी १५६० साली प्वात्ये विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. ते रेन व तूर येथील पार्लमेंटचे सदस्य होते. फ्रान्सचे राजे चौथे हेन्री यांच्या ह्युगेनॉट (फ्रेंच प्रॉटेस्टंट) पंथियांपासून रोमन कँथलिकांचे संरक्षण करण्यासाठी आरंभिलेल्या या युद्धाकरिता सांकेतिक लिपी वापरली होती. सांकेतिक लिपीतील संदेशांचे व्ह्येता यांनी फोड करून ते फ्रेंचांना उपलब्ध करून दिले.
व्ह्येता यांनी विश्वरचनाशास्त्र, खगोलशास्त्र व भूगोल यांच्यावर पहिला ग्रंथ फ्रेंच भाषेत लिहिला. पुढचे ग्रंथ मात्र त्यांनी लॅटिन भाषेत लिहिले. त्यांनी Canon mathematicus seu ad triangular (१५७९ इं. शी. मॅथेमॅटिकल लॉज अँप्लाइड टू ट्रायअँगल्स) हा त्रिकोणमितीवरील ग्रंथ लिहिला. त्यात ज्या, कोज्या, स्पर्शक यांची मूल्ये कोनातील प्रत्येक मिनिटाच्या फरकाला कशी बदलतात, याची माहिती (सारणी) आहे [⟶ त्रिकोणमिती]. तसेच प्रतलीय आणि गोलीय त्रिकोणाचे संगणन करण्यासाठीच्या पद्धतींचा पद्धतशीर विकास त्यांनी बहुधा प्रथमच केल्याचे या ग्रंथावरून लक्षात येते. बीजगणितावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. In artem analyticem isagoge (१५९१ इं.शी. इंट्रोडक्शन टू द अँनँलिटिकल आर्ट्स) या ग्रंथात त्यांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार यांचे नियम दिले आहेत. हा ग्रंथ आधुनिक प्राथमिक बीजगणिताच्या पाठ्यपुस्तकासारखा आहे. De aequationum recognitione etemendatione (१६१५ इं.शी. कन्सर्निग द रेकग्निशन अँड इमेंडेशन ऑफ इक्केशन्स) या ग्रंथात त्यांनी समीकरण सिद्धांत दिले आहेत. त्यामध्ये त्यांनी द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ कोटींच्या समीकरणांची उत्तरे काढण्याच्या पद्धती दिलेल्या आहेत. एखाद्या समीकरणाची धन बीजे आणि अज्ञात राशीच्या भिन्न घातांचे गुणक यांच्यातील परस्परसंबंध (संयोग) त्यांना माहीत होते. त्या काळात फक्त धन बीजे असतात अशी धारणा होती [⟶ समीकरण सिद्धांत].प्येअर द फेर्मा या गणितज्ञांनी व्ह्येता यांच्या समीकरण सिद्धांतावरील लेखनाचा आपल्या संशोधनात बराच उपयोग केला.
व्ह्येता यांच्या Zeteticorum libri quinque या ग्रंथात पाच भाग असून त्यात पुढील गोष्टींचा विचार केला आहे : (१) दोन अज्ञान संख्यांची बेरीज, वजाबाकी किंवा गुणोत्तर दिले असता, त्या संख्या शोधणे, (२) दोन अज्ञात संख्यांच्या वर्गाची वा घनांची बेरीज (किंवा वजाबाकी) व त्यांचा गुणाकार आणि या गुणाकाराचे या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेशी गुणोत्तर दिले असता, त्या संख्या शोधणे, (३) वरील प्रश्नांचा काटकोन त्रिकोणच्या बाजू काढण्यासाठी उपयोग करणे, (४) काटकोन त्रिकोणावरील कृत्ये करणे.
व्ह्येता यांनी भूमितीवर लिहिलेला Supplemetum geometriae हा महत्त्वपूर्ण ग्रंथ असून त्यात कूट प्रश्नही दिलेले आहेत. अन्य एका ग्रंथात त्यांनी (पाय) या अपरिमेय संख्येकरिता दिलेले अनंत गुणाकाराचे सूत्र गणितच्या ग्रंथांत आढळणारे पहिले उदाहरण असल्याचे मानले जाते. Opera mathematica (१६४६) या ग्रंथात त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
व्ह्येता पँरिस येथे मृत्यू पावले.
भावे, श्री. मा.