वैदूर्य : (बेरील). बेरिलियमाचे सर्वांत सामान्य खनिज. स्फटिक षट्कोणी, प्रचिनाकार (→ स्फटिकविज्ञान). याचे ०·५ ते ३० सेंमी. व्यासाचे सुटे स्फटिक, स्फटिकांचे गट व अनियमित पुंज आढळतात. याचे प्रचंड आकारमानाने स्फटिकही आढळले आहेत. स्फटिकांवर उभ्या रेषा (किंवा खोबणी) असल्याने त्यांचे फलक (पृष्ठभाग) खडबडीत असतात. ⇨पाटन : (०००१) अस्पष्ट रा. सं. A12 (Be3Si6O18) : यात लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम व सिझियम या अल्कली धातू विविध प्रमाणांत (वजनी ५ ते ८ टक्क्यांपर्यंत) असू शकतात व त्यातील पाण्याच्या रेणूचे वजनी प्रमाण २·५ टक्क्यांपर्यंत असू शकते. कठिनता ७·५ ते ८ मोस. वि. गु. २·७–२·९ (यातील अल्कली धातूंच्या प्रमाणानुसार वाढते). चमक काचेसारखी पारदर्शक ते अपारदर्शक [→ खनिजविज्ञान].
शुद्ध वैदूर्य रंगहीन असून त्याला गोशेनाइट म्हणतात. यातील अल्युमिनियमच्या जागी लेशमात्र प्रमाणात लोह, क्रोमियम, मॅंगॅनीज व इतर धातू येतात. या अशुद्धीमुळे वैदूर्याला विविध रंगछटा येतात व त्यांनुसार त्याचे प्रकार होतात. अगदी फिकट छटांचे वैदूर्य हे क्वॉर्ट्झ किंवा ॲपेटाइट असावे, असा गैरसमज होऊ शकतो. मात्र वैदूर्याच्या स्फटिकांचा षट्कोणी आकार व रंगछटा यांमुळे तसेच ॲपेटाइटापेक्षा ते अधिक कठीण असल्याने ते वेगळे ओळखू येते.
वैदूर्य अम्लात विरघळत नाही. ते १·२००° से. पेक्षा अधिक तापमानापर्यंत व ८ किलोबार एवढ्या दाबाला स्थिर राहते. यापेक्षा उच्च तापमानाला वैदूर्य वितळून विपुल सिलिका असणारा द्रव निर्माण होतो. त्यात फेनॅसाइट (Be2SiO4) व ⇨क्रिसोबेरील ही खनिजे असतात. सजल स्थितीत ३00० से. पेक्षा कमी तापमानाला वैदूर्याचे विघटन होऊन विविध खनिजे (उदा. बर्ट्रांडाइट, फेनॅसाइट, केओलिनाइट व शुभ्र अभ्रक) तयार होतात.
वैदूर्य पुष्कळ खडकांत गौण खनिज म्हणून आढळते. मुख्यत ग्रॅनाइट व त्याच्याशी निगडित असलेले व जलतापीय (तप्त पाण्याच्या) क्रियेने बदल झालेले खडक यांच्यामध्ये वैदूर्य आढळते. ग्रॅनाइट पेग्मटाइट हा खडक व त्याच्या भित्ती हा वैदूर्याचा मुख्य उद्गम असून ते पट्टिताश्म व अभ्रकी सुभाजा यांतही गौण खनिजाच्या रूपात आढळते. विरलपणे आढळणार्याद मूलद्रव्यांची स्पॉड्युमीन, लेपिडोलाइट व तोरमल्ली ही खनिजे विपुल प्रमाणात असणाऱ्या. जटिल पेग्मटाइटात अल्कली धातू विपुल असलेले वैदूर्य विखुरलेले आढळते. अल्कली धातूंचे प्रमाण कमी असलेले वैदूर्य साधे पेग्मटाइट, तसेच कथिल व टंगस्टन यांचे निक्षेप आणि जलतापीय शिरा यांत आढळते.
