वैज्ञानिक संशोधन : अनुभवाला आलेल्या घडामोडींचा खुलासा मिळविण्याची जिज्ञासा मनुष्याला स्वाभाविकच असते. उदा., शेजारच्या घरातील मूल रडले, तरी आपणास त्याचे कारण हवे असते व ‘त्याला चॉकलेट हवे होते, पण त्याचे दात खराब असल्याने ते दिले नाही’, हे समजले की आपण समाधान पावतो. हे एक संशोधनच आहे. पण सृष्टीतील, मानवी व्यापारापासून स्वतंत्र अशा, घडामोडींचा खुलासा देणारे जे संशोधन असते, त्याला स्थूलमानाने वैज्ञानिक संशोधन असे म्हणतात.    

सृष्टीतील घटनांचे निरीक्षण आपण करतो. त्या घटनाक्रमात काही घाट किंवा नियमितता आहे, असा होरा आपण बांधतो. त्या नियमानुसारच घटना घडतात का, याचा पडताळा आपण प्रत्यक्ष सृष्टीत किंवा प्रयोगशाळेच्या नियंत्रित परिस्थितीत घेतो. या पडताळणीवरून आपण बांधलेला होरा कसोटीला उतरला की त्यात काही सुधारणा करणे जरूरती आहे, याबद्दलचा निष्कर्ष आपण काढतो. ही वैज्ञानिक प्रक्रिया होय. या प्रक्रियेनंतर आपण आपले निष्कर्ष उपपत्तीच्या रूपात मांडतो. पण वैज्ञानिक उद्योग इतक्यावरच थांबतो, असे नाही. विज्ञानातून जे निष्कर्ष निघतात, त्यांचा उपयोग करून मनुष्याची सुखसाधने वाढविण्याचा प्रयत्न होतो. त्यासाठी नवी उपकरणे शोधून काढावी लागतात. हा तंत्रशास्त्राचा भाग होय पण त्याकडे विज्ञानाचे विस्तारीकरण म्हणूनही पाहता येईल. पूर्वीच्या काळी विज्ञानाचा आधार न घेताही तंत्रशास्त्र विकसित झाले, हे खरे आहे. पण यूरोपातील प्रबोधनयुगापासून विज्ञान व तंत्रशास्त्र यांचे साहचर्य स्वाभाविक मानले जाऊ लागले.

याचे एक उदाहरण असे देता येईल. विद्युत चुंबकीय लहरींचे औपपत्तिक अस्तित्व ⇨जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी १८६४ साली वर्तविले. त्यांचे प्रत्यक्ष अस्तित्व ⇨हाइन्‍रिख रूडोल्फ हर्ट्‌झ या शास्त्रज्ञानी १८८८ साली प्रयोगाद्वारे सिद्ध केले. हा जो उपक्रम झाला, त्याला विद्युत चुंबकीय लहरींचे अनावरण म्हणता येईल. तथापि या लहरींचा संदेशवहनासाठी उपयोग करण्याची युक्ती ⇨मार्केझे गूल्येल्मो मार्कोनी यांना सुचून १८९४ साली त्यांनी संदेश-प्रक्षेपणाचे उपकरण सिद्ध केले. याला नवसृजन (इन्व्हेन्शन) असे म्हणतात. येथे तंत्रशास्त्राने विज्ञानाचे कार्य पुढे नेले. वैज्ञानिक संशोधनातून निसर्गाची सामर्थ्ये मनुष्याच्या सुखासाठी वापरण्याचे तंत्र हाती लागल्याने ध्यानात आल्याने ⇨ फ्रान्सिस बेकन (१५६१–१६२६) यांनी तत्कालीन ब्रिटिश शासकांना सूचना केली होती की, वैज्ञानिक संशोधनाला शासकीय उत्तेजन मिळाले पाहिजे. वैज्ञानिक संशोधनातून परिणामकारक शास्त्रास्त्रे उपलब्ध होतात, हे ध्यानाय आल्यावर राज्यकर्त्यांनी आपापल्या राज्यात संशोधन संस्था निर्माण केल्या.

