व्हिक्टोरिया, राणी : (२४ मे १८१९–२२ जानेवारी १९०१). युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची प्रसिद्ध राणी. नाव अलेक्झांड्रिना व्हिक्टोरिया. जन्म लंडनमधील केन्झिंग्टन पॅलेसमध्ये. वडील एडवर्ड ऑगस्टस (ड्यूक ऑफ केंट) आणि आई मेरी ल्यूइझा व्हिक्टोरिया. त्यांचे हे एकुलते एक अपत्य. एडवर्ड हा तिसऱ्या जॉर्ज राजाचा चौथा मुलगा, तर मेरी ल्यूइझा ही साक्स-कोबर्गच्या फ्रान्सिस या सरदाराची कन्या. व्हिक्टोरिया एक वर्षाची होण्यापूर्वीच तिचे वडील कर्जबाजारी अवस्थेत मरण पावले (१८२०). त्यामुळे तिच्या आईने तिचे संगोपन केले. ल्यूइझा लेहझेन नावाच्या जर्मन दाईचा लहानग्या व्हिक्टोरियाला विशेष लळा होता. २० जून १८३७ रोजी तिचे चुलते व ग्रेट ब्रिटनचे राजे चौथे विल्यम निधन पावले. त्यांची सर्व मुले अकाली वारल्यामुळे गादीला वारस नव्हता. त्यामुळे व्हिक्टोरियाकडे राजपद आले. २८ जून १८३८ रोजी तिचा विधिवत् राज्याभिषेक झाला. तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विल्यम लॅम (लॉर्ड मेलबर्न) सुरुवातीस तिचा मार्गदर्शक-सल्लागार होता. त्याने व्हिक्टोरियाला राज्यशासन आणि राजकारण यांचे धडे दिले. या दोघांतील संभाषणे द गर्लहुड ऑफ क्वीन व्हिक्टोरिया, १८३२-१८४० (१९१२) ह्या पुस्तकात संकलित केलेली आहेत.
व्हिक्टोरियाचा विवाह साक्स-कोबार्ग-गोथाचा राजपुत्र आणि तिच्या नात्यातला व प्रेमातला प्रिन्स ॲल्बर्ट ह्याच्याशी झाला (१० फेब्रुवारी १८४०). मेलबर्नच्या सूचनेवरून प्रिन्स ॲल्बर्ट हळूहळू राज्यकारभारात सहभागी होऊ लागला. व्हिक्टोरियाच्या जीवनात पती, शिक्षक, सचिव इ. नात्यांनी तो पूर्णपणे समरस झाला. ग्रेट एक्झिबिशन नावाचे एक भव्य प्रदर्शन प्रिन्स ॲल्बर्टच्या संयोजनाखाली इंग्लंडमध्ये भरवण्यात आले होते (१८५१). ॲल्बर्टपासून राणीला पाच मुली आणि चार मुलगे झाले. विवाहानंतर या शाही दांपत्याने निरनिराळ्या औद्योगिक नगरांना भेटी दिल्या.
⇨ रॉबर्ट पील (कार.१८४१-४६) पंतप्रधान असताना राणीच्या सहमतीने त्याने संरक्षित व्यापाराची पद्धत नियंत्रित करून अनेक जिनसांवरील जकात पूर्णत: काढून टाकली. त्यामुळे राष्ट्रीय कर्जाचा बोजा कमी झाला आणि कर कमी झाले. त्याने बँक ऑफ इंग्लंडची पुनर्रचना केली आणि आयर्लंडमध्ये काही सुधारणा केल्या. यानंतरच्या ⇨ चार्टिस्ट चळवळीत (१८४८) सार्वत्रिक मतदानाचा हक्क, गुप्त मतदानपद्धती, लोकवस्तीच्या प्रमाणात मतदारसंघ इ. मागण्या करण्यात आल्या. तसेच संसदीय सभासद होण्यासाठी घातलेली विशिष्ट संपत्तीची अट काढून टाकण्याचीही मागणी करण्यात आली. कालांतराने पार्लमेंटची वार्षिक निवडणूक सोडून अन्य मागण्या मान्य झाल्या. व्हिक्टोरियन राजकारणातील महत्त्वाची बाब म्हणजे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा ⇨ बेंजामिन डिझरेली आणि लिबरल पक्षाचा ⇨ विल्यम ग्लॅडस्टन यांच्यातील सत्तास्पर्धा होय. दोघेही प्रथम कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षात होते आणि पीलचे अनुयायी होते. धान्यावरील कर रद्द करण्याच्या धोरणामुळे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षात फूट पडली व डिझरेलीच्या नेतृत्वाखालील बहुतेक सदस्य लिबरल पक्षात सामील झाले. खुल्या व्यापाराला ग्लॅडस्टनने पाठिंबा दर्शविला. आपल्या कारकिर्दीत त्याने प्राथमिक शिक्षण, गुप्त मतदान व आयर्लंड इ. विषयांसंबंधी कायदे संमत करून घेतले. १८८४ साली त्याने तिसरा संसदीय सुधारणा कायदा संमत केला. त्यामुळे शेतमजूर व शहरी कामगार यांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला. व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत ⇨ लॉर्ड पामर्स्टन दोनदा पंतप्रधान झाला (१८५५-५८१८५९-६५) पण त्याची कार्यपद्धती तिला मान्य नव्हती तथापि जागतिक राजकारणात ब्रिटनला योग्य स्थान मिळाले पाहिजे, ही त्याची भूमिका तिला मान्य होती.
