व्यवसाय मार्गदर्शन : (व्होकेशनल गाइडन्स). व्यवसाय निवडण्यास, त्यात प्रवेश करण्यास अथवा त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्याकरिता दिले जाणारे साहाय्य व प्रक्रिया. अमेरिकेतील नॅशनल व्होकेशनल गाइडन्स असोसिएशनने वरील व्याख्या १९३७ मध्ये निश्चित केली. तत्पूर्वी १९२४मध्ये करण्यात आलेली व्याख्या व्यावसायिक क्षेत्रांची माहिती देणे व व्यवसाय निवडण्यास सल्ला देणे, यांपुरतीच मऱ्यादित होती.
फ्रँक पार्सन्झ या अमेरिकन समाजसेवकाने १९०५-०६ साली हे कार्य हाती घेतले. १९०८ साली त्याने पहिले व्यवसाय मार्गदर्शन केंद्र चालू केले. चूझिंग अ करिअर या पुस्तकात त्याने अशा कार्याची आवश्यकता प्रतिपादन केली. व्यवसायाची निवड करताना येणाऱ्या अडचणी, चुकीचा व्यवसाय निवडल्याने वाटणारे असमाधान, वाढत्या व्यवसायक्षेत्रांमुळे निर्माण होणारा संभ्रम इत्यादींचे विवेचन या पुस्तकात आहे.
अशा प्रकारची यंत्रणा सर्व देशांत असावी, अशी भूमिका आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने मांडली. मात्र प्रत्येक राष्ट्राची शासनपद्धती व शिक्षणपद्धती यांनुसार या यंत्रणेचे स्वरूप ठरते. जगातील बहुतेक सर्व प्रगत देशांनी व्यवसाय-मार्गदर्शनाची यंत्रणा निर्माण केली आहे.
व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी अनेक साधने व तंत्रे वापरावी लागतात. व्यक्तिवैशिष्ट्यांची नोंद करणे, शैक्षणिक व व्यावसायिक माहिती पुरविणे, मार्गदर्शनात्मक चर्चा करणे, व्यवसाय मिळवून देणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटणे व मार्गदर्शनविषयक समस्यांवर संशोधन करणे इ. विशिष्ट उपक्रम त्यासाठी राबवावे लागतात. मार्गदर्शनाचा मुख्य हेतू व्यक्तीला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जमवून घेण्याची क्षमता प्राप्त करून देणे हा आहे.
सामूहिक मार्गदर्शनाच्या तंत्रात एक मार्गदर्शक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना एकत्र जमवून त्यांच्या सर्वसाधारण समस्यांचे निरसन करतो. यातून परिचय वाढतो व परस्परसंबंधही घनिष्ट होतात. याचा फायदा वैयक्तिक चर्चा करताना होतो. सामूहिक मार्गदर्शनामुळे नाजूक व अवघड प्रश्न सुटण्यास मदत होते. या उपक्रमातून निरनिराळ्या शिक्षणसंस्थांबद्दल माहिती देणे सुलभ होते. त्या-त्या शिक्षणसंस्थांमध्ये प्रत्यक्ष जाऊनही ही माहिती देणे शक्य असल्यामुळे विद्यार्थ्यांना सांगोपांग व वस्तुनिष्ठ माहिती मिळते. अशा प्रकारची गरज माध्यमिक शालान्त परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिक असते. काही शिक्षणसंस्था अशा प्रकारचे खास कार्यक्रम आयोजित करतात.
व्यवसायाची निवड करणे व त्यात प्रावीण्य व यश मिळविणे यांसाठी उमेदवाराच्या व्यक्तिवैशिष्ट्यांना अनुरूप ठरणारा व्यवसाय आवश्यक असतो. यासाठी व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांची पारख करणाऱ्या विविध प्रकारच्या चाचण्या, कसोट्या किंवा परीक्षा गेल्या शतकापासून विकसित करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी आल्फ्रेड बीने यांची चाचणी, वेश्लर बेलेव्ह्यू चाचणी, मिनेसोटा लेखनिक चाचणी, मुंबईचे डॉ. पाठक यांची भाषिक-सामूहिक बुद्धिमापनाची तसेच डॉ. नाफडे यांची अभाषिक सामूहिक बुद्धिमापन चाचणी, पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेने तयार केलेल्या बुद्धिमत्ता चाचण्या यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. उमेदवाराची अंकव्यवहारशक्ती, शब्दार्थांचे ज्ञान, स्मरणशक्ती, तर्कबुद्धी, संवेदनशीलता, दिक्संबंधज्ञान इ. क्षमतांची चाचणी वेगवेगळ्या पद्धतींनी घेण्यात येते. व्यावसायिक शिक्षण व मार्गदर्शन यांत वरील क्षमतांना महत्त्व असते. [→ मानसिक कसोट्या].