दुसऱ्या  महायुद्धानंतर (१९३९–४५) विराट स्वरूपाच्या देशी व आंतरदेशीय खाजगी उद्योगसंस्था निर्माण झाल्या. तंत्रज्ञान गुंतागुंतीचे होऊन संशोधनासाठी फार खर्च होऊ लागला. नवीन संशोधनातून नवी उत्पादने बाजारात आणावयाची व स्पर्धकांना मागे पाडायचे, अशी चढाओढ उद्योगसंस्थांतून सुरू झाली. त्यामुळे खाजगी उद्योगांनीही संशोधन संस्था किंवा विभाग निर्माण केले. औषधे, शस्त्रास्त्रे, संगणक यांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगसंस्थांनी संशोधन व्यवसायात फार मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यास सुरूवात केली.

उपपत्तीचा शोध : वैज्ञानिक उपपत्ती कशा निर्माण होतात, या विषयीची सामान्य समज ही आहे की, प्रथम निरीक्षणांचा एक संच वैज्ञानिकांसमोर असतो. त्या निरीक्षणावरून वैज्ञानिक एक अभ्युपगम किंवा गृहीतक बसवितो. तिसऱ्या टप्प्यावर या अभ्युपगमापासून सृष्टीतील घटनांविषयी काही अंदाज वर्तविला जातो. हा अंदाज खरा ठरला, तर तो अभुपगम नियम म्हणून स्वीकारला जातो. तथापि जवळून कोठून येतात? ती गोळा करताना निवडीचे कोणते निकष वापरलेले असतात? कोणत्याही निरीक्षणाला स्वत:चे असे काही मूल्य असत नाही तर ज्या हेतूने आपण निरीक्षण गोळा करतो, त्या हेतूतून निरीक्षणाला महत्त्व प्राप्त होते आणि हा हेतू कोणत्या तरी आधी अस्तित्वात असलेल्या उपपत्तीच्या अनुषंगाने ठरलेला असतो.

पुढचा भाग असा की, निरीक्षणांपासून अभ्युपगम कसा ठरवितो येतो? अनेक विचारवंतांना वाटत होते की, विगमनाच्या साहाय्याने हा अभ्युपगम बसविता येतो. तथापि ही प्रक्रिया इतकी सोपी असत नाही. वैज्ञानिकाच्या प्रतिभेचा यात मुख्य वाटा असतो आणि प्रतिभेचे कार्य नक्की कसे चालते याबद्दल अनेक विकल्प देणाऱ्या उपपत्ती आहेत.

वरील प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यावर अभ्युपगमापासून अंदाज वर्तविला जातो, असे म्हटले आहे पण हा अंदाज व अभ्युपगमापासून स्वीकार्यता किंवा त्याज्यता निश्चित करणारे निरीक्षण यांच्यातील नाते स्पष्ट असतेच असे नाही. त्यातून अभ्युपगमाची त्याज्यता नक्की करणारे निरीक्षण कोणते हे सांगता आले तरी अभ्युपगमाला अनुकूल अशा निरीक्षणामुळे अभुपगम स्वीकार्य होतो, असे म्हणता येणार नाही.

वर दिलेली प्रक्रिया आणि तिच्यावरील टीका यांच्यापासून नवीन उपपत्ती कशा पुढे येतात, याविषयी काही कल्पना आपणास उपलब्ध होतात. संशोधनाचा प्रवास प्राथमिक उपपत्तीपासून सुधारित उपपत्तीकडे होत असतो. कारण निरीक्षण हे कोणत्या तरी उपपत्तीच्या संदर्भातच उपलब्ध होत असतो. समजा की, उ ही उपपत्ती आहे व ती न या निरीक्षण संचातील निरीक्षणाच्या खुलासा देते. अशा स्थितीत त हे एक निरीक्षण पुढे आले आहे. या निरीक्षणाच्या पुरस्कर्त्यांचा असा दावा आहे की, त चा समावेश न या निरीक्षण-संचात झाला पाहिजे. पण उ ही उपपत्ती त चा खुलासा देऊ शकत नाही. या टप्प्यावर प्र हा वैज्ञानिक प्रश्न उभा राहतो व त्याच्या उत्तरासाठी जो प्रयत्न होतो, त्यातून नवीन उपपत्तीच्या शोधाला अवसर सापडतो. 

