वृक्षी नेचे : (अ) सिबोटियम : (१) वृक्ष, (२) बीजुककोश पुंजयुक्त दलक, (३) बीजुककोश पुंज (४) पुंजत्राण, (५) बीजुककोश (आ) अल्सोफिला : (१) बीजुककोश पुंजयुक्त दलक (२) बीजुककोश पुंज (३) बीजुककोश पुंजाचा उभा छेद, (४) बीजुककोश.वृक्षीनेचे : (ट्री फर्न्स). नेचांपैकी [→ नेचे] बहुसंख्य वनस्पती लहान ओषधी [लहान व नरम → ओषधी] असतात तथापि काही आकाराने लहानमोठ्या वृक्षाप्रमाणे वाढलेल्या दिसतात व त्यांना हे नाव दिले आहे. त्यांचे खोड सरळ, जाड व नारळाप्रमाणे किंवा ⇨सायकसप्रमाणे  शाखाहीन असते आणि त्यावर अनेक संयुक्त व मोठ्या पानांचा झुबका असतो. संरचनेच्या व परिस्थितिवैज्ञानिक दृष्ट्या अशा वृक्षांच्या गटाला महत्त्व असले, तरी नैसर्गिक वर्गीकरणात या गटाला स्थान नाही. क्रमविकासात (उत्क्रांतीत) हे वृक्ष अधिक प्रगत आहेत असे नाही. या गटातील वृक्ष भिन्न प्रजातींतील (वंशांतील) आणि कुलांतील आहेत. यांपैकी बहुतेक उष्ण कटिबंधातील व काही उपोष्ण कटिबंधातील (द. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. पॅसिफिक बेटे इ.) असून भारतात हिमालय, सिक्कीम, कूर्ग, ऊटकमंड, कॅसल रॉक, अनमोड, आंबोली, निलगिरी, खासी इ. डोंगरी भागांत काही प्रजाती आढळतात. बहुधा थोड्याफार सावलीत, दमट हवेत व दऱ्याखोऱ्यांत त्यांची संख्या अधिक असते विशेष प्रकारे काळजी घेऊन शास्त्रीय उद्यानांत त्यांची लागवड केली जाते [→ शास्त्रीय उद्याने].

बहुतेक सर्व वृक्षी नेचांचा अंतर्भाव पाच प्रजातींत (अल्सोफिला, सायथिया, डिक्सोनिया, थिर्सॅाप्टेरिस व सिबोटियम) केला असून त्यांच्या एकूण सु. ७५० जाती असाव्यात. पहिल्या दोन प्रजाती सायथिएसी व नंतरच्या तीन डिक्सोनिएसी या कुलात समाविष्ट आहेत. हेमिटेलिया प्रजातीचा अंतर्भाव सायथियात केला आहे, तसेच सिस्टोडियमाचा डिक्सोनियात आहे. ह्या वृक्षाची जिथे विपुलता असेल, तेथील वनश्रीला विशिष्ट सौंदर्य व स्वरुप प्राप्त होते. काही जाती १६ मी. किंवा अधिक उंच असतात. नॉरफॉक बेटातील अल्सोफिला एक्सेल्सा वृक्ष १८-२४ मी. पर्यंत उंच असतो. पाने दोनदा किंवा तीनदा पिसासारखी विभागलेली व सु. ६ मी. लांब असतात. खोड टणक असूनही द्विदलिकिताप्रमाणे (बियांत दोन दलिका असलेल्या वनस्पतींप्रमाणे) द्वितीयक वाढ [→ शारीर, वनस्पतींचे] नसते त्यावर पर्णतल किंवा गळलेल्या पानांचे किण (खुणा) आढळतात. बुंध्यावर तळाशी अनेकदा मुळे व उपमुळांचे जाळे दिसते. पानांच्या दलांच्या किंवा दलकांच्या अक्षविन्मुख (मागील) बाजूस बीजुककोश पुंज (अलैंगिक प्रजोत्पादक सूक्ष्म घटकांनी भरलेल्या पिशव्यांचा समूह) असून त्याला पुंजत्राणाचे आच्छादन असते (उदा., सायथिया, डिक्सोनिया, सिबोटियम,

थिर्सॅाप्टेरिस) अल्सोफिला प्रजातीतील जातींत ते नसते. बीजुककोशावर तिरपे स्फोटकर (आपोआप तडकण्यास उद्युक्त करणारे कोशिकांचे) वलय असून बीजुककोश आडव्या रेषेत तडकतात. प्रत्येकात १६-६४ बीजुके असून कोरड्या वाऱ्याने ती मोठ्या प्रमाणात विखुरली जातात व मोकळी जमीन व्यापून टाकतात.

वृक्षी नेचांच्या खोडापासून तवकीर [→ साबुदाणा] मिळवितात (अ. एक्सेल्सा सा. मेड्युलॅरिस इत्यादी). सिबोटियमाच्या खोडावरच्या २-४ सेंमी. लांबीच्या रेशमी केसांचा उपयोग गाद्या आणि उशा भरण्यास करतात. डि. ब्लूमीच्या पानावरचे केस व अ. मायसुरॉइड्सची बीजुके रक्तरोधक (रक्तस्राव थांबविणारे) म्हणून वापरतात. अ. ऑस्ट्रेलिसच्या खोडातील कठीण भागांपासून हातातील काठ्या व विविध तऱ्हेचे सजावटी सामान तयार करतात.

                             

पहा : नेचे. 

                                                

संदर्भ : 1. Eames, A. J., Morphology of Vascular Plants, Lower Groups, London, 1936.

            2. Lawrence, G. H. M., Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

            3. Smith, G. M., Cryptogamic Botany, Vol. II, Tokyo, 1955.                                       

मुजुमदार, शां. ब.