व्हायटेसी : (द्राक्षा कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] हॅम्नेलीझ गणातील हे कुल असून ⇨ ऱ्हॅम्नेसी या दुसऱ्या कुलाशीही (बदरी कुलाशी) ह्याचे जवळचे नाते आहे. व्हायटेसीमध्ये सु. ११ प्रजाती व ६०० जाती (जे. सी. विलिस यांच्या मते १२ प्रजाती व ७०० जाती) असून त्यांची बहुधा आरोही (वर चढत जाणारी) झुडपे व क्वचित साधी सरळ झुडपे, विशेषकरून उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आढळतात. व्हायटिस ह्या शास्त्रीय नावाच्या प्रजातीतील तीस जातींचा समशीतोष्ण ते उपोष्ण कटिबंधांत प्रसार आहे. त्यांपैकी द्राक्षाची जाती इतिहासपूर्व काळात दक्षिण व मध्य युरोपात विखुरलेली होती. सध्या ती भूमध्य सामुद्रिक प्रदेशात व तेथून पूर्वेकडे कॉकेशस व उत्तरेकडे र्हा ईनच्या दरीत आढळते. तिच्या अनेक प्रकारांची आज अनेक देशांत मोठ्या प्रमाणात लागवड होत असून, आर्थिक दृष्ट्या ती फायदेशीर ठरते. व्हायटेसी हे कुलाचे नाव व्हायटिस ह्या प्रजाती नावावरून बनविले आहे. ह्या कुलातील वेली प्रतानांच्या (तंतूसारख्या तणावांच्या) साहाय्याने आधार घेतात. ही प्रताने व फुलोरे [→ पुष्पबंध] मुख्य अक्षाच्या रूपांतराने बनलेली असतात, खोड पेरेदार असून त्यातून सामान्यतः पाण्यासारखा रस निघतो. पाने संयुक्त (क्वचित साधी), एका आड एक आणि कधी खालची संमुख (समोरासमोर), हस्ताकृती किंवा पिच्छाकृती (पिसासारखी) असतात. पर्णतलाचे कधीकधी पापुद्र्यासारखे उपांग (उपपर्ण) बनलेले आढळते. फुले लहान, नियमित, हिरवट, द्विलिंगी किंवा एकलिंगी व अवकिंज असून ती परिमंजरीवर किंवा द्विपद (दोन देठांच्या) वल्लरींच्या [→ पुष्पबंध ] झुबक्यांवर येतात. संदले, प्रदले व केसरदले (पुं-केसर) इ. पुष्पदले चार-पाच आणि जुळलेली किंवा सुटी असतात. केसरांच्या तळामध्ये मधुरस-बिंब (गोड रस निर्माण करणारी ग्रंथी) स्पष्ट व कोनयुक्त किंवा पसरट असते. किंजदले (स्त्री-केसर) दोन ते आठ जुळलेली, किंजपुटात दोन ते आठ कप्पे व प्रत्येक कप्प्यात एक-दोन बीजके असतात. [→ फूल]. मृदुफळ पातळ रसयुक्त, एक ते सहा कप्प्यांचे असून त्या प्रत्येक कप्प्यात एक ते दोन कठीण आवरणाची बीजे असतात. पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश ) रेषाभेदित (अनेक रेषांनी विभागलेला) असतो. या कुलातील हाडसंधी, कांडवेल, आंबटवेल, द्राक्षवेल इ, वनस्पती औषधी आहेत.

पार्थेनोसिसस या प्रजातीतील जाती याच कुलातील असून व्हर्जिनिया क्रीपर (पा. क्विंक्वेफोलिया) शोभादायक संयुक्त पानांकरिता अमेरिकेत बागेत लावतात. या प्रजातीतील सर्वांच्या तणाव्यांना आसंजक बिंबे असतात. भारतात हिच्या तीन जाती असून त्यांपैकी दोन हिमालयात व एक सह्याद्रीत आढळते. पा. हिमालयाना ही हिमालयात आढळणारी ⇨ महालता सु. ३० मी. उंचीपर्यंत इतर वृक्षांवर चढत जाऊन पसरते, तिची जाडी सु. १५ सेंमी. होते. तिची पिवळी, नारंगी व लाल छटांची पाने शरद ऋतूत आकर्षक दिसतात. हिचे लाकूड गर्द तपकिरी, कठीण असून ते विविध प्रकारच्या किरकोळ उपयोगांसाठी वापरतात. फळे खाद्य असतात. इतर दोन भारतीय जाती गुणधर्मांत ह्यासारख्याच असतात. लीआ ही याच कुलातील आणखी एक प्रजाती असून हिच्या सु. ७० जाती आहेत. त्यांपैकी काही झुडपे असून बाकीच्या वेली आहेत. सर्व जाती प्रतानविरहित आहेत. यांचे मूलस्थान मलेशिया व भारत आहे.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.