येथे अनेक प्रश्न पुढे येतात : त चा समावेश न या संचात आला पाहिजे, हा दावा का मान्य करायचा? उ ही उपपत्ती त चा खुलासा करत नाही, हे कोणी ठरवायचे? त हे निरीक्षण कोणत्या तरी ऊ या उपपत्तीच्या मार्गानेच वैज्ञानिकासमोर आले असणार म्हणजे त चा खुलासा करणारी उपपत्ती हजर आहे. मग उ नेच त चा खुलासा करावा हा आग्रह का? समजा प्र चे काही उत्तर एखाद्या वैज्ञानिकाने स्वतःपुरते शोधून काढले तर त्यावर मान्यतेचा शिक्का कोणी उठवावयाच? आणि असा शिक्का मिळालाच पाहिजे, हा आग्रह कशासाठी? या सर्व प्रश्नांचे उत्तर असे आहे की, वैज्ञानिक प्रश्न हा केवळ कल्पनेचा खेळ नाही किंवा तो प्रश्न कोणत्या तरी पोकळीत निराकार तरंगतो आहे, असेही नाही. विज्ञानाची एक परंपरा आहे व त्या परंपरेचे पाईक असणाऱ्या वैज्ञानिकांचा एक समाज आहे. प्र हा त्या परंपरेच्या संदर्भात निर्माण झालेला प्रश्न आहे. उ व ऊ या दोन्ही उपपत्ती त्या विज्ञानपरंपरेच्या भाग आहेत. प्र या प्रश्नाची वैज्ञानिकांनी व्यक्तीश: सुचविलेली उत्तरे वैज्ञानिकांच्या समाजाने मान्य करावयाची आहेत.

प्र हा प्रश्न सोडविण्याचे अनेक मार्ग वैज्ञानिकासमोर उपलब्ध असतात. उदा., ऊ या उपपत्तीने प्र मधील सर्व निरीक्षणांचा खुलासा होतोच असे दाखवायचे व शिवाय त चाही खुलासा होतो, म्हणून ऊ ही उपपत्ती उ पेक्षा व्यापक आहे, असे मानावयाचे किंवा उ मध्ये अध्याह्रत असलेला पण स्पष्टपणे न मांडलेला असा नियम किंवा प्रमेय पुढे आणावयाचे की, ज्यामुळे एक तर त हे निरीक्षण प्र मध्ये येण्याला बंदीच व्हावी किंवा त्याचा खुलासा मिळावा. असेच आणखीही पर्याय सांगता येतील.

वरील सर्व विवेचन केवळ तर्कशास्त्राच्या आधारे केले आहे. उ या उपपत्तीतील विधाने व त जे निरीक्षण सांगणारे विधान यांत केवळ निगामी तर्कशास्त्रात बसणारे नाते आहे, असे येथे मानले आहे. तथापि येथेही वैज्ञानिकाच्या प्रतिभेला महत्त्वाची भूमिका पार पाडावयाची आहे. उदा., उ या उपपत्तीतील अध्याह्रत प्रमेय उजेडात आणणे, हा केवळ तर्काचा खेळ नाही, त्यासाठी प्रतिभेची आवश्यकता आहे.  

येथे जे विवेचन केले आहे, त्याला वैज्ञानिकाने स्वत:साठी प्र या प्रश्नाचे उत्तर कसे शोधून काढले, याचे काहीसे वर्णन केले आहे. याला संशोधनातील अनावरणाची बाजू (कॉटेक्स्ट ऑफ डिस्कव्हरी) असे म्हणतात. पण वैज्ञानिकाने शोधून काढलेले हे उत्तर वैज्ञानिक समाजाने स्वीकारावे लागते. प्रश्नाची सोडवणूक केवळ तर्काधारे होत असती, तर वैज्ञानिक समाजाची मान्यता आपापत: मिळाली असती. पण त्या उत्तराच्या शोधात प्रतिभेची महत्त्वाची भूमिका असल्याने ही मान्यता सहजी मिळत नाही. शोधाला मान्यता कधी मिळते याला शोधाची ‘मान्यतेची बाजू’ (कॉटेक्स्ट ऑफ जस्टिफिकेशन) असे म्हणतात.


