व्हेसेल, युहान हॅर्मान : (६ ऑक्टोबर १७४२–२९ डिसेंबर १७८५). नॉर्वेजियन डॅनिश कवी आणि विनोदकार. जन्म नॉर्वेमधील यॉन्सरूड येथे परंतु बरेचसे आयुष्य त्याने डेन्मार्कमध्ये व्यतीत केले. लेखनही डॅनिश भाषेत केले. कोपनहेगन विद्यापीठात त्याने शिक्षण घेतले. तेथील काही विद्यार्थ्यांनी चालविलेल्या एका वाङ्मयीन मंडळाचा तो एक आघाडीचा सदस्य होता. जर्मनीमधून येऊ लागलेल्या स्वच्छंदतावादी वाङ्मयीन प्रवृत्तींना या मंडळाचा विरोध होता आणि ‘ग्रीकांचा आदर्श समोर असू द्या.’ हे त्याचे ध्येयवाक्य होते. १७७५पासून या मंडळाच्या प्रकाशनांतून व्हेसेलच्या चतुरोक्ती, कविता इ. प्रसिद्ध होत. आज त्याची कीर्ती अधिष्ठित आहे, ती मुख्यत: ‘लव्ह विदाउट स्टॉकिंग्ज’ (१७७२, इं. अर्थ) ह्या पाच अंकी शोकात्मिकेवर! नव-अभिजाततावादी तंत्रातील या नाटकात डॅनिश नाट्यलेखनातील काही अपप्रवृत्तींचे उपरोधप्रचुर विडंबन केले आहे. एका माणसाचे हरवलेले मोजे, हा ह्या ‘शोकत्मिके’चा विषय असून सर्वसामान्य व्यक्तिरेखांभोवती शोकात्मिकेतील असामान्य व्यक्तिरेखांच्या वीरतेचे वलय निर्माण करण्यात आलेले आहे.
कोपनहेगन येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.