व्हिकुनाव्हिकुना : लामासारख्या या प्राण्याचा समावेश कॅमेलिडी (उंट) कुलात होतो [→ लामा]. त्याचे शास्त्रीय नाव व्हिकुना व्हिकुना असे आहे.व्हिकुनाचे चित्र मूळ पान ४९८उत्कृष्ट लोकरीसाठी तो प्रसिद्ध आहे. अँडीज पर्वतात ३,५००-४,७५० मी. उंचीवर, दक्षिण गोलार्धात १० ते २९ अक्षाशांच्या पट्ट्यातील २०८० चौ. किमी. क्षेत्रात तो आढळतो. त्यामध्ये पेरू, बोलिव्हिया, अर्जेंटिना व चिली या देशांत समावेश होतो.

व्हिकुनाचे डोके व शरीराची लांबी १·४५ ते १·६० मी., शेपटी सु. १५·२ से.मी. लांब, खांद्यापाशी उंची ७६ ते ८६ सेंमी. आणि वजन सु. ३५ ते ६५ किग्रॅ. असून, छाती व बाजूंवरील लोकर सर्वांत जास्त लांब असते. तिचा रंग पिंगट तपकिरी (सोनेरी) असून खालच्या बाजूवर पांढरा पट्टा असतो. लोकरीमुळे त्यास वातावरणाच्या तापमानातील बदल व उन्हापासून संरक्षण मिळते. व्हिकुना हा सामान्यपणे ग्वानाकोसारखा असतो. जिवंत समखुरी (पायांच्या खुरांची संख्या समान असलेल्या) प्राण्यांमध्ये याचे खालचे कृंतक दात (कुरतडून खाण्याचे दात) अनन्यसाधारण असून ते कायम वाढत असतात व त्याच्या एका बाजूवर एनॅमल असते. तो उंचावर आढळणारा प्राणी असल्याने हवेतील कमी ऑक्सिजनाच्या प्रमाणाशी समायोजनासाठी त्याच्या रक्तात तांबड्या पेशींचे प्रमाण जास्त (१४ दशलक्ष प्रती घन मिमी.) असते.

व्हिकुनाच्या १०-१५ माद्यांचा गट एकत्र प्रवास करतो व या गटात फक्त एक नर असतो. कंप पावणारा आवाज काढून हा नर माद्यांना धोक्याचा इशारा देतो. त्यांचे चरण्याचे क्षेत्र ठरलेले असून ते सु. १२ हे. असते व त्याचे रक्षण प्रमुख नर करतो. तो ताठ उभा राहतो आणि परप्राण्यावर हल्ला करून त्याला चावतो आणि त्याच्या अंगावर हवा व लाळमिश्रित फवारा उडवितो. ४५०० मी. उंचीवर ताशी ४७ किमी. वेगाने तो धावू शकतो. लोकरीतील धूळ झटकण्यासाठी व अंग खाजविण्यासाठी तो पायाचा उपयोग करतो आणि मग जमिनीवर लोळतो. त्याची नजर तीक्ष्ण असते. श्रवणशक्ती बेताची असते व घ्राणेंद्रिय कमी विकसित असते. त्याची चाल आकर्षक व डौलदार असते.

व्हिकुना खुरटे गवत, रसाळ रुंदपर्णी औषधी वनस्पती खाऊन जगतो व दोन दिवसांतून एकदा पाणी पितो. ते एका ठरावीक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करतात. समागमानंतर अकरा महिन्यांनी साधारणत: फेब्रुवारीमध्ये एक पाडस जन्माला येते. जन्मानंतर १५ मिनिटांत ते आपल्या पायांवर उभे राहाते व चालू शकते. ते १० महिन्यांचे होईपर्यंत आईचे दूध पिते. व्हिकुनाचे आयुष्य सु. १५ ते २० वर्षांचे असते.

व्हिकुनाची लोकर ही सर्वोत्कृष्ट समजली जाते. प्रत्येक व्हिकुनापासून वर्षाला सु. ११५ ग्रॅम लोकर मिळते. त्याच्या लोकरीचा धागा मजबूत, स्थितीस्थापक, मऊ, चमकदार असतो. त्याच्या लोकरीपासून भारी किमतीचे कोट, झगे व शाली तयार करतात. या प्राण्याला माणसाळविण्यात यश आलेले नाही. एकोणिसाव्या शतकात लोकर व मांसासाठी मोठ्या प्रमाणावर या प्राण्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे तो नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

जमदाडे, ज. वि.