शालेय अभ्यासक्रमातूनही विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करणे शिक्षकांना शक्य असते. अध्यापनकाळात दिवसाचे पाचसहा तास विद्यार्थी शिक्षकांच्या दृष्टीसमोर असल्यामुळे शिक्षकांना त्यांचे निरीक्षण करता येते व त्यांचा परिचय होऊ शकतो. व्यवसायिकविषयक योग्य शिक्षणक्रम निवडण्यासाठी शैक्षणिक पात्रता, विद्यार्थ्यांचे विविध पैलू इ. माहितीची गरज भासते. ही माहिती शिक्षक विविध प्रकारच्या नोंदी ठेवून मिळवू शकतात. विशिष्ट प्रसंगाची माहिती (ॲनेक्डोटल रेकॉर्ड) हे याचेच उदाहरण होय. या नोंदींवरून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विशेष माहिती मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या स्वभावविशेषांबद्दल माहिती नोंदविण्यासाठी पदनिश्चयन पद्धतीचा उपयोग करता येतो. एखाद्या विशिष्ट गुणविशेषात विद्यार्थ्यांचे स्थान काय आहे, हे यामुळे ठरविता येते. संकलित नोंद-पत्रिका (क्यूम्युलेटिव्ह रेकॉर्ड कार्ड) विविध माहिती ठेवण्याच्या कल्पनेतूनच उदयास आली. मनोविज्ञान चाचणी, प्रश्नावली, वैयक्तिक चर्चा, व्यक्तिवैशिष्ट्यांचा अभ्यास या सर्व साधनांनी मिळविलेली माहिती एकत्रित करण्याकरिता ही पत्रिका अतिशय उपयुक्त ठरते. तसेच विविध छंदांद्वारे विद्यार्थ्यांच्या अभिरुचीची कल्पना येऊन सर्व नोंदी या पत्रिकेत नोंदविता येतात. व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे यापेक्षा वेगळ्या तर्हेने मार्गदर्शन करू शकतात. अशा प्रकारची केंद्रे विविध प्रकारच्या बुद्धिमापन कसोट्या घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या त्या विषयांचे तज्ञ असल्यामुळे उमेदवारांना चांगले मार्गदर्शन होण्याची शक्यता असते.
भारतात व्यवसाय मार्गदर्शनाचे कार्य प्रथमतः १९८३ साली (कोलकाता विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात) चालू झाले. १९४५मध्ये पटणा विद्यापीठाने मानसशास्त्र विभागात हेच कार्य चालू केले. १९४७ साली उत्तर प्रदेश राज्य सरकारने अलाहाबाद येथे ब्यूरो ऑफ सायकॉलॉजी ही संस्था स्थापन केली. १९५४ साली केंद्र शासनाने ‘जनरल ब्यूरो ऑफ एज्युकेशनल अँड व्होकेशनल इन्स्टिट्यूशन्स’ ही संस्था स्थापन केली. १९५६ साली शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन समिती स्थापन झाली. १९५० साली राज्य सरकारने मुंबई येथे व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र सुरू केले. १९५७ साली पुणे व अहमदाबाद येथे व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्यात आली. आज महाराष्ट्र राज्यात पुणे व मुंबई येथे मार्गदर्शन केंद्रे असून प्रत्येक केंद्र विविध व्यवसायांची माहिती परिश्रमपूर्वक मिळवून प्रकाशित करते. तसेच ही माहिती संबंधितांना उपलब्ध करून दिली जाते. मानसशास्त्र अथवा शिक्षणशास्त्राच्या पदवीधारकांसाठी दिल्ली येथे शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन पदविका अभ्यासक्रम आयोजित करण्यात येतो.
पहा : बुद्धिमत्ता बुद्धिमान मुलांचे शिक्षण मानसिक कसोट्या.
संदर्भ : 1. Ansari, A. Psychological Testing, New York, 1964. 2. Getzels, J. W. Jackson, P. W. Creativity and Intelligence Explorations with Gifted Students, New York, 1962. 3. Robinson, E. A. G. The structure of Competitive Industry, Cambridge, 1959. 4. Terman, L. M. Merrill, M. E. Stanford Bindet Intelligence Scale, Boston, 1960.
चिपळूणकर, वि. वि. गोगटे, श्री. ब.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..