विसाव्या शतकाचा पूर्वार्ध होऊन जाईपर्यंत विचारवंतांची अशी समजूत होती की, वैज्ञानिक वादविवाद हे इतर क्षेत्रांतील वादविवादांपेक्षा वेगळ्या पद्धतीने होतात. प्रत्येक बाजू आपले म्हणणे चोख पुराव्यावर आधारलेल्या तार्किक विवेचनातून मांडत असल्याने ज्याच्या युक्तिवादात गफलत असेल, ती बाजू लंगडी पडली, हे सहजच सिद्ध होईल. सारांश, वैज्ञानिक निर्णयात केवळ तार्किक युक्तिवादाला स्थान आहे. तथापि, गेल्या पन्नास वर्षात असा मतप्रवाह आहे की, वैज्ञानिक क्षेत्रातील वादही इतर क्षेत्रांतील वादांप्रमाणेच तर्कशुद्धतेखेरीज भावनांना आवाहन, पुराव्याच्या मांडणीतील चलाखी, सोयीस्कर उदाहरणे यांच्या साहाय्याने केले जातात अशा वादांत ठरणारे निर्णय अंतिम असतातच असे नाही.

याबाबतीत ⇨ हार्लो शॅप्ली आणि हेबर कर्टिस या दोघा खगोलशास्त्रज्ञांत एप्रिल १९५० मध्ये आकाशगंगेचा आकार व मळसूत्री अभ्रिकांचे स्वरूप या विषयावर जो वाद झाला, त्याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. या वादात निरीक्षणांचा स्वरूपात जो पुरावा मांडण्यात आला, तो दोन्ही बाजूंना मान्य होता पण त्यातून निघणाऱ्या सहा निष्कर्षांबद्दल दोघांत परस्परविरोधी मते होती. वादाचा निर्णय पूर्णपणे शॅप्लीच्या बाजूने झाला, पण पुढे जी अधिक सूक्ष्म निरीक्षणे जास्त सामर्थ्यशाली दुर्बिणीतून घेण्यात आली,  त्यावरून असे समजून आले की, जवळजवळ प्रत्येक मुद्याबाबत शॅप्ली यांचे युक्तिवाद चुकीचे होते आणि कर्टिस यांचे दावेच बरोबर होते.

अशा ऐतिहासिक उदाहरणांवरून अशा मताला जोर चढत आहे की, वैज्ञानिक संशोधनाचा विचार करताना युक्तिवादाच्या तार्किक अंगाबरोबरच त्या वेळच्या वैज्ञानिक समाजाचे समाजशास्त्र, विज्ञानाचा इतिहास, त्या काळातील राजकीय मतप्रवाह यांचाही विचार झाला पाहिजे.

तंत्रशास्त्रीय शोध : सध्याच्या काळात तंत्रशास्त्राला अनुप्रयुक्त विज्ञान असे म्हणावे लागेल. वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेऊन मनुष्याला उपयोगी अशी उपकरणे तयार करणे, हे काम तंत्रशास्त्रात होते. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत कारखाने, विद्युत्-पुरवठा, इंधन-वायू, नवनवीन औषधे इत्यादीकांच्या द्वारे तंत्रशास्त्रीय उत्पादनांनी आपले जीवन व्यापले आहे व मोठ्या प्रमाणात बदललेही आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक व माहिती-तंत्रज्ञान यांच्या प्रगतीमुळे मानवी व्यवहाराचे रूप पालटून गेले आहे व त्याचे सांस्कृतिक परिणाम काय होतील, याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे.  

तंत्रशास्त्रीय शोधांसाठीदेखील प्रतिभेची गरज असते. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत प्रतिभाशाली तंत्रज्ञ आपल्या एकट्याच्या बुद्धिसामर्थ्याने क्रांतिकारक तांत्रिक शोध लावीत. ⇨ टॉमस आल्वा एडिसन (१८४७-१९३१) यांनी केवळ विद्युत्-दीपाचाच शोध लावला नाही, तर विजेचे उत्पादन, पुरवठा आणि त्या माध्यमातून अर्थोत्पादन या सर्वांनी युक्त असा नवा उद्योगच स्थापन केला. ⇨ अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी १८७६ साली दूरध्वनियंत्र शोधून काढले पण तितक्याने भागले नाही. दूरध्वनियंत्रणेचे जाळे शहरा-शहरांतून उभे करावे लागले.

