वेशभूषा, रंगभूमीवरील : नटाने नाटकातील आपली भूमिका वठवण्यास साहाय्य व्हावे व प्रेक्षकांवर छाप पडावी, अशा दुहेरी उद्देशांनी परिधान केलेला विशिष्ट पोशाख व अलंकारादी भूषणे. पात्रांच्या वेशभूषा नाट्यकृतीच्या आशयानुरूप व रूढ संकेतांनुसार योजिलेल्या असतात. अभिनयतंत्रामध्ये वेशभूषेचा समावेश आहार्य अभिनय म्हणून केला जातो, त्यामुळे आंगिक आणि वाचिक अभिनयाला उठाव मिळतो. भूमिकांनुकूल वेशभूषा नाट्यप्रयोगाची रंगत व परिणामकारकता वाढवते. नाटकातील घटना ज्या स्थल-काल-वातावरणात घडतात, ते सारे वातावरण प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढे प्रत्यक्ष उभे करून किंवा सूचित करून त्यांच्या प्रत्ययाला आणून देणे, हे नेपथ्य – वेशभूषादी घटकांचे कार्य असते. दिवसाची विशिष्ट वेळ, ऋतू, प्रसंग यांना उचित व साजेशा वेशभूषा प्रत्ययकारी ठरते. शिवाय पात्रांविषयीचे काही व्यक्तित्वदर्शक तपशीलही वेशभूषेतून सूचित करता येतात. उदा., पात्रांची वये, व्यवसाय इत्यादी. पात्रांमधील परस्परसंबंधावरही विशिष्ट वेशभूषेद्वारा प्रकाश टाकता येतो. उदा., प्रतिस्पर्धी पात्रांचे परस्परविरोधी रंगसंगतीचे पोशाख. नाटकातील एकूण भावदर्शनही अनुरूप वेशभूषेद्वारा सूचित करता येते. एखाद्या नाटकाची लेखनाची वा सादरीकरणाची विशिष्ट शैली तसेच वेगवेगळ्या दृश्यांमधील भावच्छटाही वेशभूषेतून सूचित करता येतात.
नाटकासारख्या सांघिक कलाविष्कारात वेशभूषाकाराची भूमिका महत्त्वाची असते. नाट्यसंहितेचा अभ्यास, अर्थनिर्णयन व सादरीकरण यांबाबत घेतलेल्या निर्णयात वेशभूषाकाराचा सहभाग असतो. अशा निर्णयानुसार संकल्पित वेशभूषेसंबंधी प्रत्येक पात्राच्या कल्पना निश्चित करण्यात येतात. अनेकदा खास नव्यानेच पात्रांचे पोशाख, आभूषणे तयार करून घेतली जातात. नाटकाच्या रंगीत तालमीत या पोशाखपद्धतीचे परीक्षण करण्यात येते आणि त्यानंतरच वेशभूषेचे स्वरूप अंतिम करण्यात येते.
ऐतिहासिक आढावा : आदिमानवी यातु-धर्मविधियुक्त नृत्यांतूनच पुढे नाट्यकला विकसित झाली. आदिमानवी नृत्यांतही प्राण्यांचे, सैतानांचे मुखवटे व वेष वापरले जात. कालांतराने त्यात रंजनमूल्याला जसजसे जास्त प्राधान्य येत गेले, तसतसे वेशभूषेला नाटकाचे सौंदर्य वाढवणारा घटक म्हणून महत्त्व येत गेले. मात्र त्यात पारंपरिक संकेत व प्रतीकात्मकता यांचा प्रभाव टिकून राहिला. [→ मुखवटे].
