व्हिट्रूव्हिअस : (इ. स. पूर्व पहिले शतक). रोमन वास्तुशिवल्पी आणि अभियंता. पूर्ण नाव मार्कस व्हिट्रूव्हिअस पॉलिओ. डी आर्किटेक्चरा (इ. स. पूर्व २५ – २३) नामक दशखंडात्मक ग्रंथामुळे तो नावारूपास आला. हा ग्रंथराज त्याने सम्राट ऑगस्टस याला अर्पण केला होता. वास्तूचे मूल्यमापन आणि वास्तुशास्त्रीय संकल्पना यांची सूक्ष्म सर्वांगीण चर्चा या ग्रांथात व्हिट्रूव्हिअसने केलेली आहे. त्यामुळे अर्थातच त्याच्या या लेखनाचा प्रभाव पुढील अनेक शतके टिकला. त्याच्या प्रस्तावनेवरून ज्यूलिअस सीझरने त्याला लष्करी अभियंता (मिलिटरी इंजिनियर) म्हणून नेमले असण्याची शक्यता असावी. तोफखाना-अभियंता म्हणून सम्राट ऑगस्टसने त्याची नेमणूक केली होती. आजारपणात त्याने ग्रंथनिर्मिती केली. किंबहुना त्यामुळेच वास्तुकलेच्या प्रत्यक्ष व्यवसायात तो फारसा कार्यरत नव्हता. ‘बॅसिलिका ऑफ फेनम’ या एकाच वास्तुनिर्मितीचा उल्लेख त्याच्या लेखनात येतो. आपल्या सहकारी वास्तुतज्ञांचे व्यावसायिक यश आणि त्याची वैयक्तिक गरिबी यांचा खेदपूर्वक उल्लेख तो वारंवार करायचा. त्यामुळे लेखन हीच खरी कालातीत संपत्ती आहे, असे निराशेने प्रतिपादन करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. त्याने डी आर्किटेक्चरा या आपल्या प्रबंधात वास्तुनिर्मितीच्या अनेक अंगांचा परामर्श घेतलेला आढळतो. वास्तूचे स्थान व मुखरचना (ओरिएंटेशन) कशी असावी, परिणामकारक ध्वनिसंयोजन (अकौस्टिक्स), अभिन्यास (प्लॅन) आणि मुखदर्शन (एलिव्हेशन) यांतील प्रमाणभूतता इ. अनेक बाबींवरील त्याचे अभ्यासपूर्ण भाष्य कायमचे अभ्यासनीय ठरले. या व्यतिरिक्त निसर्गशास्त्र, विज्ञान, गणित आणि संगीत या क्षेत्रातील त्याचा अभ्यास दांडगा होता. आपल्या ग्रंथामध्ये त्याने भूगोल, हवामान, भूमिती, यंत्र, समाजशास्त्र, वैद्यकशास्त्र, ध्वनिशास्त्र, यथादर्शन, खगोलशास्त्र इ. क्षेत्रांतील कोणते ज्ञान वास्तुनिर्मितीतील सर्जनशीलता आत्मसात करण्यासाठी आवश्यक आहे, याची सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याच्या मते उत्तम वास्तुनिर्मिती करायची असल्यास वास्तुतज्ञाने अशा बहुविध अभ्यासाने आपल्या संवेदना सर्वांगांनी विकसित करणे आवश्यक आहे. या ग्रंथराजाच्या पहिल्या भागात वास्तुकलेची मूलभूत माहिती आहे. दुसऱ्या भागात वास्तुसाहित्याविषयी चर्चा आढळते. तिसऱ्या भागात मंदिर-रचनांचे अभिन्यास आणि आयोनिक स्तंभरचनेची चर्चा आहे. चौथ्या भागात कॉरिंथियन, डोरिक, तस्कन इ. स्तंभरचनांची अभ्यासपूर्ण चर्चा आहे. पाचव्या भागात वास्तुप्रकारांविषयी सविस्तर विवेचन आहे. सहाव्या भागात ‘घर’ या वास्तुप्रकारावर विशेष विवेचन आढळते. सातव्या भागात अंतर्गत सजावट या विषयावर सर्वंकष चर्चा आहे. आठव्या भागात पाणीपुरवठा नवव्या भागात भूमिती, खगोलशास्त्र, घड्याळे तर दहाव्या भागात वास्तुशास्त्र आणि अभियांत्रिकी या संबंधात कोणती यंत्रे उपयोगी पडू शकतील, याचे विवेचन आढळते. पुढे प्रबोधनकाळापर्यंत व्हिट्रूव्हिअसचा हा ग्रंथराज या क्षेत्रातील आदर्श मानला जाई. या ग्रंथाची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत (उदा. लोब क्लासिकल लायब्ररी या ग्रंथमालेतील द्विखंडात्मक इंग्लिश भाषांतर, १९१४). 

दीक्षित, विजय