नवा शोध लावून तंत्रज्ञाला थांबून चालत नाही. नवा शोध ग्राहकांपर्यंत पोहोचावा लागतो आणि नव्या उपकरणाची गरज निर्माण करावी लागते. खरे प्रयत्न या विक्रीमोहिमेसाठी करावे लागतात. कधीकधी असेही होते की, उद्योजक व समाज नवीन शोधाविषयी उत्साही नसतो. उदा., बोलपट करण्याचा शोध १९२२ सालीच लागला. पहिला बोलपट त्या वर्षी तयार झाला, पण १९३० उलटेपर्यंत चित्रपटव्यवसायाला बोलपट तयार करण्याचा उत्साह नव्हता. जेट एंजिनाचा शोध ⇨सर फ्रँक व्हिटल या शास्त्रज्ञांनी १९२८ सालीच लावला, पण विमान-व्यवसायाला त्या शोधाचे महत्त्व कळण्यासाठी आणखी ३० वर्षे जावी लागली. म्हणूनच तांत्रिक शोधाला व्यवसायाचे पाठबळ लागते. १९५०नंतरच्या काळात व्यवसायाचे स्वरूप पूर्णपणे पालटून गेले आहे. दळणवळणाच्या नव्या साधनांमुळे राष्ट्रांच्या व संस्कृतींच्या सीमा ओलांडून व्यवसाय आंतरराष्ट्रीय बनले आहेत. त्यामुळे नवीन शोधांना व्यवसायांकडून स्वीकृत होण्याची वाट पाहावी लागतेच असे नाही. व्यवसाय आता स्वत: संशोधनकार्यात उतरतात आणि नवीन उत्पादने तातडीने बाजारात आणण्याची त्यांची धडपड असते. जीवतंत्रज्ञान क्षेत्रातील अलीकडील महत्त्वाचा शोध म्हणजे क्लोनचा शोध म्हणजेच ⇨ कृत्तक याचा. या स्पर्धेत औषधांशी संबंधित अनेक व्यवसाय, दुग्धव्यवसाय व इतर उद्योग उतरले. त्यांनी निरनिराळ्या विद्यापीठांतील जीवतंत्रज्ञांना आपल्याकडे नोकरीला ठेवून त्यांना ‘प्रयोगशाळा’ ही सुविधा उपलब्ध करून दिली. याबाबत किमान तीन निरनिराळ्या देशांत शास्त्रज्ञ संशोधन करण्यात मग्न होते. त्यातून १९९७ साली डॉली या ‘कृत्तक’ मेंढीचा जन्म झाला.

सांघिक प्रयत्नांचे महत्त्व ध्यानात ठेवूनही वैयक्तिक प्रतिभेचे प्राथम्य मानलेच पहिजे. निरनिराळ्या संशोधकांची चरित्रे अभ्यासली, तर असे आढळते की, त्यांच्या ठिकाणी दुर्दम्य चिकाटी, बळकट आशावाद, अभिजात दृष्टिकोन, सखोल चिंतन, अफाट कल्पनाशक्ती व नावीन्याचा हव्यास असे गुण असतात व त्यामुळेच त्यांना यश लाभते.

संशोधक जेव्हा व्यक्तिश: संशोधन करीत व संशोधनासाठी लागणारा पैसा स्वत:च मिळवीत, तेव्हा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असे. एकोणिसाव्या शतकात या प्रकारची संशोधन-प्रणाली होती, त्या वेळी शास्त्रज्ञांची धारणा अशी असे की, या स्वातंत्र्यामुळेच आपले संशोधन सिद्धीस जाते. संशोधनाचे व्यावसायिकरण झाल्यापासून संशोधकांचे व्यक्तिगत संशोधनस्वातंत्र्य काही प्रमाणात संकुचित होणे अपरिहार्य होते. निधी पुरविणाऱ्या संस्था शास्त्रज्ञांच्या संशोधनावरच नव्हे, तर ते संशोधन प्रसिद्ध करण्यावरही नियंत्रण ठेवतात. तथापि पूर्वग्रह व पारंपरिक विचार यांपासून शास्त्रज्ञाने स्वत: घ्यावयाचे स्वातंत्र्य हे सर्वांत फलदायी होय. त्यामुळे कधीकधी असे आढळते की, नामांकित तंत्रशास्त्रज्ञ अगदी निराळ्याच व्यवसायात काम करीत असताना छंद म्हणून चांगले शोध लावून जातात.

