व्हिक्टोरिया-१ : कॅनडतील ब्रिटिश कोलंबिया राज्याची राजधानी व प्रसिद्ध बंदर. लोकसंख्या ७१,२२८ (१९९१). कॅनडाच्या नैर्ऋत्य भागातील व्हँकूव्हर बेटाच्या आग्नेय टोकावर ह्वान द फ्यूका या समुद्रधुनीवरील निसर्गसुंदर असे हे शहर आहे. व्हँकूव्हर बेटावरील हे सर्वांत मोठे शहर व्हँकूव्हर शहराच्या नैर्ऋत्येस १३४ किमी.वर आहे. हडसन बे कंपनीचे फर व्यापाराचे ते पश्चिमेकडील केंद्र म्हणून या ठिकाणी सर जेम्स डग्लस याने फोर्ट कॅमोसन नावाचा किल्ला बांधला (१८४३). इंग्लंडच्या राजाची एक वसाहत म्हणून व्हँकूव्हर बेट ओळखले जात असे. १८५६ मध्ये येथे विधिमंडळाची स्थापना होऊन डग्लस याची गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली. इंग्लंडच्या राणीच्या सन्मानार्थ याचे ‘फोर्ट व्हिक्टोरिया’ असे नामांतर करण्यात आले. १८५० च्या दशकात मुख्य भूमीवरील फ्रेझर नदीखोऱ्यात सोन्याच्या खाणींचा शोध लागला. तेव्हापासून शहराकडे लोकांची वर्दळ वाढली व त्याचा द्रुतगतीने विकास घडून आला. वाहतूक केंद्र म्हणूनही याला महत्त्व प्राप्त झाले. मुख्यत: खाणकामगार, तसेच खाणक्षेत्राकडे खेचरांचा पुरवठा या शहरातून केला जाई. १८६२ मध्ये यास शहराचा दर्जा प्राप्त झाला. १८६६ मध्ये व्हँकूव्हर बेटाचा ब्रिटीश कोलंबिया प्रदेशात समावेश करण्यात आला. १८६८ मध्ये या संयुक्त प्रदेशाची राजधानी व्हिक्टोरिया येथे हलविण्यात आली. १८७१ मध्ये ब्रिटिश कोलंबियाचा कॅनडा प्रजासत्ताकात समावेश करण्यात आला, तेव्हा हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे बनले.
पहिल्या व दुसऱ्या महायुद्धकाळात हे एक महत्त्वाचे नाविक केंद्र होते. दुसऱ्या महायुद्धात भूसेना व वायुसेनेची अनेक केंद्रे व छावण्या या जिल्ह्यात होत्या. या बंदरातून ह्वान द फ्यूका सामुद्रधुनीमार्गे सरळ पॅसिफिक महासागरात जाता येते. त्यामुळे पॅसिफिक किनाऱ्यावरील जहाजवाहतुकीचे व दुरुस्तीचे हे सर्वांत मोठे व उपयुक्त असे आंतरराष्ट्रीय बंदर बनले आहे. कॅनडा व संयुक्त संस्थानांशी हे हवाई मार्गाने जोडले आहे. ‘कॅनडियन नॅशनल’ व ‘कॅनडियन पॅसिफिक’ या दोन्ही कंपन्यांचे लोहमार्ग येथपर्यंत आलेले आहेत.
ब्रिटीश कोलंबियातील हे प्रसिद्ध औद्योगिक, व्यापारी व वितरण केंद्र आहे. जहाजबांधणी व दुरुस्ती, लाकूड-चिरकाम, यंत्रनिर्मिती, मासेमारी व माशांवरील प्रक्रिया, कागदाचा लगदा व कागदनिर्मिती, फर्निचर, रंग, सिमेंट, आगकाड्या, विटा, कौले, फरश्या, मृत्पात्री, सूक्ष्म उपकरणे, खाणकामाची साधने, अन्नप्रक्रिया इ. उद्योगधंदे शहरात चालतात. येथून लाकडाचा लगदा, धान्य व मासे यांची निऱ्या होते. खोल सागरी मासेमारीसाठी येथून जहाजे जातात. शहरात व्हिक्टोरिया विद्यापीठ (स्था. १९६३) आहे. प्रांतीय संसदभवन, शासकीय इमारत, न्यायालय, एम्प्रेस हॉटेल, क्रेगडारॉश किल्ला, डोमिनियन खगोलीय भौतिकी वेधशाळा, रॉयल रोड्स कॅनडियन सर्व्हिसेस कॉलेज (१९४२) या येथील उल्लेखनीय वास्तू आहेत. शहरातील वस्तुसंग्रहालय, प्रयोगशाळा, कलावीथी, सार्वजनिक ग्रंथालय, प्रांतिक अभिलेखागार, नाट्यसंस्था इ. संस्था महत्त्वाच्या आहेत. अनेक सैनिकी व नाविक कार्यालये येथे आहेत.
बारमाही सौम्य हवामान, उत्तम निसर्गसौंदर्य, किनार्या्वरील विस्तृत पुळणी, परिसरातील जंगले, सुंदर बागा व उद्याने, गोल्फ, शिकार, मासेमारी, शीड-जहाज शर्यती इ. खेळांच्या सुविधा यांमुळे फार मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. शहराच्या समोरच सामुद्रधुनीच्या पलीकडे असलेल्या बर्फाच्छादित ऑलिंपिक पर्वताचे दर्शन मनोवेधक असते.
चौधरी, वसंत