व्यपहरण : (किडनॅपिंग). व्यपहरण व अपहरण हे दोन्ही शब्द थोड्याबहुत फरकाने समानार्थी म्हणून वापरण्याचा प्रघात मराठी भाषेत रूढ होत आहे. तथापित सदरहू प्रघातास अनुसरून कायद्यामध्ये व्यपहरण ही मूळ संकल्पना मानून तिच्या कक्षेत मोडणाऱ्या ‘बालापहरण’ (किडनॅपिंग) व ‘प्रौढापहरण’ (ॲब्डक्शन) या दोन प्रकारच्या गैरकृत्यांचे विवेचन करण्यात आले आहे. व्यपहरणाची विधिसंकल्पना निरनिराळ्या देशांमध्ये अनेक शतकांच्या इतिहासात अत्यंत धिमेपणाने पण विविधतेने विकसित होत गेल्यामुळे व तिच्यामध्ये अंतर्भूत झालेल्या अनेक उपसंकल्पना या थोड्याबहुत प्रमाणात परस्परव्यापी (ओव्हरलॅपिंग) असल्यामुळे बालापहरण व प्रौढापहरण या संज्ञा शंभर टक्के अर्थवाही आहेत व त्यांच्या विवेचनात अर्थविसंगती किंवा संज्ञाविसंगती आढळणार नाही, अशी ग्वाही देता येणे शक्य नाही, ही गोष्ट पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल.

व्यपहरणाच्या संकल्पनेमध्ये अज्ञान व्यक्ती म्हणजे १६ वर्षांखालील मुलास, १८ वर्षांखालील मुलीस किंवा विकल मनाच्या व्यक्तीस तिच्या कायदेशीर पालकाच्या अधिरक्षेतून सदरहू पालकाच्या संमतीशिवाय पळवून नेणे, कोणाही व्यक्तीस देशाच्या सरहद्दीबाहेर पळवून नेणे किंवा कोणाही व्यक्तीस जबरदस्तीने किंवा कपटाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पाडणे किंवा प्रवृत्त करणे इ. निरनिराळ्या प्रकारच्या अपहरणांचा समावेश होतो. पूर्वीपासून सर्वत्र अज्ञान व्यक्तींना गुलामगिरी, भिक्षाव्यवसाय, अनैसर्गिक संबंध इ. उद्दिष्टांसाठी वापरण्याच्या हेतूने पळवले जात असे. या प्रकारांना बालापहरण असे संबोधण्यात येऊ लागले. किडनॅपिंग हा शब्द ‘किड’ म्हणजे बालक आणि ‘नॅपिंग’ किंवा ‘नॅबिंग’ म्हणजे चोरणे किंवा पळवून नेणे या दोन शब्दांच्या समासातून निर्माण झाला. पुढे जबरी विवाह, अनैतिक संबंध किंवा वेश्याव्यवसाय इ. कारणांसाठी तरुण स्त्रियांना पळवण्यात येऊ लागले. तसेच सज्ञान किंवा अज्ञान स्त्रीपुरुषांना खंडणीसाठी पळविण्याचा प्रकार रूढ होऊ लागला व आता असे प्रकार राजकारणाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर घडू लागले आहेत. अशा प्रकारचे अपहरण प्रौढापहरणाच्या गुन्ह्यात मोडते. जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये व्यपहरण किंवा अपहरण हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा समजला जात असून त्यासाठी दीर्घ मुदतीची सक्तमजुरी, आजन्म कारावास किंबहुना देहदंडाचीसुद्धा शिक्षा देण्याची तरतूद कायद्याने केलेली आहे. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या व चौथ्या दशकांमध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये व्यपहरणाचे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर झाले. याचे अतिशय ठळक उदाहरण म्हणजे हवाई जहाजाने अटलांटिक महासागर प्रथमच न थांबता पार करणाऱ्या चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग (१९०२-७४) या विक्रमवीराच्या मुलाचे खंडणीसाठी व्यपहरण करण्यात आले व त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातून तात्काळ बोध घेऊन अमेरिकन विधिमंडळाने अपहरणविरोधी कायदा करून अपहृत व्यक्तीस देशाच्या सरहद्दीबाहेर नेणाऱ्या गुन्हेगारास देहान्ताची शिक्षा देण्याची तरतूद केली (१९३२). जगात अनेक ठिकाणी राजकीय किंवा आर्थिक लाभाच्या हेतूने सज्ञान व अज्ञान व्यक्तींच्या अपहरणाचे गुन्हे घडत असतात.

भारतात व्यपहरणासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी प्रामुख्याने भारतीय दंडसंहितेच्या ३५९ ते ३६९ या कलमांमध्ये आढळतात. त्यांत व्यपहरणाच्या स्वरूपातील गैरकृत्याचे किंवा अवैध कृत्याचे ‘बालापहरण’ व ‘प्रौढापहरण’ अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आढळते. कलम ३५९ प्रमाणे ‘बालापहरणाचे’ दोन उपप्रकार केलेले आहेत. ते म्हणजे कोणाही व्यक्तीस भारताबाहेर पळवून नेणे किंवा अज्ञान व्यक्तीस कायदेशीर पालकाच्या अधिरक्षेतून पळवून नेणे. कलम ३६०मधील पहिल्या उपप्रकाराच्या व्याख्येप्रमाणे कोणाही व्यक्तीस तिच्या संमतीशिवाय किंवा ज्या व्यक्तीस तिच्यातर्फे कायदेशीर संमती देण्याचा अधिकार आहे, अशा व्यक्तीच्या संमतीशिवाय भारताबाहेर पळवून नेणे, हा बालापहरणाच्या पहिल्या उपप्रकाराचा गुन्हा ठरतो. कलम ३६१मध्ये बालापहरणाच्या दुसऱ्या उपप्रकाराची जी व्याख्या दिलेली आहे, तिच्याप्रमाणे कोणत्याही अज्ञान व्यक्तीस म्हणजेच १६ वर्षांखालील मुलास, १८ वर्षांखालील मुलीस किंवा विकल मनाच्या व्यक्तीस तिच्या कायदेशीर पालकाच्या अधिरक्षेतून सदरहू कायदेशीर पालकाच्या संमतीशिवाय पळवून नेणे हा बालापहरणाचा दुसरा उपप्रकार होय. पहिल्या उपप्रकाराला बालापहरण म्हणणे म्हणजे संज्ञा-विपऱ्यास होतो हे मान्य केलेच पाहिजे. कलम ३६२ मध्ये आढळणाऱ्या प्रौढापहरणाच्या व्याख्येप्रमाणे कोणाही व्यक्तीस जबरीने वा कपटाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पाडणे किंवा उद्युक्त करणे, हे प्रौढापहरणाचे गैरकृत्य ठरते.