प्राचीन ग्रीक शोकांतिकांमध्ये सुरुवातीला अभिनय करताना नट मुखवटे वापरीत असत. रोमन सुखांतिकांमध्येही मुखवट्यांबरोबरच केसांच्या टोपांचा तसेच पोशाखविषयक रंगसंकेतांचा वापर करीत. ज्या सुखांतिकेत ग्रीक धर्तीच्या वेशभूषेचा वापर असे, तिला `फॅबुला टोगाटा’ म्हणत. ⇨मूकनाट्य (पॅंटोमाइम) या प्रकारात एकच नट नृत्य-संगीताच्या साथीवर वेगवेगळे मुखवटे धारण करून विविध भूमिका साकार करीत असे. ⇨एडवर्ड बेर्नेट टायलरच्या अँथ्रपॉलॉजी (१८८१) या ग्रंथात मुखवट्यांची व तत्सम आद्य वेशभूषेची सोदाहरण चर्चा आढळते.
प्राचीन ग्रीक सुखात्मिकाकार ⇨ॲरिस्टोफेनीसच्या विनोदी नाटकांतील समूहदृश्यांमध्ये अभिनेते घोड्यांचे मुखवटे व शेपटांचा प्रतीकात्मक स्वरूपात वापर करीत असत. कालांतराने ⇨मिनॅंडर या ग्रीक नाटककाराच्या नव्या धर्तीच्या विनोदी नाटकांपासून मुखवट्यांच्या वेशभूषांची ही प्रथा मागे पडून समाजात प्रचलित असलेला वेशच रंगभूमीवर वापरला जाऊ लागला. रोमन रंगभूमीवर या ग्रीक वेशभूषेत आमूलाग्र बदल घडले. सीझरच्या काळापासून (इ.स. पू. १००-४४) तर अभिनेत्यांच्या वेशभूषेत रंगरूपाच्या दृष्टीनेही सुधारणा घडवण्यात आल्या. बायबलवर व ख्रिस्ती संतचरित्रांवर आधारलेल्या मध्ययुगीन अद्भुतरम्य व चमत्काराधिष्ठित पौराणिक नाटकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या. वेशभूषा झगमगीत रंगाच्या, भपकेबाज व नेत्रदीपक असत. या नाटकांत वेशभूषेला नाट्यानुभवाचा एक घटक म्हणून महत्त्व प्राप्त झाले. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात एलिझाबेथकालीन रंगभूमीवर आणि इटालियन `कोम्मेदीआ देल्लार्ते’ या सुखात्मिका-प्रकारात वैभवनिदर्शक, श्रीमंती थाटाची, भपकेबाज वेशभूषा पाहावयास मिळते. एलिझाबेथकालीन वस्त्र – भूषणांच्या शैलीचे प्रतिबिंब शेक्सपिअरच्या तत्कालीन नाटकांच्या प्रयोगांतून दिसते. आश्रयदात्या सरदार-उमरावांनी वापरून टाकून दिलेली भारी वस्त्रे व आभूषणे ही नटमंडळी वापरत असत. शेक्सपिअरच्या टायटस अँड्रोनिकस या नाट्यप्रयोगाच्या एकमेव उपलब्ध रेखाचित्रात (१५९४) नटांच्या तत्कालीन वेशभूषेचे दर्शन घडते. इटालियन `कोम्मेदीआ देल्लार्ते’ नाट्यप्रकारात सांकेतिक, शैलीबद्ध वेशभूषा योजल्या जात. सतराव्या शतकातील `मॅस्क’ सारख्या नृत्य-संगीत-अभिनययुक्त प्रेक्षणीय रंजनप्रकारांमधील पात्रांचे मुखवटे व कपडे हे कल्पनारम्यता, वैभवप्रदर्शन, जानपद विषय, पुरातनत्त्वाचे सूचन आदी वैशिष्ट्यांनी युक्त होते. ⇨इनिगो जोन्स (१५७३-१६५२) या वास्तुकाराने ‘मॅस्क’ साठी केलेल्या नेपथ्य, वेशभूषा-रचनांची रेखाचित्रे उपलब्ध आहेत.
फ्रान्समधील चौदाव्या लूईच्या (१६३८ – १७१५) प्रतिष्ठेच्या कल्पनांनुसार वेशभूषाकारांनी अत्यंत खर्चिक, श्रीमंती थाटाच्या व वैभवप्रदर्शक वेशभूषांचा रंगभूमीवर वापर केला. त्या वेशभूषा, त्या जुन्या नाटकांच्या संदर्भात आजही रूढ आहेत. त्यांतील काही वेशभूषारचना जगप्रसिद्ध इटालियन रंगमंचतंत्रज्ञ व वेशभूषाकार जाकोमो तोरेल्लीच्या (१६०८ – ७८) असून काहींचा झां बेरॅं (१६३७-१७११) सारख्या फ्रेंच वेशभूषाकारांनीही अंगीकार केला आहे.
