व्हाग्नर, आडोल्फ हाइन्रिख गोट्हेल्फ : (१८३५-१९१७). समाजवादी विचारसरणीचे जर्मन अर्थशास्त्रज्ञ. गटिंगेन आणि हायड्लबर्ग विद्यापीठांत झाले. बर्लिन विद्यापीठासह अनेक जर्मन विद्यापीठांत त्यांनी अर्थशास्त्राचे अध्यापन केले. अधिकोषण (बँकिंग) आणि लोकवित्त-व्यवस्थेच्या क्षेत्रातील त्यांचा अधिकार जगन्मान्य होता. ते जर्मनीच्या ख्रिश्चन समाजवादी पक्षाचे सदस्य होते. निरनिराळ्या पातळ्यांवरील सरकारे देशातील लोकांचे आर्थिक कल्याण साधण्याच्या हेतूने स्वतःवरील जबाबदाऱ्यांमध्ये सतत वाढ करीत असतात, असा सिद्धांत त्यांनी मांडला. यालाच ‘व्हाग्नरचा नियम’ असेही म्हटले जाते.
व्हाग्नरच्या नियमाचा आशय असा की, निरनिराळ्या ऐतिहासिक कालखंडांत विविध देशांतील प्रागतिक समाजांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते, की केंद्रीय तसेच स्थानिक सरकारांनी अंगीकार-लेल्या कामांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सतत संख्यात्मक तशीच गुणात्मक वाढ होत आलेली आहे. कालप्रवाहानुसार अनेक नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याकडे जशी त्याची प्रवृत्ती असते, तशीच सध्या असलेल्या जबाबदाऱ्या अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्याकडेही त्यांचा कल असतो. आर्थिक विकास आणि सरकारी कामे यांच्यात असलेल्या फलन-संबंधांमुळे सरकारचे कार्यक्षेत्र हे आर्थिक विकासाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने वाढत जाते. परिणामी लोकांच्या आर्थिक गरजा सरकारांकडून अधिकाधिक समाधानकारकपणे भागविल्या जात असतात. कायदा व सुव्यवस्था राखणे, सांस्कृतिक आणि कल्याणकारी उपक्रम राबविणे व त्याचवेळेस औद्योगिक मक्तेदाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, अशा कामांसाठी सरकारी खर्च सातत्याने वाढत जातो, असे व्हाग्नर मांडतात. सरकारने आपले कार्यक्षेत्र मर्यादित ठेवावे. ह्या ⇨ ॲडम स्मिथ (१७२३-९०) यांच्यासारख्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मताशी नेमके विरोधात जाणारे मत व्हाग्नर ह्यांनी मांडलेले आहे. परंतु त्याला ऐतिहासिक अनुभवजन्य आधार असल्याने ते अधिक प्रभावी व प्रत्ययास येणारे आहे.
सरकारच्या खर्चातील वाढीच्या संदर्भात करारोपणाचा प्रश्नही स्वाभाविकपणेच पुढे येतो. उत्पन्नाची वाटणी आहे तशी टिकवायची असेल, तर उत्पन्नावरील कर प्रमाणशीर दराने लावला जावा हे संयुक्तिक आहे; परंतु वारसाहक्कामुळे किंवा बाजार-व्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे उत्पन्नाच्या वाटणीत निर्माण झालेली विषमता दूर करावयाची असल्यास प्रागतिक दरानेच उत्पन्नावर कर आकारले पाहिजेत, असे त्यांचे प्रतिपादन होते. उत्पन्नाच्या वाटणीतून निर्माण झालेली विषमता करारोपणाद्वारे दूर करता यावी, असे सुचविणारे व्हाग्नर हे कदाचित पहिलेच अर्थशास्त्रज्ञ असावेत.
हातेकर, र. दे.