बालापहरण व प्रौढापहरण या दोन प्रकारच्या व्यपहरणामध्ये पुढील प्रकारचा लक्षणभेद आढळतो : (१) बालापहरण हा स्वयंसिद्ध गुन्हा आहे. पण प्रौढापहरण हा स्वयंसिद्ध गुन्हा नसून एक गैरकृत्य किंवा अवैध कृत्य आहे. सदरहू गैरकृत्य दंडसंहितेमधील तरतुदींमध्ये निर्देश केलेल्या दुष्ट हेतूने केलेले असेल, तरच प्रौढापहरण हा गुन्हा ठरतो. (२) बालापहरण हे सामान्यतः अज्ञान व्यक्तीबाबत केले जाते, तर अज्ञान तसेच सज्ञान व्यक्तीचे अपहरण हे प्रौढापहरणाच्या गैरकृत्यात मोडते. (३) बालापहरणाच्या बाबतीत अज्ञान किंवा विकल मनाच्या व्यक्तीची संमती हा बचावाचा मुद्दा ठरू शकत नाही, तर प्रौढापहरणाच्या बाबतीत अपहृत व्यक्तीची संमती हा संपूर्णतया बचावाचा मुद्दा ठरू शकतो. (४) बालापहरणाच्या गुन्ह्यामध्ये अपहरणाच्या मागे दडलेल्या सुष्ट वा दुष्ट हेतूस कायदा फार महत्त्व देत नाही, तर प्रौढापहरण हे विनिर्दिष्ट दुष्ट हेतूने केल्यासच गुन्हा या सदरात मोडते.

भारतीय दंडसंहितेमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या व्यपहरणांसंबंधी भिन्नभिन्न शिक्षेच्या तरतुदी केलेल्या आढळतात. सामान्यतः एक मूलतत्त्व म्हणून असे म्हणता येईल की, व्यपहरणामागे उद्देश जितका जास्त गर्हणीय असेल, त्या प्रमाणात अधिक तीव्रतर शिक्षा देण्याची सोय कायद्याने केलेली आहे. उदा. बालापहरणाच्या दोन उपप्रकारांपैकी कोणत्याही उपप्रकाराचा गुन्हा केल्यास त्याबद्दल गुन्हेगाराला सात वर्षांची सक्तमजुरी अधिक दंड अशी शिक्षण देता येते (कलम ३६३), परंतु हेच बालापहरण जर अपहृत व्यक्तीस भिक्षा-व्यवसायासाठी वापरण्याच्या हेतूने केले असेल, तर त्यासाठी १० वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा देता येते [कलम ३६३ (अ)] . सदरहू उद्देशाने अपहृत केलेल्या व्यक्तीस जर गुन्हेगाराने अपंग बनविले असेल, तर त्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षाही देता येते [कलम ३६३ (अ)]. बालापहरण किंवा प्रौढापहरण जर अपहृत व्यक्तीचा खून करण्याच्या हेतूने केले असेल, तर त्यासाठी १० वर्षांपर्यंत सक्तमजुरी अधिक दंड किंवा देहान्ताचीही शिक्षा देता येते (कलम ३६४) पण तेच व्यपहरण जर अपहृत व्यक्तीला केवळ कोंडून किंवा बंदिस्त ठेवण्याच्या हेतूने केले असेल, तर त्यासाठी ७ वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा देता येते (कलम ३६५). कोणत्याही स्त्रीचे व्यपहरण जबरदस्तीने विवाह लावणे, अनैतिक संबंध करण्यास भाग पाडणे किंवा प्रवृत्त करणे इ. उद्देशाने केले असल्यास त्यासाठी १० वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा देता येते (कलम ३६६). तसेच अनैतिक संबंधासाठी वापरण्याच्या हेतूने कोणत्याही १८ वर्षांखालील एकद्देशीय मुलीचे अपहरण केल्यास किंवा सदरहू उद्दिष्टांसाठी परदेशातून २१ वर्षांखालील मुलीस भारतात पळवून आणले असल्यास किंवा कोणत्याही व्यक्तीस गुलामगिरी, गंभीर जखम करणे किंवा अनैतिक संबंधासाठी वापरणे या उद्देशाने अपहृत केले असल्यास, त्या गुन्ह्यांसाठी १० वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा देता येते  [कलम ३६६ (अ) आणि (ब) व ३६७] . तसेच १० वर्षांखालील अज्ञान व्यक्तीस तिच्या अंगावरील मौल्यवान वस्तू किंवा जंगम मालमत्ता चोरण्याच्या हेतूने पळवून नेल्यास सात वर्षांपर्यंत सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा देता येते (कलम ३६९).

पहा : अपहरण.

रेगे, प्र. वा.