पाश्चात्य रंगभूमीवरील वेशभूषेतील क्रांतिकारक प्रयोग जोझेफ तालमा (१७६३-१८२६) या फ्रेंच अभिनेत्याने केला. ⇨ व्हॉल्तेअरच्या ब्रूटस या नाटकातील त्याच नावाच्या पात्रासाठी उघड्या हातापायांनी तालमा १७८९ साली रंगभूमीवर आला. हा अनपेक्षित बदल तत्कालीन लोकाभिरूचीला मान्य होऊ शकला नाही परंतु हळुहळू हा बदल प्रेक्षकांच्या अंगवळणी पडला. वेशभूषेत साधलेली ऐतिहासिक अचूकता हे तालमाच्या प्रयोगाचे अभिजात नाटकांच्या सादरीकरणातील वैशिष्ट्य होय. हीच वेशभूषारचना अद्यापही प्रमाण मानली जाते.
एकोणिसाव्या शतकात शेक्सपिअरच्या किंग जॉन नाटकाच्या प्रयोगासाठी (१८२३) जे. आर्. प्लांशे (१७९६-१८८०) या वेशभूषातज्ञाने नाटकातील सर्व पात्रांच्या वेशभूषा, ऐतिहासिक संशोधन करून त्यानुसार निश्चित केल्या. प्लांशे याने हिस्टरी ऑफ ब्रिटिश कॉश्चूम (१८३४) हा ग्रंथही लिहिला. ह्या संशोधनाधिष्ठित अचूक, प्रमाणभूत वेशभूषारचनेचा परमोत्कर्ष पुढे १८७० च्या दशकात ड्यूक ऑफ सॅक्स – मेनिंजेनने स्थापलेल्या जर्मन नटमंडळीच्या नाट्यप्रयोगात दिसतो. एकोणिसाव्या शतकातच पाश्चात्त्य रंगभूमीवर वास्तववादी -निसर्गवादी नाटकांचा एक प्रवाह निर्माण झाला, तेव्हापासून वेशभूषेचे प्रयोजन नाटकाच्या आशयाला उठाव देणे व पात्राचे यथातथ्य रूप रंगमंचावर साकारण्यास साहाय्यभूत ठरणे, या स्वरूपाचे बनले.
आधुनिक काळात वेशभूषेत यथातथ्यत्व आणि रेखीवपणा आणणे ही आवश्यक बाब होऊन बसली. शिवाय ती प्रतीकात्मही होऊ लागली. नाटकांच्या विविध प्रकारांनुसार वेशभूषारचनांमध्येही खूपच वैविध्य व नावीन्य आढळते. त्यांत वेशभूषाकाराच्या स्वातंत्र्याला व कल्पकतेला खूपच वाव असतो. त्यानुसार वेशभूषेच्या भिन्न भिन्न शैली हाताळल्या जातात. त्यातून नवनव्या रंगमंचीय शक्यता अजमावून पाहण्याचे प्रयोग होत आहेत.
पाश्चात्त्य रंगभूमीवरील प्रसिद्ध वेशभूषाकारांमध्ये कीथ बेली (टेंपेस्ट), रोझमेरी इंग्हॅम (रोमिओ अँड ज्यूलिएट), लारा क्रो (मेरी स्टुअर्ट), डोबोरा ड्र्रायडन (ट्रम्पेट्स अँड ड्रम्स), सुझान हिलफर्टी (मिडसमर नाइट्स ड्रीम), बेथ नोव्हॅक (टायटस अँड्रॉनिकस) इत्यादींचा नामनिर्देश करता येईल.