वैदूर्याचे रत्नरूपातील अनेक प्रकार आहेत. उदा., गडद हिरवे एमराल्ड म्हणजे पाचू, निळे ॲक्वामरीन, गुलाबी ते तांबडे मॉर्गॅनाइट आणि पिवळे हेलिओडॉर व सोनेरी वैदूर्य. बहुतेक पाचू व काही ॲक्वामरीन हे पेग्मटाइटांच्या शिरांत, तर माणकासारखे लालभडक मॉर्गॅनाइट हे रायोलाइटात आढळते. पाचूशिवाय वैदूर्याचे इतर रत्न प्रकार बहुधा पेग्मटाइटांतील कुहरांत (पोकळ्यांत) आढळतात. याच्या क्रिसोबेरील किंवा लसण्या या प्रकारात मांजराच्या डोळ्यांप्रमाणे फिरती चमक दिसते. [→ रत्ने].
ब्राझीलमध्ये वैदूर्याचे सर्वाधिक उत्पादन होते. याशिवाय रशिया (उरल पर्वत, सायबीरियातील स्वर्डलॉफस्क), मॅलॅगॅसी, अमेरिका (न्यू इंग्लंड, कॅलिफोनिर्यया, नॉथॅ कॅरोलायना), ऑस्ट्रिया, ईजिप्त, कोलंबिया (मूर्सो, चिव्हार), अर्जेंटिना, रुआंडा, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका, झाईरे, नामिबिया, युगांडा, मोझॅंबिक, श्रीलंका, ऱ्होडेशिया इ. देशांत वैदूर्य आढळते. ब्राझीलमध्ये २०० टन वजनाचा स्फटिक आढळला असून ब्लॅक हिल्स (साउथ डकोटा, अमेरिका) येथे ५·८ मी. लांबी, १·५ मी. व्यास, ६१·२५ टन वजन असलेला स्फटिक आढळला होता, तर ऑल्बनी (मेन, अमेरिका) येथे ५ मी. लांबीच्या व १ मी. व्यासाच्या मोठ्या स्फटिकांचा अरीय (त्रिज्यीय) रचनेचा एक गट सापडला होता व यातील सर्वांत मोठ्या स्फटिकाचे वजन १८ टन होते. मुख्यत: फेल्स्पार व अभ्रक यांचे खाणकाम करताना वैदूर्य उप-उत्पादन म्हणून मिळविण्यात येते.
भारतात राजस्थानमध्ये कालीगुमान, मेवाड, अजमेर इ. ठिकाणी पाचू आढळते. तिरुअनंतपूरम् जिल्ह्यात (केरळ) रत्न प्रकारचे वैदूर्य आढळते. राजस्थान (मेवाड, अजमेर, किशनगढ, जयपूर), बिहार, तमिळनाडू (कोईमतूर), आंध्र प्रदेश (नेल्लोर), काश्मीर (शिगार खोरे), सोन खोरे इ. ठिकणी ॲक्वामरीन आढळते. भारतात कॅंब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षांहून जुन्या) खडकांत (उदा., धारवाडी संघाचे अभ्रकयुक्त पेग्मटाइट, पट्टिताश्म व सुभाजा या खडकांत) वैदूर्य विखुरलेले आढळते.
वैदूर्याचे विविध रंगछटांचे रत्न प्रकारातील स्फटिक संश्लेषणाद्वारे (कृत्रिम रीतीने) बनविता येतात (उदा., १९९५ पासून कृत्रिम पाचू बनविण्यात येऊ लागले). ऑक्साइडे व कार्बोनेटे यांच्यापासून तापमानाच्या व दाबाच्या विस्तृत पल्ल्यांत शुष्क व जलतापीय पद्धतींनी वैदूर्याचे असे संश्लेषण करता येते.
वैदूर्याचे बेरील हे इंग्रजी नाव प्राचीन काळापासून प्रचलित असून हिरव्या रत्नासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रीक शब्दावरून ते आले आहे. (पहा मराठी विश्वकोश : खंड १४).
पहा : पाचू पेग्मटाइट बेरिलियम रत्ने.
संदर्भ : Sinkankas. J. Emerald and Other Beryls, New York, 1989.
ठाकूर, अ. ना.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..