ज्यात पैशाची मोठी गुंतवणूक करावी लागते व ज्यातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता असते, अशा स्वरूपाचा संशोधन हा व्यवसाय आहे, हे कळल्यापासून त्या संशोधनावर संशोधकाचा व त्याच्या प्रायोजकाचा हक्क अबाधित राहील, अशी कायदेशीर व्यवस्था करणे प्राप्त झाले. त्यामुळे निरनिराळ्या देशांनी एकस्वांचे कायदे केले आहेत. १९९१ साली आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेने सदस्य देशांत एक करार घडवून आणला आणि मूळ संशोधकाला व त्याच्या प्रायोजकाला जेव्हा जेव्हा त्याच्या शोधाचा उपयोग केला जाईल, तेव्हा स्वामित्व-मूल्य मिळेल अशी तरतूद केली.

एकविसाव्या शतकात संशोधनाची नवी दालने प्रतिभावंतांसाठी खुली होतील. जैवतंत्रज्ञान, जैव अभियांत्रिकी या विषयांत नवे शोध लागून त्यांच्या उपयोजनांतून नवी कृषि-उत्पादने व मांस-उत्पादने निर्माण होण्याची शक्यता आहे. आजवर ज्या रोगांनी उपायांना दाद दिलेली नाही, अशा कर्करोग, संधिवात, एड्स, मधुमेह इत्यादींवर प्रभावी औषधे निघतील. पोलिओ, हिवताप, देवी अशांसारखे व्यापक लागणीचे रोग नाहीसे होतील. अवकाश अन्वेषणाच्या क्षेत्रात अपूर्व प्रगती होऊन जवळच्या ग्रहांशी सुनिश्चित दळणवळण शक्य होईल. आजवरची प्रगती निसर्गाची पिळवणूक करून झाली. आता पर्यावरणाशी मैत्री राखून विज्ञान उत्कर्षाकडे जाईल.

संशोधनांचे संघटित स्वरूप : वैज्ञानिक व तंत्रशास्त्रीय संशोधनाला आता व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, पण यापूर्वीदेखील शास्त्रज्ञांच्या संघटना होत्या व त्या शोधनियतकालिकांद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटी किंवा परिषदा घडवून शास्त्रज्ञांच्या गाठी घालून देत होत्या. तथापि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून संशोधन व त्याचे उपयोजन यांना संघटित स्वरूप देण्याचे पद्धतशीर प्रयत्न झाले. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने विज्ञान व तंत्रविद्या या दोहोंच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या. आज जगातील औद्योगिकदृष्ट्या सर्वांत जास्त प्रगत अशा राष्ट्रांत भारताची गणना केली जाते. भारतातील विज्ञान व तंत्रविद्याविषयक प्रगतीचा व संशोधनाचा आढावा मराठी विश्वकोशात ‘भारत’ या नोंदीत घेण्यात आला आहे. यांखेरीज भारतीय वैज्ञानिक संशोधन संस्थांची कार्ये, संशोधनाचे स्वरूप यांची विषयावर माहिती मराठी विश्वकोशात ‘वैज्ञानिक संस्था व संघटना’ या नोंदीत देण्यात आली आहे. भारतातील व जगातील प्रमुख वैज्ञानिक संस्था व संघटना यांवरही मराठी विश्वकोशात यथास्थळी स्वतंत्र नोंदी आहेत. उदा.  रॉयल सोसायटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, भाभा अणुसंशोधन केंद्र वगैरे.

पहा : औद्योगिक संशोधन कृषि संशोधन तंत्रविद्या प्रयोग प्रयोगशाळा विज्ञान वैज्ञानिक संस्था व संघटना शास्त्रीय उपकरणे.

संदर्भ : १. Grummeck and others, On Scientific Discovery, London, १९७७.            २. Popper, K. R. The Logic of Scientific Discovery, London, १९७२.            ३. आपटे, मोहन, शतक शोधांचे, पुणे, २०००.            ४. फोंडके, बाळ, विज्ञान परिक्रमा, मुंबई, १९९०.

 भावे, श्री. मा.