पौर्वात्य रंगभूमी : चिनी, जपानी तसेच अन्य पौर्वात्य रंगभूमीवरील वेशभूषेने सुरुवातीपासूनच आपापली पृथगात्म वैशिष्ट्ये निर्माण केली आहेत. पारंपरिक चिनी रंगभूमीवर देखावे वा नेपथ्य यांचा जवळजवळ अभावच होता त्यामुळे वेशभूषेला खास प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त झाले. पात्रांचे साधारणपणे चार मुख्य साचे होते : (१) सर्वसाधारण पुरुषपात्रे, (२) सर्वसाधारण स्त्रीपात्रे, (३) धटिंगण (रोबस्ट), कुरूप पात्रे व (४) स्थूल विनोदी व्यक्तिरेखा. ह्या साऱ्यांना अनुसरून भिन्न भिन्न स्वरूपाच्या वेशभूषांचे संकेत रूढ होते. ह्यांखेरीज आणखीही काही साचेबंद व्यक्तिरेखा व त्यांची ठराविक वेशभूषा रूढ होती. उदा., धीरोदात्त पिता भपकेबाज चिनी झगे व शिरोभूषणे हे राजघराण्यांच्या प्रभावातून रंगभूमीवर आले. त्याबरोबरच लोकजीवनातील पारंपरिक पद्धतीची वेशभूषाही वापरात होती. युआन वंशाच्या अमदानीत (१२६० ते १३६८) या वेशभूषेत प्रथमच वास्तवाच्या पातळीवर बदल करण्यात आले. 1800 नंतर चिनी जनमानसात बीजिंग (पीकिंग) ऑपेरा अत्यंत लोकप्रिय होऊ लागले. या काळात वेशभूषेत विविध रंगांवर अधिक भर देण्यात आला. नाट्यवस्तूच्या लष्करी स्वरूपामुळे सध्याच्या चिनी रंगभूमीवर येणाऱ्या या नाट्यकृतींसाठी रुबाबदार, नेत्रदीपक वेशभूषा वापरण्यात येते. जपानमध्ये अभिजात ⇨नो नाट्याचा प्रकार विकसित झाला. त्यात वैभवशाली वेशभूषेची पूर्वापार परंपरा दिसून येते. ही परंपरा दृढ प्रतीकात्मकतेवर अधिष्ठित होती. फक्त मुख्य नटच आपल्या भूमिकेचा निदर्शक असा मुखवटा वापरत असे.
भारतीय रंगभूमी : प्राचीन काळी भरताच्या ⇨नाट्यशास्त्रामध्ये नाटकातील पात्रांच्या वेशभूषेबद्दल सुस्पष्ट सूचना आढळतात. भरताने पात्रांच्या वेशभूषेचे विस्तृत वर्णन केलेले असून ज्या पात्राची भूमिका नटाने वठवायची त्या पात्रासारखाच तो नट दिसला पाहिजे, हे वेशभूषेचे उद्दिष्ट स्पष्ट केले आहे. नाट्यशास्त्रामध्ये पात्रांच्या शरीराचे रंग निश्चित केलेले असून या पात्रांनी कोणकोणती वस्त्रे वापरावीत, मुकुट कोणी कोणत्या प्रकारचा घालावा, स्त्रियांनी कोणते अलंकार घालावेत, निरनिराळ्या प्रकारांनी कोणी कशी केशरचना करावी यांसंबंधी विस्तृत माहिती दिली आहे. भरताने वेगवेगळ्या वेशभूषाकारांच्या व्याख्याही दिल्या आहेत, त्यांत ‘मुकुटकार’ म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे कृत्रिम मुकुट तयार करणारा ‘माल्यकार’ म्हणजे फुलांच्या माळा गुंफणारा ‘वेशकार’ म्हणजे निरनिराळे वेश तयार करणारा ‘आभरणका’ म्हणजे नाट्यप्रयोगासाठी कृत्रिम दागिने बनविणारा इ. वर्णने आली आहेत. [→ नाट्यशास्त्र].