व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत तीन महत्त्वाची युद्धे झाली. त्यांपैकी चीनबरोबरच्या ⇨ अफूच्या युद्धात (१८३९-४२) इंग्लंडने २१० कोटी डॉलर नुकसानभरपाई व हाँगकाँग बंदर मिळविले. दुसरे युद्ध म्हणजे रशियाविरुद्धचे क्रिमियन युद्ध (१८५४-५६). (व्हिक्टोरिया सरोवर पेज नं५०१चे हेडर) या युद्धातच ⇨ फ्लॉरेन्स नाइटिंगेल हिने रुग्ण सैनिकांची शुश्रुषा करून रूग्णसेवेचा प्रेरक आदर्श निर्माण केला. नाइटिंगेलच्या कार्याला व्हिक्टोरियाचा पाठिंबा होता.पराक्रमी वीरांना ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हे मानचिन्ह देण्याची प्रथा ह्या युद्धापासूनच सुरू झाली. व्हिक्टोरियाच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील इंग्लिश वसाहत दृढतर करण्यासाठी ⇨ बोअर युद्ध (१८९९-१९०२) झाले आणि दोन्ही बोअर प्रजासत्ताकांचे ब्रिटिश प्रदेशात विलीनीकरण करण्यात आले.
हिंदुस्थानातील ⇨ अठराशे सत्तावनचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर हिंदुस्थानची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश संसदेकडे आली. त्या वेळी प्रसिद्ध झालेला ⇨ राणीचा जाहीरनामा ऎतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
प्रिन्स ॲल्बर्टचे १४ डिसेंबर १८६१ रोजी निधन झाले. पतिनिधनाचा हा आघात मोठा होता व त्यामुळे व्हिक्टोरियाच्या जीवनात काहीसा विरक्तपणाही निर्माण झाला.
ब्रिटिश संसदेने १८७६ साली राणीला ‘एंप्रेस ऑफ इंडिया’ (हिंदुस्थानची सम्राज्ञी) हा किताब बहाल केला. १८७५ मध्ये सुएझ कालव्यावर ब्रिटनचे प्रभुत्व राखण्याकरिता डिझरेलीने ईजिप्तच्या खेदिवाकडून भरपूर शेअर्स विकत घेतले आणि तो कालवा राणीला अर्पण केला. डिझरेलीच्या कृतीमुळेच सुएझ कालव्यावरील फ्रेंच नियंत्रणाचा धोका टळला.
राणीच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षांत रॉबर्ट आर्थर टॅलबट गॅसकॉइन सेसिल हा पंतप्रधान झाला (१८९५–१९०२). ह्यापूर्वीही तो दोनदा पंतप्रधान झाला होताच (१८८५-८६ १८८६-९२). त्याच्या कारकीर्दीत राणीचा अखेरचा काळ समाधानात गेला.
राणीच्या कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव (१८८७) व हीरक महोत्सव (१८९७) शाही थाटात साजरे करण्यात आले.
व्हिक्टोरिया गादीवर आली त्या वेळी ब्रिटिश जनतेत राजेशाहीबद्दल एकूण तिटकाराच होता, परंतु व्हिक्टोरियाने आपल्या धोरणाने व कर्तृत्वाने लोकांची मने जिंकली. ती स्वत: हुशार व कार्यक्षम होतीच तथापि तिला मेलबर्न, पील, पामर्स्टन, डिझरेली, ग्लॅडस्टन, सेसिल यांसारख्या कर्तबगार पंतप्रधानांची साथ लाभली, हा योगही महत्त्वाचा आहे.
व्हिक्टोरियाला कालोचित ऎतिहासिक भानही होते. त्यामुळे लोकशाही-युगातील राजेशाहीच्या मर्यादाही तिने ओळखल्या होत्या. त्यामुळेच तिने राज्ञीपदाची घटनात्मक, पण काहीशी औपचारिक सत्ता जाणून मोठ्या सामंजस्याने लोकनियुक्त पंतप्रधानांच्या द्वारे देशाची सर्वांगीण प्रगती साधली. त्यामुळे तिच्या कारकिर्दीत राजकारण, अर्थाकरण, कला, साहित्य, विज्ञान इ.सर्व क्षेत्रांत लक्षणीय प्रगती होऊन देशाला राजकीय स्थैर्य प्राप्त झाले. त्याचप्रमाणे जागतिक राजकारणातही ब्रिटनला अग्रेसरत्व प्राप्त झाले. तिच्या कारकिर्दीला ब्रिटनच्या इतिहासात ‘व्हिक्टोरियन युग’ ही गौरवास्पद संज्ञा प्राप्त झाली.व्हिक्टोरिया दैनंदिनी लिहीत असे. लीव्ह्ज फ्रॉम द जर्नल ऑफ अवर लाइफ इन द हायलँड्स (१८६८) व मोअर लीव्हज (१८८३) या पुस्तकांतून तिचा काही भाग प्रकाशित झाला. ऑस्बर्न येथे ती अल्पशा आजारानंतर निधन पावली.
संदर्भ : 1. Hibbert, Christopher, Queen Victoria in Her Letters, New York, 1985.
2. Nevill, St. John B. Ed. Life at the Court of Queen Victoria, Salem (N.H.), 1984.
3. Shearman, Dierdre, Queen Victoria, New York, 1985.
4. Weintraub, Stanley, Victoria : An Intimate Biography, New York, 1987.
कुलकर्णी, अ. र.