⇨कळसूत्री बाहुल्यांची वेशभूषा कसकशी विकसित होत गेली, त्याचे प्रात्यक्षिक जैसलमीरच्या राजस्थानी कळसूत्री बाहुल्यांच्या संशोधन मंदिरात पाहावयास मिळते. प्रारंभीच्या ⇨यक्षगान प्रकारातील कलाकारांची वेशभूषा करणारे कलाकार कळसूत्री बाहुल्या तयार करणारेच होते. त्यात पारंपरिक पद्धतीची रंगसंगती कटाक्षाने पाळण्यात येई. या खेळात वीररसाचा परिपोष करणारा नायक तांबड्या रंगात दाखवला जाई. नाट्यप्रयोगात शेवटी मृत्यू पावणाऱ्या पात्रासाठी किंवा दैत्यांसाठी काळ्या रंगाचा वापर केला जाई तर शृंगारनायिका हिरव्या रंगाने सजविल्या जात. राजा ⇨रविवर्म्याची चित्रे लोकप्रिय होऊ लागली, तेव्हा त्याच्या चित्रांनुसार नाटकांतील देवादिकांच्या, पात्रांच्या वेशभूषा करण्यात येऊ लागल्या.
मराठी रंगभूमी : मराठी नाटकांमध्ये यथोचित वेशभूषा करण्याची पद्धत तंजावरच्या दुसऱ्या शहाजींनी लिहिलेल्या लक्ष्मीनारायणकल्याण या नाटकातील पात्रांपासून सुरू झाली. ⇨विष्णुदास भावे (१८१८-१९०१) यांच्या पूर्वीच्या काळात गोमंतकातील ‘जागर’ या अविकसित नाट्यप्रकारामध्ये नाटकांतील पात्रशंप्रमाणे वेशभूषा करण्यात येत असे. राजे पटवर्धनांच्या उदार आश्रयामुळे भाव्यांच्या नाटकमंडळीत वेशभूषेला स्वतंत्र कपडेपट होता. पुढे मराठी नाटकमंडळ्यांनी हीच कपडेपटाची परंपरा चालू ठेवली. गोमंतकातील बांदकरांच्या नाट्यप्रयोगांतील पात्रांची वेशभूषा वास्तवसदृश असली, तरी त्यात शैथिल्य जाणवत असे. ज. स. सुखटणकर यांनी गोमंतकाचे नाट्यस्वरूप स्पष्ट करणाऱ्या आपल्या रूपडी या पुस्तकात म्हटले आहे, की ‘किर्लोस्करांनी कर्नाटकी चाली घेण्यात, संवाद आणि वेशभूषा वगैरेंत जास्त व्यवस्थितपणा आणण्यात बांदकरांपेक्षा काही पाऊले पुढे टाकली असली पाहिजेत यात शंका नाही’. कालानुरूप महाराष्ट्रातील मराठी रंगभूमीवरील पात्रांच्या केशभूषेत आणि वेशभूषेत बदल होत गेले. विधिलिखित (१९२८) या नाटकासाठी जॉर्जिएटवर जरीकाम केलेल्या नव्या पद्धतीच्या साड्या, उद्याचा संसार (१९३६) साठी स्त्री पार्टी नटांनी वापरलेले केसांचे टोप, तसेच ‘ललितकलादर्श’ च्या दुरितांचे तिमिर जावोसाठी अंगीकारलेली कृत्रिम टक्कलाची वेशभूषा ही या बदलांची काही ठळक उदाहरणे होत. ‘गंधर्व नाटक मंडळी’ च्या सौभद्र नाटकातील खऱ्या कलाबतूचे गालिचे, मखमली लोड आणि आसने, सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा किरीट आणि भरजरी अंगरखे पाहून प्रेक्षकांनाही आपण पौराणिक काळातील खऱ्याखखुऱ्या वैभवाचे साक्षीदार आहोत, असे वाटे.
पुरुष नटाने स्त्रीभूमिका वठवली तर ती प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी वेशभूषा, रंगभूषा हे घटक निर्णायक महत्त्वाचे ठरतात. मराठी रंगभूमीवर ⇨बालगंधर्वांनी (१८८८- १९६७) साकारलेल्या स्त्रीभूमिकांमध्ये त्यांच्या वेशभूषेचा वाटा फार मोठा आहे. बालगंधर्वांनी स्त्रीभूमिकांमध्ये वापरलेले विविध पेहेराव व केलेल्या केशभूषा त्या काळातील स्त्रियांनाही अनुकरणीय वाटल्या व त्यांनी आपापल्या वेशभूषेत त्यानुसार बदल घडवून आणले. [पहा : मराठी विश्वकोश : खंड ११, चित्रपत्र २८].
ऐतिहासिक नाटकांसाठी नाटककार य. ना. ऊर्फ अप्पा टिपणीस (१८७६-१९४३) यांनी सुधारित स्वरूपात वापरलेली वेशभूषा आजही प्रचलित आहे. मराठेशाही धाटणीच्या सुरवारी, अंगरखे हे अप्पा टिपणीस धंदेवाईक शिंप्यालाही कापून देत. ब्राह्मणी, राजपुती, मराठेशाही, पेशवेशाही असे अंगरख्यांमध्ले फरक प्रथम अप्पा टिपणीसांनी भाऊबंदकी या नाटकासाठी तयार केले. नाना फडणीसांचे पागोटे व छ. शिवाजींचा जिरेटोप ही अप्पा टिपणीसांच्या शोधक बुद्धीने रंगभूमीला दिलेली शिरोभूषणे आहेत, असे चित्रकार द. ग. गोडसे ह्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात ⇨ दशावतारी नाटकांमधील प्रतीकात्मक वेशभूषांपासून ते आजच्या नाटकांतील आधुनिकतेशी नाते सांगणाऱ्या वेशभूषेपर्यंत हळुहळू बदल होत गेले. पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकांतील पात्रांसाठी रूढ झालेल्या संकेतांनुसार विशिष्ट स्वरूपाच्या वेशभूषा वापरण्याचा प्रघात आधुनिक काळातही रूढ आहे. सामाजिक आशयाच्या नाटकांमध्ये वास्तवदर्शी वेशभूषा केली जाते.
वेशभूषेच्या बाबतीत मराठी रंगभूमीनेही काही परिणामकारक प्रयोग केले आहेत. ‘नाट्यनिकेतन’ च्या तो मी नव्हेच या नाट्यप्रयोगाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी झटपट वेशांतराचा केलेला प्रयोग प्रेक्षकांना स्तिमित करणारा होता. अलीकडच्या काळात दिलीप प्रभावळकर यांनी हसवाफसवी या आपल्या एकपात्री प्रयोगात कृत्रिम दात, वेगवेगळे पोषाख इत्यादींचा वापर करून प्रगत रंगभूषेचे आणि वेशभूषेचे लक्षणीय दर्शन घडवले आहे.
मराठी वेशभूषाकारांनी दशावतारी नाटकांपासून प्रेरणा घेऊन रंगभूमीवरील वेशभूषेच्या संदर्भात लक्षणीय कार्य केले आहे. त्यातीलच अनेकांनी पुढे चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट वेशभूषाकार असा लौकिकही संपादन केला. यांपैकी एस्. फत्तेलाल, विठ्ठल इंगवले, दिनकर जाधव, किसन पवार, निवृत्ती दळवी, शिवाजी दळवी, बाबुराव साळुंखे, विश्वास जाधव, नाना जोगळेकर, भानुमती अथैया (राजोपाध्ये) हे काही प्रमुख वेशभूषाकार होत. भानुमती अथैया यांना इंग्रजी /हिंदी भाषांतील गांधी चित्रपटातील वेशभूषेबद्दल ‘ऑस्कर’ हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार लाभला. काही व्यावसायिक संस्था वेशभूषेच्या सुविधा पुरविण्यात अग्रेसर आहेत. उदाहरणादाखल भुलेश्वरच्या (मुंबई) ‘मगनलाल ड्रेसवाले’ यांचा उल्लेख करता येईल.
पहा : अभिनय.
संदर्भ : Laver, James, Costume in the Theatre, London, 1964.
महाम्बरे, गंगाधर इनामदार, श्री. दे.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..